चिमणी – निसर्ग साखळीतील संवेदनशील, पण अत्यावश्यक दुवा

Lifestyle News

चिमण्या निसर्गाच्या दृष्टीने महत्वाच्या कशा? याचं उत्तर म्हणजे चिमण्यांना बीजप्रसारक म्हणून ओळखले जाते. चिमण्या फळातील बी खातात आणि त्यातील काही बिया त्यांच्या पचनसंस्थेतून अखंड पडतात किंवा मलविसर्जनानंतर त्यातील काही भाग मातीमध्ये मिसळला जातो. या बिया मातीत रूजल्यास तेथे नैसर्गिकरित्या झाडांची वाढ होते. ज्या भागांमध्ये मानवाला झाडे लावणं शक्य नाही, अशा दुर्गम भागांमध्येगी चिमण्या बीजप्रसारण करून हरित पट्टे निर्माण करू शकतात. याशिवाय चिमण्या किटक खातात, विशेषत: शेतीसाठी हाणीकारक असलेले किटक. जेथे कीटकनाशकांचा अतिवापर होत आहे, तेथे चिमण्यांसारखे पक्षी हे नैसर्गिक रक्षक ठरू शकतात.

दुर्दैवाने, शहरीकरणामुळे आणि मोबाईल टॉवर्समुळे चिमण्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. झपाट्याने होणाऱ्या पुनर्विकासामुळे त्यांची घरटी उद्धवस्त केली जात असल्याने प्रजनन देखील कमी होत चालले आहे. त्याचबरोबर त्यांचे खाद्यस्त्रोतही कमी होत चालले आहेत. चिमण्याच जर नाहिशा झाल्या तर बीजप्रसारणाची नैसर्गिक साखळी खंडित होईल, ज्याचा परिणाम प्रत्यक्षरित्या किंवा अप्रत्यक्षरित्या पर्यावरणावर होईल

आपण काय करू शकतो? घराच्या खिडकीत चिमण्यांसाठी पाणी आणि दाणे खायला ठेवा. शक्य असल्यास पक्ष्यांकरीता घरट्यांसाठी जागा उपलब्ध करणे. चिमण्यांच संरक्षण ही आपली नैतिक जबबादारी आहे. आपल्या एका छोट्या कृतीतून आपण आपल्या जीवनात मोठा बदल घडवू शकतो.

चिमण्यांमुळे शहरांमधील काँक्रिटच्या जंगलात देखील मोकळा श्वास घेता येऊ शकतो. चिमण्या म्हणजे निसर्गाचं संगीत, जीवनाचा श्वास, आणि हिरव्या भविष्याची आशा आहेत. त्यांचे संवर्धन करण्यासाठी प्रत्येकाने हातभार लावायला हवा.

Leave a Reply