आज जेव्हा भारतीय महिला क्रिकेट संघाचा जयघोष जगभर ऐकू येतो, जेव्हा २०२५ च्या विश्वचषकाच्या (World Cup 2025) विजयाची चर्चा होते, तेव्हा या इतिहासाच्या मुळाशी असलेल्या एका विलक्षण नावाचा उल्लेख करणं गरजेचं आहे ते नाव म्हणजे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हण यांच्या मातोश्री माजी खासदार प्रेमलाकाकी चव्हाण.
१९७० च्या दशकात, भारतीय समाजात महिलांनी क्रिकेट खेळावे, ही कल्पनाच वेडेपणाची मानली जाई. ‘चूल आणि मूल’ हीच महिलांची सीमा आहे, हा विचार समाजात रुढ असताना, प्रेमलाकाकींनी एक क्रांतीकारी पाऊल उचलले.
प्रेमलाकाकींच्या यांच्या धाडसी निर्णयामुळेच भारतीय महिला क्रिकेटचा प्रवास सुरु झाला.१९७० चा दशक. भारतात महिलांनी ‘पुरुषांचे खेळ’ खेळणे, विशेषतः क्रिकेट खेळणे, ही कल्पना समाजाला पचायला कठीण होती. या खेळाडूंना प्रोत्साहन नाही, मैदान नाही, पैसा नाही आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सामाजिक पाठिंबाही नव्हता. अशा प्रतिकूल वातावरणात, खासदार असलेल्या प्रेमलाकाकींनी एक ऐतिहासिक निर्णय घेतला.१९७३ साली त्यांनी ‘ऑल इंडिया वुमेन्स क्रिकेट असोसिएशन’ (AIWCA) ची स्थापना केली. त्यावेळी महिला खेळाडूंसाठी लढणे सोपे नव्हते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (त्यांचे चिरंजीव) सांगतात, खेळाडूंकडे प्रवासासाठी पैसे नसायचे, राहायला जागा नसायची. तेव्हा प्रेमलाकाकींनी महत्त्वाची भूमिका बजावली.अनेकदा खेळाडूंनी हॉटेल्सऐवजी त्यांच्या निवासस्थानी मुक्काम केला. काकींनी स्वतःच्या राजकीय प्रभावाचा उपयोग महिला क्रिकेटसाठी निधी आणि सुविधा मिळवून देण्यासाठी केला.
प्रेमलाकाकींच्या प्रयत्नांमुळे भारतीय महिला क्रिकेटने मोठे टप्पे गाठले:
पहिली आंतरराष्ट्रीय मालिका (१९७५): WCAI च्या स्थापनेनंतर अवघ्या दोन वर्षांत, ऑस्ट्रेलियाच्या संघासोबत भारताने आपली पहिली आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिका आयोजित केली.
पहिला कसोटी विजय (१९७६): यानंतर लवकरच भारताने वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत आपला पहिला आंतरराष्ट्रीय विजय नोंदवला.
पहिला महिला विश्वचषक (१९७८): सर्वात महत्त्वाचे म्हणजे, प्रेमलाकाकींच्या नेतृत्वाखाली WCAI ने १९७८ चा महिला क्रिकेट विश्वचषक भारतात आयोजित केला. हा त्या काळात एक जागतिक विक्रम होता, ज्यामुळे भारतीय महिला क्रिकेटला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली.
कालांतराने WCAI चे विलीनीकरण BCCI मध्ये झाले आणि महिला क्रिकेटला अधिक व्यावसायिक रूप मिळाले. आज खेळाडूंना मिळणारे सामने, मानधन, प्रायोजकत्व आणि ‘वुमन्स प्रीमियर लीग’ (WPL) सारखे व्यासपीठ… या प्रत्येक यशाच्या पायाभरणीत प्रेमलाकाकींच्या त्या १९७३ मधील एका धाडसी निर्णयाचे श्रेय दडलेले आहे.
