युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा (Intangible Cultural Heritage) यादीत दीपावलीचा समावेश करण्यात आल्याने भारतीय संस्कृतीचा जागतिक स्तरावर प्रचार आणि प्रसार अधिक वेगाने होणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ऍड. आशिष शेलार यांनी सभागृहात केलेल्या निवेदनातून स्पष्ट केले.
निवेदनात त्यांनी सांगितले की महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासातील एक महत्त्वाचे पान म्हणजे मराठा लष्करी भुरचनेला (Maratha Military Architecture) मिळालेले युनेस्कोचे मानांकन-हा मूर्त वारसा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मिळवलेला अभिमानाचा टप्पा असल्याचे त्यांनी नमूद केले.
आता दीपावलीला अमूर्त सांस्कृतिक वारसा म्हणून सन्मान मिळाल्याने हा गौरव अधिक व्यापक होत आहे. केंद्र सरकारच्या संस्कृति मंत्रालयाने 2025–26 साठी दीपावलीचे नामांकन केले होते. “अंधारातून प्रकाशाकडे, निराशेतून आशेकडे आणि संघर्षातून यशाकडे नेणारा दीपावलीचा संदेश हा भारतीय जीवनमूल्यांचा गाभा आहे,” असे मंत्री शेलार म्हणाले.
दीपावली हा महाराष्ट्राच्या कृषी संस्कृतीशी, ग्रामीण परंपरेशी आणि मराठी समाजजीवनाशी घट्टपणे जोडलेला उत्सव आहे. प्राचीन काळापासून निसर्गावर आधारित सणांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीने जगाला सकारात्मकता आणि सामूहिकतेचा संदेश दिला आहे. यामुळे भारतीय सण, परंपरा आणि सांस्कृतिक मूल्ये यांचा जागतिक प्रसार अधिक वेगाने होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या ऐतिहासिक मानांकनासाठी केंद्र सरकारच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा विशेष उल्लेख करत मंत्री शेलार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांचे सभागृहातून आभार मानले.



