आसाममधील मायोंग हे गाव भारताची ‘काळ्या जादूची राजधानी’ म्हणून ओळखले जाते. या गावाची कहाणी अगदी रहस्यमय, अविश्वसनीय आणि लोकांच्या कल्पनाशक्तीला भुरळ घालणारी आहे. अशा या थरारक कथेबद्दल जाणून घेणे आणि प्रत्यक्षात अनुभवणे याकडे हल्लीच्या पिढीचा जास्त कल असतो, असे अनेकदा दिसून येते. याच अनुषंगाने लिहिलेला हा ब्लॉग आहे.
‘मायोंग’हे नाव संस्कृतमधील ‘माया’ या शब्दावरून आल्याचे मानले जाते, ज्याचा अर्थ भ्रम किंवा जादू असा होतो. हे गाव प्राचीन काळापासून तांत्रिक साधनेचे केंद्र म्हणून ओळखले जाते. तिथे आजही मंत्र-तंत्र आणि जादूटोण्याची अतिप्राचीन परंपरा जपल्या जातात. आणि म्हणूनच या गावाशी संबंधित काही आश्चर्यचकित करणाऱ्या कहाण्या वेळोवेळी समोर येत असतात, जसं की माणसे अचानक गायब होणं किंवा माणसं प्राणी बनणं. अशा अनेक कथा आजही स्थानिक लोक सांगतात, तसेच सोशल मीडियावरही व्हायरल होतात.
स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, महाभारतातील राक्षस हिडिंबा आणि भीमाचा मुलगा घटोत्कच हे याच गावचे होते. येथे १३३० च्या दशकात एक विचित्र घटना घडली होती. असे म्हटले जाते की तत्कालीन मुघल शासक मुहम्मद बिन तुघलकचे तब्बल एक लाख सैनिक या गावाजवळील जंगलात गायब झाले होते, जे कधीच सापडले नाहीत. औरंगजेबच्या काळातील ‘अलंजीरनामा’ या वृत्तांतात… दरबारी इतिहासकार मिर्झा मुहम्मद काझिम याने असे लिहिले आहे की, जेव्हा त्याने आसाममधील अहोम राज्याचा पराभव केला तेव्हा वीर राम सिंह अहोम सैन्यापेक्षा मायोंगच्या काळ्या जादूची भीती बाळगत होता. तिथे अनेक ज्योतिषी आहेत जे हाताच्या रेषा वाचून आपले भविष्य सांगतात. तेथील वैद्य आजार दूर करण्यासाठी औषधांचा नाही, तर आत्मे आणि भुतांची मदत घेतात.
भौगोलिकदृष्ट्या पाहता, मायोंग हे गाव गुवाहाटीपासून सुमारे ४० किमी अंतरावर, पोबितोरा अभयारण्याजवळ वसलेले आहे. येथे असामी लोकसंस्कृती, नृत्यपरंपरा आणि काळ्या जादूशी संबंधीत स्थानिक परंपरा आजही टिकून आहेत.



