राज्यातील सांस्कृतिक वारशाच्या जतन आणि संवर्धनासाठी वांद्रे (पूर्व) येथे राज्याचे नवे “महाराष्ट्र पुराभिलेख भवन” बांधण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे केली.
मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की,
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत पुराभिलेख संचालनालयाची स्थापना १८२१ साली करण्यात आली होती. संचालनालयाचे मुख्यालय सध्या मुंबईतील कावसजी रेडी मनी बिल्डिंग (एल्फिस्टन कॉलेज) आहे. येथे १८८९ पासून पुराभिलेख विभागाकडे असलेल्या तब्बल १७.५ कोटी कागदपत्रांपैकी सुमारे १०.५ कोटी कागदपत्रांचे जतन आणि संवर्धन करण्यात येते.
मात्र, काळानुरूप कागदपत्रांचे अत्याधुनिक पद्धतीने जतन व संवर्धन करण्यासाठी तसेच पुरेशी जागा नसल्यामुळे अनेक अडचणी येत असल्याचे मंत्री शेलार यांनी अधोरेखित केले. या सर्व अडचणींवर उपाय म्हणून वांद्रे (पू.) येथील ६,६९१ चौ. मी. जागेवर अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज “महाराष्ट्र पुराभिलेख भवन” उभारण्यात येणार आहे.
या नव्या भवनामध्ये तापमान व आर्द्रता नियंत्रित अभिलेख कक्ष, स्वतंत्र बांधणी शाखा, प्रतिचित्रण शाखा तसेच देश-विदेशातून येणाऱ्या संशोधकांसाठी अत्याधुनिक संशोधन कक्ष आणि स्वतंत्र प्रदर्शन दालन असेल. ऐतिहासिक कागदपत्रांच्या राष्ट्रीय महत्त्वाच्या ठेव्याचे संरक्षण आणि संवर्धन करण्याच्या दृष्टीने ही इमारत अत्यंत महत्त्वाची ठरणार असल्याचे मंत्री शेलार यांनी सांगितले.
यापूर्वी बीकेसी परिसरात स्वतंत्र राज्य वस्तूसंग्रहालय आणि कला भवन उभारण्याची घोषणा मंत्री शेलार यांनी केली होती. या घोषणेनंतर वांद्रे (पू.) येथे “महाराष्ट्र पुराभिलेख भवन” उभारणीची घोषणा करत त्यांनी राज्याच्या सांस्कृतिक वारशाच्या संवर्धनासाठी आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.