तुमचं असं होतं का हो? की कपाट उघडलं की कपडे बाहेर कोसळतात, बँक अकाउंट उघडलं की पैसे गायब झालेले दिसतात आणि ई-मेल उघडला की ४७३ unread messages आपल्याकडे अशा नजरेने पाहत असतात की, भाई, तू रहने दे!!!
खरं तर आपलं आयुष्य थोडं सोपं करण्यासाठी फार मोठे बदल करण्याची गरज नाही. काही छोटे नियम पाळले, तरी घरातला, पैशांचा आणि डोक्यातला बराच पसारा कमी होऊ शकतो. चला, आयुष्याला थोडं ‘declutter’ करूया!
१. आधी पैशांचा पसारा आवरा
तुमच्या बँक अकाउंटमधून दर महिन्याला पैसे कुठे जातात, याचा कधी हिशेब केला आहे का?
OTT, म्युझिक अॅप, फिटनेस अॅप, क्लाऊड स्टोरेज, न्यूज अॅप… आणि त्यातली अर्धी सबस्क्रिप्शन्स आपण वापरतही नसतो. महिन्याला ₹199 म्हणजे काहीच नाही असं वाटतं. पण अशा ७-८ “काहीच नाही” गोष्टी मिळून वर्षाच्या शेवटी बँक अकाउंट म्हणतं— “भाई, थोडीतरी लाज बाळग” म्हणूनच न वापरल्या जाणाऱ्या सबस्क्रिप्शन्स रद्द करा. बचत करण्याची प्रक्रिया शक्य असेल तिथे ऑटोमेट करा.
त्यासाठी 50/30/20 नियम वापरून पाहा:
• ५०% — गरजा
• ३०% — इच्छा
• २०% — बचत
म्हणजेच पगाराच्या दिवशी “आज काय काय घेऊ?” याआधी “किती वाचतायत?” हा हिशोब करायचा आणि सरळ ती रक्कम दुसऱ्या खात्यात ई-वॉलेट मध्ये टाकून द्यायची किंवा गुंतवणूक करायची.
२. प्रत्येक वस्तूला कायमचा पत्ता द्या
घरातली सर्वात जास्त हरवणारी वस्तू कोणती?
चावी!
चावी सापडत नाही म्हणून आपण संपूर्ण घराची झडती घेतो. सोफ्याखाली, कपाटात, फ्रिजजवळ… आणि मग शोधण्यासाठी घरातल्या सगळ्यांना चावी मारतो
यावर एकच उपाय—प्रत्येक वस्तूला निश्चित जागा.
चावी = दरवाज्याजवळचा हुक.
पाकीट = ठरावीक ड्रॉवर.
इअरफोन = ठरावीक बॉक्स.
महत्त्वाची कागदपत्रे = एक फाइल.
जी वस्तू वारंवार हरवते तिची आजच कायमस्वरूपी जागा ठरवा.
एकदा ही सवय लागली की “माझं पाकीट कुठे आहे?” हा प्रश्न घरातील रोजचा वादाचा मुद्दा राहणार नाही.
३. प्रत्येक वस्तू खरेदी करण्याआधी एक प्रश्न विचारा
दुकानात एखादी वस्तू दिसली की आपलं मन लगेच म्हणतं—
“हे घेतलं पाहिजे!”
पण खरेदी करण्याआधी स्वतःला विचारा:
“ही वस्तू माझं आरोग्य, संपत्ती किंवा वेळ यापैकी काहीतरी सुधारेल का?”
जर उत्तर “नाही” असेल, तर थोडं थांबा.
कारण घरातली प्रत्येक वस्तू काहीतरी मागते—जागा, साफसफाई, देखभाल आणि शेवटी मानसिक ऊर्जा.
आज घेतलेली सुंदर वस्तू उद्या कपाटात पडून राहते आणि परवा आपणच म्हणतो—
“हे मी नेमकं कशासाठी घेतलं होतं?”
म्हणून खरेदी कमी आणि विचार जास्त.
४. ‘एक आत, एक बाहेर’ नियम
हा नियम घरासाठी अत्यंत उपयोगी आहे.
घरात एक नवीन वस्तू आली की एक जुनी वस्तू बाहेर.
नवीन शर्ट घेतला?
जुना एखादा शर्ट दान करा.
नवीन बॅग घेतली?
जुनी वापरत नसाल तर द्या.
नवीन शोपीस आणला?
जुना शोपीस आता तुमच्या घरातला कायमस्वरूपी नागरिक असण्याची गरज नाही.
याला म्हणतात “1 In, 1 Out”.
यामुळे घरात वस्तूंची संख्या अनंत वाढत नाही.
नाहीतर एक दिवस घरात माणसं चार आणि वस्तू ४०० असतील!
५. कपाटाला ‘कॅप्सूल वॉर्डरोब’ बनवा
आपल्या कपाटात साधारण तीन प्रकारचे कपडे असतात—
१. रोज वापरतो
२. कधीतरी वापरेन
३. हा कधी घेतला होता?
तिसऱ्या प्रकारची संख्या सर्वाधिक असते!
यावर उपाय म्हणजे Capsule Wardrobe.
कपडे कमी ठेवा, पण असे निवडा की ते एकमेकांसोबत सहज mix & match होतील.
म्हणजे १० कपड्यांपासून २०-३० combinations तयार होऊ शकतात.
फायदा?
कपाट उघडल्यावर “आज काय घालू?” हा प्रश्न कमी.
आणि सर्वात मोठा फायदा म्हणजे कपडे शोधण्यासाठी सकाळी १५ मिनिटांची कुस्ती वाचेल!
६. १% नियम
एखादी वस्तू खूप आवडली आहे?
ताबडतोब खरेदी करू नका.
जर तिची किंमत तुमच्या उत्पन्नाच्या १% पेक्षा जास्त असेल, तर तीन दिवस थांबा.
पहिल्या दिवशी—
“ही वस्तू मला हवीच!”
दुसऱ्या दिवशी—
“थोडं बघू…”
तिसऱ्या दिवशी—
“अरे हो, ती वस्तू काय होती?”
बस्स!
आपली अनेक खरेदी ही गरजेपेक्षा क्षणिक उत्साहातून होत असते. तीन दिवसांचा ब्रेक त्या उत्साहाला थंड करतो.
७. मोह निर्माण करणाऱ्या गोष्टी नजरेआड करा
आपण मनाने खूप मजबूत आहोत, असं आपल्याला वाटतं.
पण चॉकलेट समोर ठेवलं की मन म्हणतं—
“एकच आहे. शेवटचं.”
वाईट सवयींच्या बाबतीत वातावरणाचा मोठा प्रभाव असतो. त्यामुळे मोह निर्माण करणाऱ्या वस्तू शक्य तितक्या नजरेआड ठेवा. अनावश्यक वस्तू वापरत नसाल तर त्यांना दान करा, विकून टाका किंवा घराबाहेर काढा.
जे दिसत नाही, त्याचा मोह कमी होतो.
हा नियम डाएटपासून ऑनलाइन शॉपिंगपर्यंत सर्वत्र लागू होतो.
८. Zero Inbox
इथे इनबॉक्स हे प्रातिनिधिक स्वरूपात आहे. हाच नियम मेसेज बॉक्स, व्हॉटसप वरच्या नातेवाईकांच्या किंवा अती अॅक्टीव्ह मित्रांच्या ग्रुप बाबत देखील आहे. थोडक्यात पेंडिंग कम्युनिकेशन बाबत आहे.
त्यासाठी “3-21-0” हा हॅक आहे.
दिवसातून ३ वेळा ही सगळी कम्युनिकेशन चेक करा.
प्रत्येक वेळी साधारण २१ मिनिटे त्यासाठी ठेवा.
आणि कोणतेच मेसेज inbox मध्ये अनरीड ठेवू नका—reply, archive, किंवा delete
सतत notification तपासण्यापेक्षा ठरावीक वेळेत ई-मेल हाताळल्याने लक्ष विचलित होणे कमी होऊ शकते.
कारण प्रत्येक दोन मिनिटांनी “टिंग!” वाजलं की काम कमी आणि inbox ची झाडाझडतीच जास्त होते!
शेवटी मुद्दा एकच…
Minimalism म्हणजे घरात फक्त एक खुर्ची, एक प्लेट आणि एक चमचा ठेवून संन्याशासारखं जगणं नव्हे!
Minimalism म्हणजे ज्या गोष्टी तुमच्या आयुष्यात खरोखर महत्त्वाच्या आहेत, त्यांच्यासाठी जागा निर्माण करणे.
कमी वस्तू म्हणजे कमी साफसफाई.
कमी अनावश्यक खर्च म्हणजे जास्त बचत.
कमी digital clutter म्हणजे जास्त फोकस.
आणि कमी गोंधळ म्हणजे आयुष्य सोप्पं!!! 😄


