Jabari Khabari – Latest Marathi News | ताज्या बातम्या

HEADLINES

हजार घेतले, कोटी घालवले!

WhatsApp Image 2026-11-06 at 5.05.57 PM

हजार घेतले, कोटी घालवले! जळगावच्या सरकारी अधिकाऱ्याच्या घरात सापडली ५.१६ कोटींची मालमत्ता!

सरकारी कामासाठी नागरिकांकडून अवघ्या काही हजार रुपयांची लाच मागणाऱ्या अधिकाऱ्यांच्या संपत्तीचा आकडा समोर आला की भ्रष्टाचाराची व्याप्ती किती मोठी असू शकते, याची कल्पना येते. जळगावमध्ये नुकत्याच घडलेल्या एका प्रकरणाने पुन्हा एकदा सरकारी यंत्रणेतील भ्रष्टाचाराचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. रस्त्याच्या बिलावर सही करण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप असलेल्या जिल्हा परिषदेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला अवघ्या १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली. मात्र, त्यानंतर त्यांच्या घराची आणि बँक लॉकरची झडती घेतली असता तब्बल ५ कोटी १६ लाख रुपयांहून अधिक किमतीची मालमत्ता समोर आली.

अवघ्या १० हजारांच्या लाचेने प्रकरण उघडकीस

जळगाव जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात उपविभागीय अधिकारी (वर्ग-१) म्हणून कार्यरत असलेले सतीश मन्सुलाल शिसोदे (वय ५५) आणि कनिष्ठ अभियंता भागवत वसंत चवरे (वय ३२) हे या प्रकरणातील आरोपी आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील पिंप्री खुर्द येथे सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात एका सब-कंत्राटदाराने गावांतर्गत रस्त्याचे काँक्रिटीकरण केले होते. या कामाची एकूण किंमत ९ लाख ९० हजार ७६३ रुपये होती.

काम पूर्ण झाल्यानंतर त्याची मोजणी पुस्तिका (एमबी) तयार करणे आणि बिलाची प्रक्रिया पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांकडे होती. मात्र, काम पूर्ण होऊनही बिल मंजूर होत नसल्याने कंत्राटदाराने कार्यालयात विचारणा केली.

यावेळी कनिष्ठ अभियंता भागवत चवरे यांनी यापूर्वीच २० हजार रुपये स्वीकारल्याचा आरोप आहे. त्यानंतर बिलावर स्वाक्षरी करून ते पुढील मंजुरीसाठी पाठवण्याच्या मोबदल्यात उपविभागीय अधिकारी सतीश शिसोदे यांच्यासाठी बिलाच्या १.५ टक्के प्रमाणे आणखी १५ हजार रुपयांची मागणी करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या सततच्या लाच मागणीला कंटाळून संबंधित कंत्राटदाराने २ नोव्हेंबर २०२६ रोजी जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) तक्रार दाखल केली.

१५ हजारांची मागणी, १० हजारांवर व्यवहार!

तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचण्याचे ठरवले. पंचांसमक्ष झालेल्या चर्चेत १५ हजारांऐवजी १० हजार रुपये स्वीकारण्याचे ठरले.

त्यानुसार २ नोव्हेंबर रोजी संबंधित कार्यालयात एसीबीने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे कनिष्ठ अभियंता भागवत चवरे यांनी तक्रारदाराकडून १० हजार रुपये स्वीकारले आणि ही रक्कम उपविभागीय अधिकारी सतीश शिसोदे यांच्याकडे सुपूर्द केली. शिसोदे यांनी पैसे स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने दोघांनाही रंगेहात पकडले.

या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७ आणि १२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

घर आणि बँक लॉकर उघडताच समोर आला कोट्यवधींचा खजिना!

दहा हजारांच्या लाचप्रकरणात अटक झाल्यानंतर एसीबीने सतीश शिसोदे यांच्या निवासस्थानाची आणि त्यांच्या पत्नीच्या बँक लॉकरची तपासणी केली. ४ नोव्हेंबर रोजी झालेल्या या झडतीत जे काही समोर आले, त्याने तपास यंत्रणेलाही आश्चर्याचा धक्का बसला.

एसीबीच्या तपासात एकूण ५ कोटी १६ लाख ८८ हजार ३८९ रुपये किमतीची मालमत्ता आढळून आली.
या मालमत्तेचा तपशील पाहिला तर…

१. घरातील रोकड आणि मालमत्ता
• रोख रक्कम – ७ लाख ९७ हजार ९२० रुपये.
• आदर्शनगरमधील पहिले घर – ४५ लाख रुपये.
• दुसरे घर – ६५ लाख रुपये.
• फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि इतर मौल्यवान साहित्य – सुमारे २४ लाख रुपये.
घरझडतीत एकूण १ कोटी ४१ लाख ९७ हजार ९५९ रुपयांचा मुद्देमाल आढळला.

२. बँक लॉकरमधील सोन्याचा खजिना
बँक लॉकर उघडल्यानंतर तर सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा मोठा साठा समोर आला.
• सोने – २ किलो ५२४.१८ ग्रॅम, किंमत सुमारे ३ कोटी ५१ लाख ८१ हजार रुपये.
• चांदी – ११ किलो ६३३.७ ग्रॅम, किंमत सुमारे १९ लाख ५४ हजार रुपये.
• प्लॅटिनम – १०१.०२ ग्रॅम, किंमत सुमारे ३ लाख ५५ हजार रुपये.

About The Author

SHARE THIS POST :

Facebook
Twitter
LinkedIn
Pinterest