Jabari Khabari – Latest Marathi News | ताज्या बातम्या

HEADLINES

”सुमन सुगंध’ लाभलेला गोड स्वर!

मंगला खाडिलकर लिखित ‘सुमन सुगंध’ हे ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचे चरित्र वाचताना त्यांच्या सांगीतिक प्रवासातील अनेक थक्क करणाऱ्या गोष्टी समोर येतात. त्यांचा जीवनप्रवास जितका स्वरांनी नटलेला होता, तितकाच तो संघर्षाने आणि काही अनपेक्षित घटनांनी भरलेला होता.

‘त्या’ ऐतिहासिक गाण्याची सल
१९६३ च्या प्रजासत्ताक दिनी दिल्लीत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या उपस्थितीत ‘ऐ मेरे वतन के लोगों’ हे अजरामर गीत सादर होणार होते. संगीतकार सी. रामचंद्र यांनी सुरुवातीला यासाठी सुमन कल्याणपूर यांची निवड करून त्यांच्याकडून तासन् तास सराव करून घेतला होता. मात्र, ऐनवेळी हे गाणे लता मंगेशकर गाणार असल्याचे त्यांना सांगण्यात आले. शेवटच्या क्षणी ही ऐतिहासिक संधी हुकल्यामुळे सुमनजींना प्रचंड मानसिक त्रास झाला आणि ही सल त्यांच्या मनात आयुष्यभर राहिली. मात्र, यात लतादीदींचा काहीही दोष नव्हता, हे त्यांनी ‘सुमन सुगंध’मध्ये अत्यंत मोठेपणाने मान्य केले आणि दोन्ही गायिकांमधील कथित वादाचे मळभ दूर केले.

आवाजातील साम्य: वरदान की शाप?
सुमन कल्याणपूर आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातील कमालीच्या साम्याने सुमनजींना कामही दिले आणि दगाही दिला. लोक त्यांची गाणी अनेकदा लतादीदींचीच समजत. १९६० च्या दशकात रॉयल्टीच्या मुद्द्यावरून जेव्हा लतादीदी आणि मोहम्मद रफी यांच्यात वाद झाला, तेव्हा रफीसाहेबांसोबत गाण्यासाठी पहिली पसंती सुमन कल्याणपूर यांना मिळाली. या चार वर्षांत त्यांनी अनेक लोकप्रिय गाणी गायली. मात्र, जयकिशन यांनी मध्यस्थी करून रफी-लता वाद मिटवल्यानंतर सुमनजींना मिळणारी गाणी पुन्हा कमी झाली.

निसर्गाची देणगी, अनुकरण नव्हे!
लतादिदींशी त्यांची तुलना होत असली तरी त्यांनी त्यांचे अनुकरण केले हा न्याय सुमनजींना लावता येत नाही. सुमनताईंचा तो नैसर्गिक स्वर होता, कोणतेही अनुकरण नव्हते. यमन रागावरील त्यांच्या विलक्षण पकडीमुळे त्यांना ‘यमन कल्याणपूर’ असेही म्हटले जाई. केतकीच्या बनी तिथे, जिथे सागरा धरणी मिळते या गाण्यातला जो गोडवा आहे तोच गोडवा केशवा माधवा या नामात आहे, हे सुमनताईंच्या गायकीने दाखवून दिलं.

मराठी भावगीत विश्वावर तर सुमनजींनी अधिराज्य गाजवले. १९६४ मधील सुमनजींचे ‘हाल-ए-दिल उनको सुनाना था’ (फरियाद) आणि लतादीदींचे ‘हाल-ए-दिल यूं उन्हे सुनाया गया’ (जहाँआरा) ही गाणी ऐकली, की त्यांच्या आवाजातील साम्याची आणि सुमनजींवर झालेल्या छुप्या अन्यायाची जाणीव होते. अद्वितीय प्रतिभा असूनही नियतीच्या खेळामुळे त्यांना म्हणावी तशी प्रसिद्धी मिळाली नाही, हे भारतीय संगीत विश्वाचे एक मोठे दुःख आहे.

About The Author

SHARE THIS POST :

Facebook
Twitter
LinkedIn
Pinterest