कॉस्मेटिक सर्जरी हा ग्लॅमर इंडस्ट्रीचा एक अविभाज्य भाग आहे, जिथे सौंदर्याचे काही मापदंड गाठण्यासाठी अनेक कलाकार शस्त्रक्रिया करत असतात. बॉलिवूड अभिनेत्री शर्लिन चोप्रा यांनीही काही वर्षांपूर्वी अधिक आकर्षक दिसण्यासाठी ब्रेस्ट इम्प्लांट्स करून घेतले होते. आता तुम्ही म्हणाल ब्रेस्ट इम्प्लांट्स म्हणजे काय ? ब्रेस्ट इम्प्लांट्स म्हणजे कृत्रिमरित्या बनवलेली साधने जी शस्त्रक्रियेद्वारे स्तनाच्या आत ठेवतात. हे इम्प्लांट्स स्तनांचा आकार वाढवण्यासाठी किंवा बदलण्यासाठी वापरले जातात.सौंदर्यासाठी घेतलेला हा निर्णय नंतर तिच्यासाठी शारीरिक आणि मानसिक त्रासाचे कारण बनला.
इम्प्लांट्समुळे होणारी अस्वस्थता इतकी वाढली होती की, तिच्या दैनंदिन जीवनावरही त्याचा परिणाम होत होता. अनेक महिलांना अशा इम्प्लांट्सनंतर ‘ब्रेस्ट इम्प्लांट इलनेस’ नावाच्या समस्येचा सामना करावा लागतो, जिथे शरीरात वेदना, थकवा, सांधेदुखी आणि इतर अनेक ऑटोइम्यून लक्षणे दिसू लागतात. शर्लिनलाही अशाच प्रकारच्या त्रासातून जावे लागले.
शस्त्रक्रियेनंतर तिने आपला अनुभव आणि निर्णय अधिक पारदर्शकपणे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय घेतला. तिने या संपूर्ण प्रवासाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
शर्लिनने तिच्या पोस्टमध्ये स्पष्ट सांगितले की, “माझ्या छातीवरचं ओझं उतरलंय… हे वजन ८२५ ग्रॅम होतं. मला फुलपाखरासारखं हलकं वाटतंय.” तिने तरुणांना आवाहन केलं की, सोशल मीडियावरील आकर्षक दिसण्याच्या दबावापोटी आपल्या शरीरावर छेडछाड करू नये. समाजामधील बाहेरचं व्हॅलिडेशन मिळवण्यासाठी कोणत्याही शारीरिक बदलाबाबत घाई करू नये, घरच्यांचा आणि वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे ती म्हणाली.
शर्लिनने स्पष्ट सांगितले की, इतरांची मतं वेगळी असू शकतात. पण “तुम्ही जसे आहात तसेच राहा”, ब्रेस्ट इम्प्लांट काढल्यानंतर तिला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खूप हलकं वाटतंय, आणि ती आता रिकव्हरी स्टेजमध्ये असल्याचे तिने म्हटले आहे. बॉलिवूड आणि ग्लॅमर इंडस्ट्रीत कॉस्मेटिक सर्जरी साधारण झाली असली, तरी त्यामागचे जोखीम, निर्णय आणि त्याचे परिणाम याविषयी बोलण्याचं धाडस शर्लिनने दाखवलं आहे.
स्वतःच्या शरीराशी प्रामाणिक रहा, अनावश्यक बदल करणे टाळा, आणि आपल्या आरोग्यप्रती सजग राहा. तिच्या या अनुभवामुळे, समाजात कॉस्मेटिक सर्जरीच्या निर्णयांबद्दल अधिक प्रगल्भ चर्चेला सुरुवात होऊ शकते. संपुर्ण मनोरंजन विश्वातील हा धाडसी आणि प्रामाणिक अनुभव सामाजिक बदलासाठी खूप महत्त्वाचा आहे.
