Jabari Khabari – Latest Marathi News | ताज्या बातम्या

HEADLINES

फुटबॉलचा नाद खुळा कोल्हापुरी स्वॅग!

कोल्हापूर म्हटलं की डोळ्यासमोर काय येतं? खणखणीत कोल्हापुरी लहेजा, झणझणीत तांबडा-पांढरा रस्सा, रांगडी कुस्ती, लाल माती आणि बलदंड मल्ल! राजर्षी शाहू महाराजांनी कुस्तीला आणि कलावंतांना राजाश्रय दिला, हे आपण सगळेच जाणतो. पण कुस्तीनंतर कोल्हापूरकरांनी कोणत्या खेळाला मनापासून डोक्यावर घेतलं असेल, तर तो खेळ म्हणजे फुटबॉल! कोल्हापूरकरांचं फुटबॉलवरचं हे प्रेम आजचं नाही, तर त्याला तब्बल शतकाहून अधिक काळाचा ऐतिहासिक वारसा आहे.

छत्रपती घराणं आणि कोल्हापूरच्या फुटबॉलची पहिली ‘किक’:
ही गोष्ट आहे १९१४ ची. शाहू महाराजांचे लहान चिरंजीव प्रिन्स शिवाजी महाराज आणि छत्रपती राजाराम महाराज इंग्लंडला गेले होते. तिथे त्यांनी फुटबॉलचा थरार जवळून पाहिला. हा वेगवान खेळ आपल्या कोल्हापुरात पण सुरू झाला पाहिजे, या ध्यासाने प्रिन्स शिवाजी महाराजांनी नारायणसिंग यांच्या सोबत कोल्हापुरात फुटबॉलची पहिली किक मारली. एक थक्क करणारी गोष्ट माहीत आहे का? जगातील सर्वात मोठी फुटबॉल स्पर्धा म्हणजेच ‘फिफा’चा (FIFA) पहिला वर्ल्ड कप १९३० मध्ये खेळवला गेला. पण त्याच्या १० वर्ष आधी, म्हणजेच १९२० मध्ये कोल्हापुरात ‘जामदार फुटबॉल क्लब’ची स्थापना झाली होती! विचार करा, कोल्हापूरकरांचं व्हिजन किती पुढचं होतं! त्यानंतर शाहू महाराजांचे नातू छत्रपती शहाजी महाराज यांनी तब्बल ३६ वर्ष कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनची (KSA) धुरा सांभाळली आणि हा खेळ घराघरात पोहोचवला.

पाय रक्ताळायचे, नखं उखडायची… पण नाद सुटत नव्हता!
१९२५ ते १९४० च्या काळात कोल्हापुरात २५ पेक्षा जास्त फुटबॉल टीम्स होत्या. जॉली क्लब, फर्नांडिस क्लब, शिवाजी तरुण मंडळ, प्रॅक्टिस क्लब, देवास युवराज क्लब… एकाहून एक तोडीस तोड! पण त्या काळी आजच्यासारखे भारी फुटबॉल आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे बूट नसायचे. रबराच्या गोळ्यापासून बनवलेला जड बॉल असायचा. पोरं एकमेकांचे बूट मागून खेळायची, तर अनेकजण चक्क अनवाणीच मैदानावर उतरायचे. खेळताना पाय रक्ताळायचे, नखं उखडायची, पण पोरांचा फुटबॉलचा नाद सुटत नव्हता! मैदानावर रेफ्रींचा शब्द हा अंतिम असायचा आणि तो प्रत्येकाला मानावाच लागायचा. १९४० नंतर कोल्हापुरातील तालीम संस्था मैदानावर उतरल्या आणि फुटबॉलची क्रेझ सातव्या अस्मानावर पोहोचली. तालमींचे सामने म्हणजे कोल्हापुरात जणू दिवाळी-दसरा असायचा! संपूर्ण कोल्हापूर शाहू स्टेडियमवर उतरायचं. पुढे पोलीस, एसटी महामंडळ, मेनन अँड मेनन सारखे व्यावसायिक संघ आले आणि कोल्हापूरची पोरं थेट राष्ट्रीय ‘संतोष ट्रॉफी’ गाजवायला लागली.

रणरागिणींचा डंका आणि युरोपला पडलेलं कोडं!
फक्त मुलं कशाला? रणरागिणी ताराराणींचा वारसा सांगणाऱ्या कोल्हापुरातल्या मुलींनीही फुटबॉलमध्ये मैदान मारलंय. तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही, पण १७ जानेवारी २०१३ ला कोल्हापूरच्या शाहू स्टेडियमवर ‘इंडिया विरुद्ध हॉलंड’ असा महिलांचा आंतरराष्ट्रीय सामना झाला होता. हा सामना पाहण्यासाठी तब्बल २० हजारांपेक्षा जास्त कोल्हापूरकर आले होते. प्रेक्षकांचं ते वेडेपण पाहून हॉलंडची स्टार खेळाडू मायरुशा व्हिक्टोरिया थक्क झाली होती. ती म्हणाली होती, “असं फुटबॉलचं वेड मी युरोपमध्ये सुद्धा पाहिलं नाही, कोल्हापूरकर खरोखरच कमाल आहेत!” कोल्हापूरकरांचं फुटबॉलवरचं प्रेम फक्त जिंकण्या-हरण्यापुरतं मर्यादित नाही, ते जगण्याशी जोडलेलं आहे. कोल्हापुरातील एका नावाजलेल्या पोलीस खेळाडूंचा एकुलता एक मुलगा शालेय स्तरावरील उदयोन्मुख खेळाडू होता. एका स्पर्धेदरम्यान खेळताना मैदानावर पडल्यामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुःखातून सावरत, त्याचे वडील दरवर्षी आपल्या लाडक्या लेकाच्या स्मरणार्थ फुटबॉल स्पर्धा भरवतात. हेच कोल्हापूरकरांचं फुटबॉलवर असलेलं जीवापाड प्रेम दर्शवतं.

छत्रपती घराण्याने लावलेलं हे फुटबॉलचं रोपटे आज एका अथांग वटवृक्षात बदललं आहे. कोल्हापूरच्या मातीत शेकडो टॅलेंटेड पोरं तयार होत आहेत. आता गरज आहे ती फक्त एकाच गोष्टीची, आपल्या पोरांनी स्थानिक क्लबपुरतं मर्यादित न राहता, बाहेर पडून व्यावसायिक जगतावर आणि आंतरराष्ट्रीय फुटबॉलवर ताबा मिळवण्याची!

About The Author

SHARE THIS POST :

Facebook
Twitter
LinkedIn
Pinterest