सिंधुदुर्गातील सावंतवाडी रेल्वे स्थानकाला ‘लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस’ असं नाव देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. या निमित्ताने, भारतीय राजकारणातील एक निष्कलंक, प्रामाणिक नेतृत्व प्रा. मधु दंडवते यांच्या जीवनप्रवासाचा घेतलेला हा धावता आढावा.
- क्रिकेट ते भौतिकशास्त्र: मुंबईतला रंजक प्रवास
२१ जानेवारी १९२४ रोजी अहमदनगरमध्ये जन्मलेल्या मधु दंडवतेंना लहानपणापासूनच क्रिकेटची प्रचंड आवड होती. वडिलांच्या प्रोत्साहनामुळे क्रिकेटमध्ये करिअर करण्यासाठी ते मुंबईत आले. त्यांनी ‘रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’मधून भौतिकशास्त्रात एम.एस्सी. पूर्ण केले. पुढे सिद्धार्थ कॉलेजमध्ये ते प्राध्यापक झाले. भारतीय क्रिकेटचे माजी कर्णधार अजित वाडेकर आणि ‘इस्रो’चे माजी अध्यक्ष के. कस्तुरीरंगन हे त्यांचेच विद्यार्थी होते. - इंदिरा गांधींच्या लाटेतही ऐतिहासिक विजय
मुंबई विद्यापीठात १९४६ ते १९७१ अशा जवळपास २५ वर्षे भौतिकशास्त्र विषय शिकवल्यानंतर प्रजा सोशालिस्ट पार्टीच्या माध्यमातून राजकारणात होतेच. मात्र, आपलं अध्यापनाचं कार्य सांभाळत ते राजकीय चळवळीत सहभागी होत. संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन असो वा गोवामुक्ती संग्राम, प्रा. मधु दंडवते आंदोलनांच्या अग्रस्थानी होते. १९७० साली प्रा. दंडवते मुंबई पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेत निवडून गेले होते. खरंतर प्रा. दंडवतेंचा संसदेतील प्रवेश अचानकच झाला. १९७१ च्या लोकसभा निवडणुकीच्या महिन्याभर आधीच कोकणातील राजापूर मतदारसंघातील प्रजा सोशालिस्ट पार्टीचे खासदार बॅरिस्टर नाथ पै यांचं निधन झालं. राजापूर मतदारसंघ हा समाजवाद्यांचा बालेकिल्ला मानला जात असे. त्यामुळे नाथ पै यांच्या निधनानंतर त्याच तोडीचा उमेदवार देताना प्रा. मधु दंडवतेंचं नाव त्यांच्यासमोर होतं.
१९७१ च्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण देशात इंदिरा गांधींची प्रचंड लाट होती. महाराष्ट्रातील ४५ पैकी ४२ जागांवर काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला. पण, कोकणातील राजापूर मतदारसंघातून प्रा. मधु दंडवते यांनी काँग्रेसचा पराभव करत संसदेत ऐतिहासिक प्रवेश केला. पुढे सलग पाचवेळा ते येथून खासदार म्हणून निवडून आले.
- रेल्वेतील क्रांती
१९७७ मध्ये मोरारजी देसाई यांच्या सरकारमध्ये ते रेल्वेमंत्री झाले. त्या काळी रेल्वेच्या सेकंड क्लासमध्ये लाकडी बाक असायचे. सामान्य माणसाचा हा प्रवास सुकर करण्यासाठी दंडवतेंनी बाकांना दोन इंचाचे कुशन (गादी) बसवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. याशिवाय तिकीट आरक्षणाचे संगणकीकरण, कमी पैशात ‘जनता खाना’ ही त्यांच्याच कार्यकाळातील देणगी आहे. त्यांच्या काळात रेल्वेने विक्रमी १२५ कोटींचा नफा कमावला. कोकण रेल्वेचं स्वप्न प्रत्यक्षात येण्यासाठी प्रा. मधु दंडवतेंनी रेल्वेमंत्री म्हणून सादर केलेल्या पहिल्या अर्थसंकल्पातच तरतूद केली. आपटा ते रोहा या मार्गाच्या कामास वाट मोकळी करून दिली.
पंतप्रधान मोरारजी देसाई हे फारसं कुणाचं कौतुक करत नसत. मात्र, ते एकदा जाहीरपणे म्हणाले होते की,
हे (रेल्वे मंत्रालय) एकमेव मंत्रालय आहे, ज्यात मी अजिबात हस्तक्षेप करत नाही. मधु दंडवते अशा पद्धतीने रेल्वे मंत्रालयाचं काम पाहतात, जे मलाही जमलं नसतं. तर तत्कालीन राष्ट्रपती म्हणाले होते, “जर कुणाला मंत्रिपदासाठी सुवर्णपदक द्यायचं झाल्यास, मी मधु दंडवतेंची शिफारस करेन.”
प्रा. मधु दंडवते हे केवळ एक राजकारणी नव्हते, तर ते सर्वसामान्यांचे कैवारी होते. १९९६ मध्ये त्यांचा पराभव केल्यानंतर सुरेश प्रभू यांनी जाहीरपणे त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला होता, यातच त्यांचे मोठेपण सामावले आहे. सावंतवाडी स्थानकाला त्यांचे नाव देणे, हा या महान नेत्याचा खऱ्या अर्थाने सन्मान आहे.



