Jabari Khabari – Latest Marathi News | ताज्या बातम्या

HEADLINES

लालबाग परळ इंटरनेटवर व्हायरल!!!

WhatsApp Image 2026-08-27 at 5.42.24 PM

गणेशोत्सवाचे अजून तब्बल ११ दिवस बाकी आहेत. पण लालबाग–परळ परिसरातल्या पोरांची ‘पहिली नाईट’ मात्र आधीच झाल्याचं सोशल मीडिया सांगतोय. फरक एवढाच की, यावेळी डीजेच्या तालावर नाचतानाचे नाही तर घोषणाबाजी, बॅनर आणि दगडफेकीचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत!

ईद-ए-मिलादच्या मिरवणुकीनंतर लालबाग–परळ–चिंचपोकळी परिसरात दोन गटांमध्ये वाद आणि हाणामारी झाल्याची घटना समोर आली. या घटनेचं कारण म्हणून बाप्पाचा बॅनर फाडल्याचा आरोप केला जात आहे. लक्ष्मी कॉटेजजवळ बॅनर फाडल्याचा आरोप हिंदू गटाकडून करण्यात आला आणि त्यानंतर वातावरण चांगलंच तापलं. दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी झाली आणि पुढे काही ठिकाणी दगडफेक व किरकोळ हाणामारी झाल्याचं समोर आलं.

काही जण जखमी झाले असून त्यांना KEM रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पोलिसांनी काही जणांना अटकही केली आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. एवढंच नाही, तर सुरक्षेच्या कारणास्तव भायखळा–लालबाग–परळ पूल काही काळ वाहतुकीसाठी बंद ठेवून वाहनांना पर्यायी मार्गाने वळवण्यात आलं.

मात्र या सगळ्या प्रकरणात सोशल मीडियावर अनेक जन स्वतःच ‘तपास अधिकारी’ बनले आहेत. घटना घडली, व्हिडीओ मिळाला आणि लगेच निष्कर्षही तयार! कुणी म्हणतं बॅनर फाडला म्हणून सगळं झालं, कुणी घोषणाबाजीला सुरुवात मानतं, तर कुणी थेट ‘माज उतरवला’ अशा कॅप्शनसह व्हिडीओ पोस्ट करतंय.

पोलिसांचं म्हणणं मात्र जरा वेगळं आणि महत्त्वाचं आहे. तपास पूर्ण होईपर्यंत नेमकी सुरुवात कोणी केली, हे निश्चित सांगता येणार नाही. म्हणजे सोशल मीडियाच्या कोर्टात निकाल लागला असला, तरी पोलिसांच्या तपासाची फाईल अजून उघडी आहे!

या घटनेनंतर इंटरनेटवर आणखी एक ट्रेंड जोरात सुरू झाला—‘लालबाग परळ’

मागच्या आठवड्यात अंडी फेकण्याच्या घटनेचा संदर्भ असो किंवा आता बॅनर फाडल्याचा आरोप असो, सोशल मीडियावर अनेक पोस्ट्समधून एक आक्रमक सूर दिसतोय. ‘हिंदू आता गप्प बसणार नाही’, ‘आवाज वाढवणार’ अशा पोस्टींनी आणि ‘लालबाग परळ’ या कॅप्शन्सनी सोशल मीडिया अक्षरशः भरून गेला आहे.

ज्यांना कालपर्यंत कट्ट्यावर बसणारी, रिकामी पोरं म्हणून हिणवलं जात होतं, तीच पोरं आता रस्त्यावर उतरली, अशा आशयाच्या पोस्ट्सही मोठ्या प्रमाणात फिरत आहेत. त्यात अर्थातच भगवं प्रेम, बाप्पाचे फोटो आणि अभिमानाच्या कॅप्शनची रेलचेल आहे.

पण इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी—सण लोकांना जोडण्यासाठी असतात

गणेशोत्सव असो, ईद-ए-मिलाद असो किंवा कोणताही धार्मिक उत्सव, मुंबई शहराची खरी ओळख तिच्या गर्दीत नाही, तर त्या गर्दीतही एकमेकांसाठी जागा करून देण्यात आहे. मिरवणुकीतला आवाज मोठा असू शकतो; पण त्यापेक्षा मोठा आवाज कायद्याचा असायला हवा.

लालबाग–परळच्या या घटनेत नेमकं काय घडलं, कोणाची चूक होती आणि वादाची सुरुवात कुठून झाली, हे तपासातून स्पष्ट होईल. तोपर्यंत व्हायरल व्हिडीओ पाहून लगेच न्यायाधीश बनण्यापेक्षा थोडं थांबणं कदाचित जास्त शहाणपणाचं ठरेल.

आणि हो… गणेशोत्सवाची खरी ‘पहिली नाईट’ अजून बाकी आहे. ती ढोल-ताशांच्या आवाजात, गुलालात आणि उत्साहातच जाऊ दे…
तुमचं यावर काय मत आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा.

About The Author

SHARE THIS POST :

Facebook
Twitter
LinkedIn
Pinterest