तमिळनाडूच्या राजकारणात सध्या एका मोठ्या वादळाची चर्चा आहे. ‘कर्नाटकचे सिंघम’ म्हणून ओळखले जाणारे आणि तमिळनाडू भाजपचे धडाडीचे नेते के. अन्नामलाई हे लवकरच पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याच्या वृत्ताने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर निर्माण झालेल्या अंतर्गत समीकरणांमुळे अन्नामलाई यांनी दिल्लीत वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून पक्षापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.
जोसेफ विजय यांच्या यशामुळे बदलली समीकरणे
तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत अभिनेते जोसेफ विजय यांच्या ‘तमिळगा वेत्री कळघम’ (TVK) या नवख्या पक्षाने सत्ता काबीज करून राजकीय विश्लेषकांना थक्क केले. विजय यांच्या या अभूतपूर्व यशामुळे द्रमुक (DMK) आणि अण्णाद्रमुक (AIADMK) या पारंपरिक बलाढ्य पक्षांसोबतच भाजपसमोरही अस्तित्वाची लढाई निर्माण झाली. राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की, जर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने अन्नामलाई यांना निर्णय घेण्याची अधिक स्वायत्तता आणि मोकळीक दिली असती, तर कदाचित विजय हे राज्यातील बदलाचा एकमेव चेहरा बनले नसते. या पराभवाचे खापर शेवटी अंतर्गत वादावर फुटले.
आयपीएस ते तमिळनाडू भाजपचा चेहरा
२०११ च्या बॅचचे कर्नाटक कॅडरचे धडाकेबाज आयपीएस अधिकारी असलेल्या अन्नामलाई यांनी आपल्या कठोर पोलीस कारवाईच्या शैलीमुळे प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. मे २०१९ मध्ये त्यांनी पोलीस सेवेचा राजीनामा दिला. २०१८ मधील कैलास-मानसरोवर यात्रे दरम्यान त्यांना सामाजिक व राजकीय बदलाची गरज प्रकर्षाने जाणवली आणि त्यांनी २०२० मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. “हा पक्ष घराणेशाही नसलेला आणि गुणवत्तेला वाव देणारा आहे,” असे म्हणत त्यांनी द्रविडीयन पक्षांच्या कौटुंबिक मक्तेदारीवर थेट हल्ला चढवला होता. २०२१ मध्ये केवळ ३७ व्या वर्षी त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद सोपवण्यात आले. भाजपचे राष्ट्रीय संघटन सरचिटणीस बी. एल. संतोष यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांनी पक्षात अल्पकाळात आपले स्थान बळकट केले.
वादाची ठिगणी कुठे पडली?
अन्नामलाई यांच्या राजीनाम्यामागे ‘युतीचे गणित’ हे सर्वात मोठे कारण ठरले आहे. अन्नामलाई यांची भूमिका अत्यंत स्पष्ट होती; भाजपला तमिळनाडूत द्रविड पक्षांना पर्याय म्हणून स्वतःच्या बळावर उभे करावे आणि अण्णाद्रमुक (AIADMK) वर अवलंबून राहू नये. मात्र, भाजपच्या केंद्रीय आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) काही वरिष्ठ नेत्यांनी त्यांचे न ऐकता अण्णाद्रमुकसोबत युती कायम ठेवण्याचा आग्रह धरला. अन्नामलाई यांच्या आक्रमक राजकीय शैलीमुळे पक्षाला प्रसिद्धी तर मिळाली, पण पक्षातील जुने आणि प्रभावशाली नेते त्यांच्या या ‘एकला चलो रे’ भूमिकेमुळे प्रचंड नाराज होते.
अन्नामलाई यांनी अहोरात्र कष्ट करून भाजपला तमिळनाडूच्या ग्रासरूट पातळीवर पोहोचवले. मात्र, तडजोडीच्या राजकारणापुढे झुकण्यास नकार देणाऱ्या या तरुण नेत्याचा पुढचा प्रवास कसा असेल, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.



