Jabari Khabari – Latest Marathi News | ताज्या बातम्या

HEADLINES

मूर्तिमंत मराठीप्रेम हरपले ! प्रा. डॉ. यास्मिन शेख यांचे निधन

WhatsApp Image 2026-08-26 at 12.04.19 PM

मूर्तिमंत मराठी प्रेम हरपले! ज्येष्ठ व्याकरणतज्ज्ञ प्रा. यास्मिन शेख यांचे वयाच्या १०१ व्या वर्षी निधन

जबर खबरी / डिजिटल डेस्क (पुणे-मुंबई):
मराठी भाषेचा सार्थ अभिमान बाळगणार्‍या, व्याकरण आणि शुद्धलेखनाच्या क्षेत्रात आयुष्यभर अखंड व्रतासारखे काम करणाऱ्या ज्येष्ठ भाषा आणि व्याकरणतज्ज्ञ प्रा. यास्मिन शेख (वय १०१ वर्षे) यांचे सोमवारी वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुली, नातवंडे आणि मोठा आप्तपरिवार आहे. पुण्यातील बाणेर येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या निधनाने मराठी भाषा आणि साहित्य विश्वात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.

जडणघडण: ज्यू कुटुंबात जन्म ते अस्सल मराठी वातावरण!
प्रा. यास्मिन शेख यांचा जन्म १९२५ मध्ये एका ज्यू कुटुंबात झाला. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव ‘जेरुशा रुबेन’ असे होते. शालेय शिक्षण पंढरपूरमध्ये झाल्यानंतर त्यांनी पुण्यातील प्रसिद्ध ‘सर परशुरामभाऊ महाविद्यालयातून’ (स. प. कॉलेज) मराठी भाषा व साहित्यामध्ये पदव्युत्तर पदवी (M.A.) प्राप्त केली.
पुण्यात शिकत असतानाच ज्येष्ठ साहित्यिक प्रा. श्री. म. माटे आणि प्रा. के. ना. वाटवे यांच्यासारख्या दिग्गज गुरूंचे मार्गदर्शन त्यांना लाभले आणि त्या मराठी भाषेच्या प्रेमात पडल्या. पुढे १९५० मध्ये त्यांनी अझीझ अहमद इब्राहिम शेख (डॅडी शेख) यांच्याशी विवाह केला. लग्नानंतर त्यांनी धर्म बदलला नाही, पण नाव बदलून ‘यास्मिन शेख’ केले.

एक रंजक अन् बाणेदार प्रसंग: “माझी मातृभाषा मराठीच!”
एकदा महापालिकेचे कर्मचारी जनगणनेसाठी प्रा. यास्मिन शेख यांच्याकडे आले होते. त्यांचे नाव ऐकून कर्मचाऱ्याने परस्पर मातृभाषेच्या रकान्यात ‘उर्दू’ असे लिहिले. हे पाहताच यास्मिन शेख यांनी तत्काळ ते खोडायला लावून दुरुस्ती करायला लावली आणि त्या कर्मचाऱ्याला ठणकावून सांगितले; “माझी मातृभाषा मराठीच आहे!” मराठी भाषेविषयीची त्यांची निष्ठा दाखवणारा हा प्रसंग कायम स्मरणात राहणारा आहे.

३४ वर्षे अध्यापन अन् मोलाचे योगदान :
प्रा. यास्मिन शेख यांनी छत्रपती संभाजीनगर (तत्कालीन औरंगाबाद) येथील मिलिंद महाविद्यालय, मुंबईतील एस.आय.ई.एस. (SIES) कॉलेजमध्ये तब्बल ३४ वर्षे मराठीचे अध्यापन केले. निवृत्तीनंतरही त्यांनी प्रशासकीय सेवेतील (MPSC/UPSC) विद्यार्थ्यांना मराठी भाषेचे धडे दिले.
व्याकरणातील अंतिम शब्द: व्याकरणाबाबत भल्याभल्या तज्ज्ञांना शंका असल्यास यास्मिन शेख यांचा शब्द हाच शेवटचा प्रामाणिक मानला जात असे.
महत्त्वाची पुस्तके: ‘मराठी लेखन मार्गदर्शिका’, ‘मराठी व्यवहार कोश’, ‘मराठी शब्दलेखन कोश’, ‘सुगम मराठी व्याकरण कोश’ यांसारखे त्यांचे ग्रंथ मराठीच्या अभ्यासासाठी मूलभूत ठेवा ठरले आहेत.

बालभारतीत योगदान: बालभारतीच्या पाठ्यपुस्तकांचे संपादन आणि ‘कार्यात्मक व्याकरण’ पुस्तक निर्मितीत त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता.

“परकीय शब्दांचा वापर टाळा” – रोखठोक भूमिका
“मराठी माणसे बोलताना भाषेमध्ये परकीय शब्दांचा वापर सहजतेने करतात. मात्र, असे करताना आपणच आपली मराठी प्रदूषित करीत आहोत, याचे भान ठेवायला हवे,” अशी रोखठोक आणि आग्रही भूमिका त्यांनी आयुष्यभर मांडली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली:
“प्रा. यास्मिन शेख यांचा जीवनप्रवास मराठीच्या प्रेमाने भारलेला होता. एखाद्या भाषा शिक्षकाने त्या भाषेवर किती निखळ, प्रांजळ प्रेम करावे याचे त्या मूर्तिमंत उदाहरण ठरल्या. शब्दांचे सौंदर्य आणि व्याकरणाच्या दृष्टीने अचूक वापर सोप्या पद्धतीने मांडणारा त्यांचा अमूल्य ठेवा कायम स्मरणात राहील.”

मिळालेले प्रमुख सन्मान व गौरव :
राज्य शासनाचा डॉ. अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार
महाराष्ट्र साहित्य परिषदेचा डॉ. गं. ना. जोगळेकर स्मृती पुरस्कार
महाराष्ट्र साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार
‘अंतर्नाद’ मासिकाच्यावतीने विशेष गौरव

आपल्या १०० वर्षांच्या आयुष्यात मराठी भाषेची शुद्धता, शिस्त आणि समृद्धीसाठी शेवटच्या श्वासापर्यंत कार्य करणाऱ्या या विदुषीला ‘जबर खबरी’ परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली!

About The Author

SHARE THIS POST :

Facebook
Twitter
LinkedIn
Pinterest