मराठी चित्रपटसृष्टीतील तरुणाईची नाडी अचूक ओळखणारे लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते विजू माने पुन्हा एकदा प्रेक्षकांना मैत्रीच्या एका अविस्मरणीय सफरीवर घेऊन जाण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यांच्या आगामी ‘मामाच्या गोव्याला जाऊ या’ या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा नुकताच अत्यंत उत्साहात पार पडला. सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या ‘स्ट्रगलर साला‘ या गाजलेल्या सीरिजनंतर विजू माने नक्की काय नवीन घेऊन येणार, याची सर्वांनाच उत्सुकता होती. याबद्दल बोलताना विजू माने भावूक होऊन म्हणाले की,
“‘स्ट्रगलर साला’ला रसिक प्रेक्षकांनी जे भरभरून प्रेम दिलं, त्यामुळेच मला पुन्हा एकदा मैत्रीवर आधारित गोष्ट सांगण्याचं धाडस आणि प्रोत्साहन मिळालं. प्रेक्षकांनी त्यातील पात्रांना आपलंसं केलं, त्यांच्या मैत्रीवर प्रेम केलं आणि म्हणूनच त्याच ऊर्जेतून ‘मामाच्या गोव्याला जाऊ या’ ही संकल्पना आकाराला आली.”
या चित्रपटाची सर्वात मोठी खासियत म्हणजे याचे नाव, जे ऐकताच प्रत्येक मित्रांच्या ग्रुपला त्यांच्या अर्धवट राहिलेल्या किंवा गाजलेल्या गोवा ट्रिपच्या प्लॅन्सची आठवण करून देते. चित्रपटातील कलाकारांची नावे अद्याप गुलदस्त्यात असली, तरी या ‘सस्पेन्स’मुळे प्रेक्षकांमधील कुतूहल अधिकच वाढले आहे.
‘फ्रेंडशिप डे’च्या आठवड्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याने, ऑगस्ट महिन्यात आपल्या जिगरी मित्रांसोबत हा चित्रपट पाहणे ही तरुण प्रेक्षकांसाठी एक मोठी पर्वणी ठरणार आहे. मनमुराद हसवणारा आणि जुन्या आठवणींना उजाळा देणारा हा चित्रपट लवकरच मोठ्या पडद्यावर मैत्रीचा नवा ‘हँगओव्हर’ घेऊन येईल, यात शंका नाही.



