Background photo: Leon Brooks, Wikimedia Commons (public domain), edited
बिस्किटं, चिप्स किंवा कोल्ड्रिंक घेताना त्यात किती साखर, मीठ आणि फॅट आहे, हे आपण सहसा तपासत नाही. पण आता पाकिटाच्या पुढच्या बाजूलाच याबाबत ठळक इशारा दिसणार आहे.
२६ नोव्हेंबर २०२६ रोजी सर्वोच्च न्यायालयाने जास्त साखर, मीठ किंवा सॅच्युरेटेड फॅट असलेल्या पदार्थांवर लाल षटकोनी इशारे देण्याचे निर्देश दिले.
- जास्त साखर – HIGH SUGAR
- जास्त मीठ – HIGH SALT
- जास्त फॅट – HIGH FAT
प्रत्येक घटकासाठी स्वतंत्र इशारा असेल. तिन्ही घटक जास्त असतील, तर तीन वेगवेगळे इशारे द्यावे लागतील.
हा निर्णय का महत्त्वाचा?
जास्त साखर, मीठ आणि फॅटमुळे मधुमेह, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब आणि हृदयविकारांचा धोका वाढू शकतो. ‘३एस अँड अवर हेल्थ सोसायटी’ने याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
आपण काय खात आहोत, याची योग्य माहिती मिळणे हा ग्राहकांचा अधिकार असून तो संविधानाच्या कलम २१ मधील जगण्याच्या अधिकाराशी जोडलेला आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
या निर्णयाचा प्रवास
- २०२२ – FSSAI चा स्टार रेटिंगचा प्रस्ताव.
- २०२४ – सर्वोच्च न्यायालयात याचिका.
- २०२५ – तज्ज्ञ समितीमार्फत अभ्यास.
- ऑगस्ट २०२६ – लाल इशाऱ्यांचा प्रस्ताव.
- सप्टेंबर २०२६ – न्यायालयाने प्रस्तावातील त्रुटींवर प्रश्न उपस्थित केले.
- २६ नोव्हेंबर २०२६ – स्वतंत्र लाल इशारे देण्याचे निर्देश.
एक महत्त्वाचा बदल!
फक्त वरून घातलेली साखर (Added Sugar) नव्हे, तर पदार्थातील एकूण साखर (Total Sugar) तपासली जाणार आहे. सॅच्युरेटेड फॅट आणि मिठाचे प्रमाणही विचारात घेतले जाईल.
नियम कधी लागू होणार?
FSSAI ला नवीन नियम आणि मर्यादा निश्चित करण्यासाठी ४ महिने, तर कंपन्यांना नवीन पॅकेजिंग लागू करण्यासाठी त्यानंतर ३६५ दिवस मिळणार आहेत. त्यामुळे हे इशारे लगेच पाकिटांवर दिसणार नाहीत.
परदेशात आरोग्यविषयक इशाऱ्यांचे नियम पाळणाऱ्या कंपन्यांनी भारतातही ते पाळावेत, अशी भूमिका न्यायालयाने मांडली. भारतीय ग्राहकांनाही योग्य माहिती आणि संरक्षण मिळायला हवे.
ग्राहकांना काय फायदा?
या निर्णयामुळे ग्राहकांना पदार्थातील धोकादायक प्रमाण सहज समजेल. विशेषतः लहान मुलं आणि तरुणांना जंक फूडबाबत सावध करता येईल.
मात्र, लाल इशारा नसणे म्हणजे पदार्थ पूर्णपणे आरोग्यदायी आहे, असा अर्थ नाही. तसेच इशारा असलेला पदार्थ खाल्ल्याने आजार होतोच, असेही नाही.
थोडक्यात, आता बिस्किटात साखर किती आहे, हे शोधावं लागणार नाही; साखर जास्त असेल, तर पाकिटच सावध करणार आहे!
तुम्हाला काय वाटतं? या निर्णयामुळे खाण्यापिण्याच्या सवयी बदलतील का? कमेंट करा आणि अशाच बातम्यांसाठी सबस्क्राइब करा – जबरी खबरी!
