उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन, भावपूर्ण श्रद्धांजली | Ajit Pawar | Maharashtra

एक झंझावात शांत झाला…!

महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे एक खंबीर नेतृत्व अजित अनंतराव पवार आज अनंतात विलीन झाले. त्यांची राजकीय कारकीर्द अत्यंत धडाडीची आणि प्रभावी होती. सर्वांचे लाडके दादा ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री हा अजित पवार यांच्या कार्यावर आपण एक नजर टाकूया. अजित पवार यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात सहकार क्षेत्रातून केली. १९८२ मध्ये ते एका सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर निवडून आले होते. १९९१ मध्ये त्यांची पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाली, जिथे त्यांनी १६ वर्षे काम केले. १९९१ मध्येच ते बारामती लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून गेले होते, मात्र काका शरद पवार यांच्यासाठी त्यांनी त्या पदाचा राजीनामा दिला होता.

१९९१ पासून अजित दादांनी बारामती विधानसभा मतदारसंघाचे सलग सातवेळा प्रतिनिधित्व केले होते. त्यांनी कृषी, जलसंपदा (पाटबंधारे), वीज, नियोजन आणि वित्त अशा महत्त्वाच्या खात्यांचे मंत्री म्हणून काम पाहिले होते. राज्याच्या जलसंपदा मंत्री म्हणून काम करताना त्यांनी अनेक सिंचन प्रकल्पांना गती दिली होती. पिंपरी-चिंचवड शहराच्या आधुनिक विकासाचे श्रेय मोठ्या प्रमाणावर अजित पवार यांच्या नियोजनाला दिले जाते.

अर्थमंत्री म्हणून त्यांनी राज्याच्या अर्थसंकल्पात शिस्त आणण्याचा आणि विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला होता. पिंपरी-चिंचवड शहराच्या आधुनिक विकासाचे श्रेय मोठ्या प्रमाणावर अजित पवार यांच्या नियोजनाला दिले जाते. मंत्रालयात असो किंवा बारामतीत, ते दररोज सकाळी ७ वाजता कामाला सुरुवात करत असत. पहाटेच्या वेळी लोकांना भेटून त्यांच्या तक्रारी ऐकून घेणे आणि त्या जागेवरच सोडवणे ही त्यांची कामाची पद्धत होती. त्यांना त्यांच्या मतदारसंघातील हजारो कार्यकर्त्यांची आणि सामान्य लोकांची नावे तोंडपाठ होती. एखाद्या व्यक्तीला त्याच्या नावाने हाक मारून त्याच्या कुटुंबाची विचारपूस करणे, ही त्यांची शैली लोकांना मनापासून भावत असे. कार्यक्रमाची वेळ असो वा कामाचा शब्द, ते पाळण्यावर त्यांचा कटाक्ष असे. त्यामुळेच लोकांचा त्यांच्या शब्दावर दांडगा विश्वास होता. खेळाच्या मैदानावरील खेळाडू असोत किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी, अजित दादा नेहमीच त्यांच्या मदतीला धावून जात. बारामतीमध्ये त्यांनी उभ्या केलेल्या शिक्षण संस्था आणि क्रीडा संकुले हे त्यांच्या दूरदृष्टीचे आणि लोकांप्रती असलेल्या प्रेमाचे उदाहरण होते.

कोरोना महामारीच्या अत्यंत कठीण काळात अजित पवार यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री म्हणून अत्यंत सक्रिय आणि महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. पुण्यात आणि राज्यात इतर ठिकाणी कमीत कमी वेळेत ‘जम्बो कोविड सेंटर्स’ उभारण्याचे श्रेय त्यांना दिले जाते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा तुटवडा असताना, औद्योगिक ऑक्सिजन वैद्यकीय वापरासाठी वळवण्यासारखे धाडसी निर्णय त्यांनी घेतले होते. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनी महिला मतदारांना केंद्रस्थानी ठेवून एक मोठी रणनीती आखली होती. अर्थमंत्री म्हणून त्यांनी २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या योजनेची घोषणा केली होती.

अजित पवार म्हणजे केवळ एक नाव नव्हते, तर ती एक कार्यपद्धती होती. ज्या हातांनी महाराष्ट्राच्या विकासाच्या फाईल्सवर सह्या केल्या, ज्या आवाजाच्या दराऱ्याने प्रशासन ताळ्यावर राहायचे, तो आवाज आता कायमचा शांत झाला आहे. आज बारामतीचे रस्ते सुन्न आहेत, मंत्रालयातील त्यांच्या दालनात शांतता पसरली आहे आणि प्रत्येक लाडक्या बहिणीच्या डोळ्यांत पाणी आहे. महाराष्ट्र एका अशा नेत्याला मुकला आहे, ज्याने राजकारणापलीकडे जाऊन कर्तव्याला धर्म मानले होते.

“शब्दाला जागलेला माणूस, काळाच्या पडद्याआड गेला असला, तरी त्यांनी घडवलेला विकास आणि लोकांच्या मनातले त्यांचे स्थान अजरामर राहील.”

भावपूर्ण श्रद्धांजली, दादा! महाराष्ट्र तुम्हाला कधीच विसरणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *