Jabari Khabari – Latest Marathi News | ताज्या बातम्या

HEADLINES

अक्षरांचा मुसाफिर: बशीर बद्र नावाचं एक उदास गाणं

बशीर बद्र. उर्दू शायरीला दिवाणखान्यातून काढून, अत्यंत सोप्या शब्दांत थेट माणसाच्या काळजापर्यंत पोहोचवणारं एक मखमली वादळ आता शांत झालं आहे. हा प्रवास केवळ शब्दांचा नव्हता, तो वेदनेचा, आगीचा आणि एकांतात स्वतःलाच शोधण्याचा एक शांत, सुबक प्रवास होता.

मीरतची आग आणि भॊपाळची शांतता
१९८७ सालचा तो काळ. मीरत शहर दंगलीच्या आगीत होरपळत होतं. चार महिने सलग चाललेल्या त्या हिंसाचारात कित्येक संसार राख झाले, आणि त्यातच एक घर बशीर बद्र यांचंही होतं. ज्या घरात कविता जन्माला यायच्या, जिथे डायऱ्या आणि हस्तलिखितांच्या रूपाने एका शायराचा आत्मा श्वास घ्यायचा, ते सगळं काही क्षणांत आगीच्या भक्षस्थानी पडलं. माणूस जेव्हा आतून पूर्णपणे तुटतो, तेव्हाच त्याच्यातून असे शब्द बाहेर पडतात जे काळाच्या छातीवर कायमचे कोरले जातात. मीरत उजळत असताना, डॉक्टरसाबांच्या लेखणीतून तो शेर पुढे त्यांची ओळख बनला.

लोग टूट जाते हैं एक घर बनाने में
तुम तरस नहीं खाते बस्तियाँ जलाने में

मीरतची ती जखम मनावर घेऊन त्यांनी ते शहर कायमचं सोडलं आणि ते भोपाळला आले. पण आग जरी मागे सुटली, तरी तिची धग काळजातून कधी गेलीच नाही.

नियतीचा दुसरा वार: नुसरतचा विरह

बशीर सरांच्या आयुष्याची शोकांतिका फक्त घरापुरती मर्यादित नव्हती. त्यांचा एकुलता एक मुलगा नुसरत. बालपणापासूनच त्याच्याही मनात कवितेची बीजं रुजली होती. पण मीरतच्या त्या भीषण जाळपोळीनंतर बशीर सरांचं मन इतकं व्याकुळ झालं होतं, की आपल्या मुलाने या अनिश्चित, संवेदनशील जगात कवी व्हावं असं त्यांना कधीच वाटलं नाही. त्यांनी नुसरतच्या नज्मना कधीच दाद दिली नाही, कधी प्रेमाचा आसरा दिला नाही. कदाचित, हा एका बापाचा आपल्या मुलाला जगाच्या क्रूरतेपासून वाचवण्याचा एक अबोल प्रयत्न असावा. त्यामुळे नुसरतला व्यावसायिक यश मिळायला खूप उशीर झाला. जेव्हा सगळं काही सुरळीत होत होतं, तेव्हाच प्रारब्धाने एक क्रूर खेळ मांडला. नुसरत गंभीर आजारी पडला. तब्बल दशकभर चाललेल्या त्या आजारपणानंतर, २०२० च्या फेब्रुवारीत नुसरतने जगाचा निरोप घेतला.

स्मृतींचा विसर आणि काळजातली उदासी

मुलाच्या मृत्यूने बशीर बद्र आणि त्यांच्या पत्नी राहत भाभी पूर्णपणे खचून गेले. त्यातच बशीर सरांना ‘अल्झायमर्स’ (स्मृतीभ्रंश) या आजाराने विळखा घातला होता. हळूहळू ते भूतकाळ, स्वतःची शायरी आणि जगाला विसरत चालले होते. राहत भाभींनी स्वतःला सावरत त्यांना सांभाळलं. स्मृतींचा हा विसर कदाचित नियतीने त्यांना दिलेली एक मलमपट्टी असावी, जेणेकरून मुलाच्या निधनाचं अथांग दुःख त्यांना जाणवू नये. पण तरीही, कधीकधी त्या दाट धुक्यातूनही जुन्या आठवणींची एक कडा लकाकून जायची आणि डॉक्टरसाबांच्या डोळ्यांत नकळत पाणी यायचं. तेव्हा त्यांचाच एक शेर आठवायचा.

कभी कभी तो छलक पड़ती हैं यूँही आँखें
उदास होने का कोई सबब नहीं होता

आयुष्याच्या प्रवासात त्यांनी वयाच्या चाळीशीतच आपल्या खुदाकडे एक कैफियत मांडली होती. ती वेदना आज त्यांच्या जाण्याने जास्त गडद वाटते.

ज़िंदगी तू ने मुझे क़ब्र से कम दी है ज़मीं
पाँव फैलाऊँ तो दीवार में सर लगता है..

आज डॉक्टरसाब या चौकटींमधून मुक्त झाले आहेत. ते गेले असले, तरी त्यांनी मागे सोडलेला शब्दांचा हा उबदार कोळसा पिढ्यानपिढ्या माणसांच्या काळजाला शेकत राहील. एका महान, सुबक आणि तितक्याच उदास प्रवासाला विनम्र श्रद्धांजली!

About The Author

SHARE THIS POST :

Facebook
Twitter
LinkedIn
Pinterest