“उलगुलान”… हा फक्त एक शब्द नाही, तर जुलूम, अन्याय आणि पारतंत्र्याविरुद्ध पुकारलेलं एक युद्ध होतं. हे युद्ध ज्यांनी पुकारलं आणि अवघ्या २५ वर्षांच्या आयुष्यात इतिहास घडवला, ते महानायक म्हणजेच भगवान बिरसा मुंडा. आज, ९ जून रोजी या महान क्रांतिसूर्याची पुण्यतिथी. त्यानिमित्ताने त्यांच्या अद्वितीय संघर्षाला आणि पवित्र स्मृतीस कोटी कोटी प्रणाम!
जन्म आणि सुरुवातीचा काळ
बिरसा मुंडा यांचा जन्म १५ नोव्हेंबर १८७५ रोजी झारखंडमधील ‘उलिहाटू’ या छोट्याशा गावात झाला. सुगना मुंडा आणि कर्मी हातू यांच्या पोटी जन्मलेल्या बिरसा यांच्या घराची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. त्यांचा जन्म गुरुवारी म्हणजेच ‘बिस्युतवारी’ झाला, म्हणूनच त्यांचे नाव ‘बिरसा’ ठेवण्यात आले. त्यांना लहानपणापासूनच शिक्षणाची प्रचंड आवड होती. सुरुवातीला एका स्थानिक आश्रमात शिक्षण घेतल्यानंतर, त्यांचे मोठे भाऊ कानू यांनी त्यांना ‘जर्मन ईसाई मिशन स्कूल’मध्ये दाखल केले.
ख्रिश्चन धर्म स्वीकार, स्वाभिमान आणि बंड!
शाळेच्या अटीनुसार बिरसा यांना ख्रिश्चन धर्म स्वीकारावा लागला आणि त्यांचे नाव ‘डेव्हिड’ झाले. पण त्यांचा स्वाभिमान जिवंत होता. एकदा शाळेत जर्मन लुथेरियन मिशनचे अध्यक्ष फादर नोट्रोट यांनी आपल्या भाषणात मुंडा आदिवासींबद्दल ‘ठग, चोर, बेइमान’ असे अत्यंत अपमानकारक शब्द वापरले. वयाच्या अत्यंत लहान टप्प्यावर असलेल्या बिरसा यांनी तिथल्या तिथे फादर नोट्रोट यांना खडसावून प्रत्युत्तर दिले! या धाडसामुळे त्यांना शाळेतून काढून टाकण्यात आले. पण स्वाभिमानी बिरसा यांनी शिक्षणासाठी स्वीकारलेल्या ख्रिश्चन धर्माचा त्याच वेळी जाहीर त्याग केला. त्यांनी हिंदू, ख्रिश्चन आणि मुंडा आदिवासी या तिन्ही धर्मांतील चांगल्या तत्त्वांचा मेळ घालून ‘बिरसाईट’ (Birsaites) या नव्या विचारांची/धर्माची स्थापना केली. बिरसा यांनी आपल्या बुद्धीचा आणि शिक्षणाचा उपयोग आपल्या आदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी केला. त्यांनी जंगलात अनेक दिवस काढून भारतीय संस्कृती आणि आयुर्वेद समजून घेतले. ते औषधी विज्ञानात पारंगत झाले आणि रुग्णांची सेवा करू लागले. त्यांनी समाजाला संदेश दिला: “घर स्वच्छ ठेवा, खोटे बोलू नका, एकजूट राहा आणि कोणतेही निर्णय पंचायत कडूनच करा.” त्यांच्या या नि:स्वार्थी सेवेमुळे आणि चमत्कारी व्यक्तिमत्त्वामुळे लोक त्यांना ‘भगवान बिरसा’ मानू लागले.
इंग्रजांविरुद्ध ‘उलगुलान’ (महाविद्रोह)
१८९० च्या दशकात इंग्रज, जमीनदार आणि कंत्राटदारांकडून आदिवासींचे मोठ्या प्रमाणावर शोषण सुरू झाले. १८९४ मध्ये आदिवासी भागात भीषण दुष्काळ पडला, पण क्रूर इंग्रज सरकारने कोणतीही मदत केली नाही. या अन्यायाविरुद्ध भगवान बिरसा यांनी आदिवासी तरुणांची संघटना बांधली. ते सांगायचे, “आपण इंग्रजांपेक्षा बलाढ्य आहोत. एकत्र या आणि या धोकेबाज इंग्रजांना यमसदनी पाठवा, तरच आपले राज्य येईल!” त्यांच्या शब्दांनी मुंडा जमातीत अशी काही नवचेतना निर्माण केली की, हजारो आदिवासींनी इंग्रज आणि ठेकेदारांच्या कामावर जाणे बंद केले. शेवटी घाबरलेल्या ब्रिटिशांनी २६ ऑगस्ट १८९५ रोजी बिरसा मुंडा आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अटक केली आणि त्यांना दोन वर्षांची शिक्षा झाली.
सशस्त्र लढा आणि विश्वासघात
१८९७ मध्ये कैदेतून सुटल्यानंतर भगवान बिरसा शांत बसले नाहीत. त्यांनी ‘सेवादला’ची स्थापना केली आणि १८९९ मध्ये पुन्हा एकदा इंग्रजांविरुद्ध सशस्त्र लढा सुरू केला. त्यांनी थेट पोलीस ठाणी, सरकारी मालमत्ता, चर्च आणि जुलमी जमीनदारांची घरे उद्ध्वस्त करण्यास सुरुवात केली. इंग्रज सरकार त्यांच्या नावाचा थरकाप उडू लागला. बिरसा मुंडा यांना पकडण्यासाठी इंग्रजांनी त्या काळात ५०० रुपयांचे मोठे बक्षीस ठेवले होते. दुर्दैवाने, पैशाच्या लालसेपोटी काही फितूर युवकांनी बिरसा जंगलात असल्याची बातमी इंग्रजांना दिली. परिणामी, ३ फेब्रुवारी १९०० रोजी त्यांना चक्रधरपूरच्या जंगलातून अटक करण्यात आली.
रांची येथील तुरुंगात असताना इंग्रजांनी भगवान बिरसा मुंडा यांचा अतोनात छळ केला. त्यांच्यावर विषप्रयोग करण्यात आल्याचेही बोलले जाते. अखेर, ९ जून १९०० रोजी रांची तुरुंगात अवघ्या २५ व्या वर्षी या महानायकाचा मृत्यू झाला. वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी त्यांनी देशासाठी आणि आपल्या समाजासाठी दिलेले हे बलिदान इतिहासात सुवर्णअक्षरांनी लिहिले गेले आहे.



