मेरठ सारख्या शांत शहरात, एका घराच्या बंद दाराआड दडलेलं सत्य जेव्हा समोर आलं, तेव्हा त्याने सगळ्यांना हादरवून सोडलं. हा घटनाक्रम इतक्या भयावह सत्याकडे पोहोचेल, याची कल्पना कुणालाही नव्हती. सुरुवात एका साध्या बेपत्ता व्यक्तीच्या तक्रारीने झाली, पण जेव्हा त्या तक्रारीचा शेवट एका बंद घरातल्या दुर्गंधीच्या ड्रममध्ये सापडला, तेव्हा संपूर्ण शहरात थरकाप उडाला.
काय घडलं होतं त्या घरात? आणि त्या ड्रममध्ये नक्की काय होतं? पोलिसांनी त्या घराचा दरवाजा तोडल्यावर पाहिलेलं दृश्य अगदी चित्रपटाच्या भयपटापेक्षा कमी नव्हतं. तर घडलं असं काही, की…
सौरभ राजपूत २९ वर्षांचा मर्चंट नेव्हीचा माजी अधिकारी, एक सुशिक्षित, हसतमुख तरुण, ज्याचं आयुष्य एका सुंदर स्वप्नासारखं. मुस्कान रस्तोगी – त्याची पत्नी, एक गोड पाच वर्षांची मुलगी आणि त्यांचं नुकतंच मेरठमध्ये स्थिरावलेलं कुटुंब. बाहेरून पाहिलं तर एक आदर्श कुटुंब, पण बंद दरवाजामागे सुरू असलेलं हे भयावह नाटक कोणालाही सुन्न करणारं होतं.
सौरभ अचानक गायब झाला. “तो इथे नाही आहे…” मुस्कानने अशी कारणं देत, प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न केला, पण तिच्या वागण्यात आणि शब्दांत लपलेला गोंधळ आणि विस्कटलेपणा शेजाऱ्यांच्या मनात शंका निर्माण करत होता. काहीतरी भयानक घडत होतं आणि मग त्यामध्ये… त्या लहान मुलीच्या तोंडून निघालेलं ते शब्द… ” बाबा ड्रम मध्ये आहेत!!” पहिल्यांदा ते शब्द साध्या बालिश कल्पनेप्रमाणे वाटले, पण त्या शब्दांनी दडलेला गूढ पोलिसांना एका भयानक सत्याकडे घेऊन गेला. सौरभचा खून झाला होता. त्याच्या शरीराचे तुकडे एका मोठ्या ड्रममध्ये सिमेंटमध्ये बुडवून ठेवले होते.
पोलिस तपासात एका वेगळ्या गोष्टीचा पर्दाफाश झाला – मुस्कान आणि तिचा प्रियकर साहिल शुक्लामधील अनैतिक संबंध. दोघांचं नातं पुन्हा सुरू झालं होतं, आणि त्या वासनांनी त्यांना इतक्या थराला नेलं की त्यांनी सौरभला त्यांचा “अडथळा” मानलं. त्या भयानक रात्री, मुस्कान आणि साहिलने सौरभच्या अन्नात बेशुद्ध होण्याचं औषध मिसळलं. सौरभ बेशुद्ध होताच, साहिलने त्याच्यावर धारदार चाकूने वार केले. पण ते तिथेच थांबले नाहीत. विकृतीची सीमा ओलांडत त्यांनी त्याच्या शरीराचे तुकडे केले, ड्रममध्ये ठेवले आणि त्यावर सिमेंट ओतलं. सिमेंटने भरलेला ड्रम त्याच घरात ठेवला आणि दोघे शिमलाला गेले तिकडे जाऊन लग्न केलं, परत आले तरीही, मुस्कान आणि साहिल नेहमीसारखेच वागत होते – जणू काहीच घडलं नाही! पण ती प्रचंड पसरत असलेली दुर्गंधी या सगळ्याचा शेवट ठरली.
शेजाऱ्यांनी दुर्गंधीची तक्रार केल्यानंतर पोलिसांनी त्या घराची झडती घेतली आणि ते ड्रममधलं दृश्य पाहून चक्रावले. एका सामान्य, शांत वाटणाऱ्या घरात इतकं विकृत आणि अमानवी कृत्य कसं घडू शकलं, हा विचार त्यांना सुन्न करत होता. मुस्कान आणि साहिलच्या कबुलीने संपूर्ण मेरठ हादरलं. त्यांच्या विकृत विचाराने जादूटोण्याचा आधार घेत, मृतदेहाचा बळी देऊन “सुखी जीवन” मिळवण्याचा अमानवी प्रयत्न केला होता. मुस्कान आणि साहिलने त्यांच्या विकृत वासनांसाठी कुटुंब, विश्वास आणि माणुसकीला पायदळी तुडवलं.
सर्वांत हृदयद्रावक गोष्ट म्हणजे सौरभच्या मुलीचा पोलिसांसमोर दिलेला जबाब – ” बाबा ड्रम मध्ये आहेत!!” या निष्पाप वाक्याने, या भयानक गुन्ह्याचं रहस्य उघडलं. त्या मुलीची निरागसता आणि त्या परिस्थितीतून तिचं समोर येणं, हे संपूर्ण प्रकरण आणखीनच काळजाला भिडतं.
या प्रकरणाचं प्रत्येक पान थरकाप उडवणारं आहे. काय झालं त्या रात्री? मुस्कानला अशी क्रूरता करण्यास नेमकं काय भाग पाडलं? ही कहाणी विश्वासघात, प्रेमाचं विकृत रूप, आणि माणसामध्ये दडलेल्या राक्षसी वृत्तीचं प्रखर उदाहरण आहे. या भीषण प्रकरणाच्या प्रत्येक वळणावर नवं गूढ उलगडत जातं आणि मनात एकच प्रश्न उभा राहतो – माणूस खरंच इतका अमानुष होऊ शकतो का?