दीड लाख गोविंदांना मिळणार विमा कवच! – सांस्कृतिक मंत्री ॲड. आशिष शेलार यांची मागणी पूर्ण

News

महाराष्ट्रात प्रत्येक वर्षी जन्माष्टमीच्या दिवशी मोठ्या उत्साहात साजरी केली जाणारी दहीहंडी ही एक पारंपरिक, सामाजिक आणि साहसी कला म्हणून ओळखली जाते. या उत्सवात हजारो गोविंदा पथकं सहभागी होतात आणि थरांवर थर लावून दहीहंडी फोडली जाते. या खेळात सामील होणाऱ्या गोविंदांचा जीव धोक्यात असतो. त्यामुळे सुरक्षेची गरज अधिक प्रकर्षाने जाणवते. याचाच भाग म्हणून महाराष्ट्र शासनाने काही वर्षांपूर्वी दहीहंडीला ‘साहसी खेळाचा दर्जा’ दिला. यामुळे या खेळामध्ये सहभागी होणाऱ्यांना विविध शासकीय सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याचबरोबर विमा संरक्षणाची मागणीही यापूर्वीपासून करण्यात येत होती.

विमा कवचासाठी ऐतिहासिक निर्णय:
गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्र शासनाकडून 75,000 गोविंदांसाठी विमा कवच दिलं जात होतं. मात्र, गोविंदांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे हे कवच अपुरं पडत होतं. याच पार्श्वभूमीवर सांस्कृतिक मंत्री ॲड आशिष शेलार यांच्यासह पुढाकाराने महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनच्या शिष्टमंडळाने माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या बैठकीत 1,50,000 गोविंदांना विमा कवच देण्याची मागणी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही मागणी मान्य करत क्रीडा विभागाला तात्काळ कार्यवाहीचे निर्देश दिले. या निर्णयामुळे राज्यभरातील गोविंदांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनःपूर्वक आभार
या ऐतिहासिक निर्णयाबद्दल सांस्कृतिक मंत्री ॲड आशिष शेलार यांनी तमाम गोवींदांच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. साहसी खेळात सहभागी होताना प्रत्येक गोविंदा सुरक्षित असावा, यासाठी सरकारने उचललेले हे पाऊल कौतुकास्पद आहे. गोविंदा पथकांची सुरक्षा ही केवळ सामाजिक जबाबदारी नसून सांस्कृतिक परंपरेच्या संवर्धनाची गरज आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला निर्णय भविष्यातील अनेक गोविंदांना आत्मविश्वासाने आणि सुरक्षिततेच्या जाणिवेसह सहभागी होण्याची प्रेरणा देईल.

Leave a Reply