राखणदार: अदृश्य शक्ती की परंपरेची आत्मिक ज्योत?

राखणदार

कोकण… एक असा प्रदेश आहे जो पाहिला की भान हरपून जातं आणि मन बहरून जातं. हिरवाईने नटलेले डोंगर, निळ्याशार समुद्राची कमान, लाल मातीचा सुगंध, पावसाचे सुमधुर संगीत, सणांची मांदियाळी, आंबा-काजूच्या बागा, कौलारू घरांचे नयनरम्य देखावे… हे सगळं एकत्र येऊन कोकण प्रदेशाची एक सुरंगी कादंबरी बनवते. आणि त्या कादंबरीस वाचणारा क्षणातच तिच्या प्रेमात पडतो. असे म्हणतात की कोकण म्हणजे ईश्वराला पडलेले सुंदर स्वप्न आहे. त्यामुळे कोकण सर्वार्थाने समृद्ध आहे.

अशा या हृदयस्पर्शी कादंबरीत एक अध्याय असाही आहे ज्याबद्दल बाहेरचे लोक कमी, पण कोकणकर मात्र फार बोलतात. तो अध्याय म्हणजे “राखणदार”. तो एक देव आहे? पूर्वजांचा आत्मा? की ही केवळ अंधश्रद्धा आहे? याच प्रश्नाचा उलगडा करणारा आजचा हा ब्लॉग आहे.

राखणदार म्हणजे कोण?
कोकणातील बहुतेक गावांमध्ये ग्रामदेवतेसोबतच “राखणदार” ही एक महत्वाची संकल्पना आहे. राखणदार म्हणजे घर, वाडी, शेती किंवा गावाचं रक्षण करणारी एक अदृश्य शक्ती. पूर्वजांशी किंवा निसर्गातील काही विशिष्ट ऊर्जांशी जोडलेलं कोकणकरांचं रक्षणकवच, तसेच संकटांपासून वाचवणारी, आशीर्वाद देणारी एक अदृश्य शक्ती.

विशेष म्हणजे या राखणदाराचं कुठलंही मंदिर नसतं. तो असतो घराच्या कोपऱ्यात ठेवलेल्या दगडात, बांधावरील जुन्या झाडात किंवा झाडाखालील जुनाट दगडात, गावाच्या सीमारेषेवरच्या विशिष्ट जागेत. ती जागा साधी असली, तरी तिचं महत्त्व मात्र अमूल्य असतं.

परंपरा: राखण का द्यायची?
कोकणात पिढ्यान्‌ पिढ्या एक परंपरा चालत आली आहे.
दर वर्षी किंवा विशिष्ट अमावस्येला राखणदाराला देणं अर्पण करावं लागतं.

हे देणं काही ठिकाणी नारळ असतं, तर काही ठिकाणी कोंबडं असतं. यामागची भावना मात्र एकच असते…
“तू आमची राखण कर… आम्ही तुला तुझे मानपान देऊ” म्हणजे देणं देऊ.

जर हे देणं चुकलं तर राखणदार रागावतो, संकटं येतात, अशी ठाम श्रद्धा आहे. ही श्रद्धा म्हणजे भीती नव्हे, तर निसर्ग आणि पूर्वजांबाबत असलेली कृतज्ञता आहे.

आजही गावातून बाहेर पडताना अनेक कोकणकर मनातच म्हणतात…

“हे देवा जागेवाल्या, सुखाचा प्रवास होऊ दे रे बावा…!”
ही साद जरी साधीशी असली तरी मनाला मिळणारा आत्मविश्वास अपार असतो. इथल्या लोकांना शुभकार्य सुरू करताना, परदेशात जाताना किंवा एखाद्या संकटात पडल्यावर राखणदाराची आठवण सर्वप्रथम येते.

मुंबईत राहूनही गावाशी जुळलेली नाळ तुटत नाही.
मुंबईसारख्या गजबजाटात राहणारे कोकणकरही राखणदाराला विसरत नाहीत. सणवार, घरातल्या मोठ्या निर्णयांच्या वेळी ते मनातूनच म्हणतात…

“देवा, रागावू नको… वेळ मिळाला की गावाला येईन. तुझं देणं देईन!”
ही आहे श्रद्धेची ताकद. अदृश्य नात्याचा जिवंत पुरावा.

अंधश्रद्धा की सांस्कृतिक वारसा?
आजच्या वैज्ञानिक युगात अनेक जण मुद्दामहून विचारतात…
“अरे ही सगळी अंधश्रद्धा नाही का?”
पण कोकणकरांसाठी राखणदार म्हणजे अंधविश्वास नसून, तो त्यांच्या सांस्कृतिक अस्तित्वाचा एक अविभाज्य भाग आहे.

निसर्गाशी असलेलं आत्मिक नातं, पूर्वजांशी असलेल्या नात्याची जाणीव आणि तिथल्या मातीशी असलेली भावनिक जोड या सगळ्यांचं एकत्रित रूप म्हणजे राखणदार.

एक रोमांचक अनुभव…
एका वृद्ध शेतकरी जाणता झाल्यापासून आपल्या जागेतल्या राखणदाराचं देणं होता. पण वय झाल्यावर एकदा त्याच्याकडून राखणदाराचं देणं द्यायचं राहून गेलं… पुढे आजारपणामुळे काही दिवसातच त्यांचं निधन झालं.

त्यांचा मुलगा मुंबईत नोकरीला होता. अशात अचानक त्याची नोकरी जाण्याची वेळ आली. हवालदिल होऊन, हात जोडून तो मनोमन राखणदाराला म्हणाला…
“देवा, माझी नोकरी वाचव… गावाला आलो की, तुझं जे काही राहिलंय ते देईन.”

त्याच रात्री त्याचे वडील त्याच्या स्वप्नात आले आणि म्हणाले…
“बावा, देवळाटेपातील राखण राहिली आहे… ती तेवढी आठवणीने ये.”

या स्वप्नाचा त्याला अर्थ लागेना. तो बेचैन झाला, मनातून घाबरला. ही गोष्ट त्याने आपल्या आईला सांगितली… आईलाही तेच स्वप्न पडले होते. आई शांतपणे म्हणाली, “बाळा ते बाबा नव्हते, तो राखणदार होता. आपल्याला त्याचं देणं लवकरात लवकर द्यावं लागेल.” पुढे त्याच आठवड्यात राखणदार हाकेला धावला आणि त्याची नोकरी वाचली. वडिलांच्या रुपात राखणदाराने कर्तव्याची आठवण करून दिल्याचे त्याच्या लक्षात आले. अशा अमाप अनुभवांची कोकणात कमी नाही. नेमक्या याच गोष्टी लोकांच्या मनातील श्रद्धेला अधिक बळकट करतात.

राखणदार: कोकणचा आत्मा, निसर्गाचा रक्षक
राखणदार म्हणजे एक देव, एक परंपरा, एक सांस्कृतिक वारसा किंवा आत्मिक ऊर्जा आहे. हे प्रत्येकाचं मत वेगळं असू शकतं. पण कोकणकरांसाठी राखणदार हे फक्त दगड किंवा झाड नाही, तर तो त्यांच्या घराचा रक्षक, गावाचा पहारेकरी आणि निसर्गाशी असलेल्या नात्याचं प्रतीक आहे. तो कोकणकरांना संकटात आधार देतो, वेळोवेळी त्यांची भीती दूर करतो, आणि पिढ्यान्‌पिढ्या त्यांना एकत्र जोडून ठेवतो.

कोकण, निसर्ग आणि राखणदार… ही केवळ कथा नाही; तर कोकणच्या लाल मातीत रुजलेली श्रद्धा, अनुभव आणि निसर्गाशी एकरूप होणाऱ्या जीवनशैलीची परिपूर्ण ओळ आहे. अदृश्य असली तरी सतत जागृत राहणारी ही श्रद्धेची ज्योत आजही कोकणकरांच्या हृदयात तितक्याच प्रेमाने आणि भक्तीने तेवत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *