Jabari Khabari – Latest Marathi News | ताज्या बातम्या

HEADLINES

गोधनीत झाला गॅस लीक आणि सुरक्षा यंत्रणा म्हणतेय सगळं ठीक!!!

WhatsApp Image 2026-08-25 at 11.57.08 AM

रात्रीची वेळ… लोक गाढ झोपेत… आणि अचानक श्वास घ्यायला त्रास होऊ लागला, डोळ्यांची जळजळ सुरू झाली, खोकला येऊ लागला. सुरुवातीला वाटलं, कदाचित वातावरणात काहीतरी बदल झाला असेल. पण तेवढ्यात बातमी आली की जवळच्या जलशुद्धीकरण प्रकल्पातून चक्क क्लोरीन गॅसची गळती सुरु झाली आहे आणि लोक अक्षरशः सैरावैरा पळू लागले.

म्हणजे नागरिक झोपेत होतेच, पण त्याही पेक्षा गाढ झोपेत होती ‘सुरक्षा यंत्रणा’

२४ ऑगस्टच्या मध्यरात्री सुमारे १२.१० ते १ वाजण्याच्या दरम्यान गोधनीतील जलशुद्धीकरण प्रकल्पात ९०० किलो क्षमतेच्या क्लोरीन सिलिंडरमध्ये रिफ्ट आल्याने म्हणजेच भेग पडल्याने गॅस लीक झाल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत तब्बल ४० ते ५२ नागरिकांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली. काही जणांना ICU मध्येही ठेवावं लागलं. सुमारे ६० ते ७० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं, तर २०० मीटरचा परिसर बंद करण्यात आला. NDRF, अग्निशमन दल, पोलीस आणि प्रशासनाने तातडीने बचावकार्य सुरू केलं. सकाळपर्यंत परिस्थिती नियंत्रणात आली, ही निश्चितच दिलासादायक बाब.

पण आता खरी गोष्ट इथून सुरू होते. ९०० किलो क्षमतेचा क्लोरीन सिलिंडर तब्बल सहा महिने तिथे होता, असं समजलं आहे. मग त्याची सुरक्षा तपासणी किती वेळा झाली? सिलिंडरची स्थिती वेळोवेळी तपासली गेली होती का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, एवढ्या धोकादायक रसायनाची साठवणूक योग्य पद्धतीने होत होती का?

या प्रश्नांची उत्तरं आता तांत्रिक समितीच्या अहवालातून मिळतील. जिल्हाधिकाऱ्यांनी तीन दिवसांत अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. पण आपल्याकडे एक सवय आहे… दुर्घटना झाली की चौकशी समिती, अहवाल, सूचना आणि मग काही दिवसांनी सगळं पुन्हा पूर्वपदावर!

खरा प्रश्न असा आहे की ही दुर्घटना कशामुळे घडली… सिलिंडर मध्ये ‘आलेल्या’ रिफ्टमुळे की सरकारच्या व्यवस्थापनात ‘असलेल्या’ रिफ्टमुळे? गोधनीची घटना मोठ्या जीवितहानीशिवाय नियंत्रणात आली, हे नशीब. तुम्हाला काय वाटतं? अशा घटनांसाठी जबाबदारी निश्चित करून दोषींवर कठोर कारवाई व्हायला हवी का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांचा थोडा तिखट, थोडा मिश्कील आणि थेट भाषेत आढावा घेण्यासाठी ‘जबरी खबरी’ला सबस्क्राइब करा!

About The Author

SHARE THIS POST :

Facebook
Twitter
LinkedIn
Pinterest