तृतीयपंथीयांच्या मुजोरीचा कळस! मध्य प्रदेशात तरुणाची निर्घृण हत्या

News

मध्य प्रदेशच्या विदिशा जिल्ह्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. केवळ पैसे दिले नाहीत म्हणून तृतीयपंथीयांच्या टोळीने एका तरुणाला भरधाव ट्रेनमधून बाहेर फेकून दिलं. ही घटना केवळ एका व्यक्तीची नाही, तर संपूर्ण समाजाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभं करणारी आहे.

२३ वर्षीय आदर्श विश्वकर्मा हा भोपाळमधील एका इलेक्ट्रिकल दुकानात काम करत होता. रोजप्रमाणे तो १३ मार्चला संध्याकाळी गोंडवाना एक्स्प्रेसने गंजबसोदा स्टेशनकडे निघाला. ट्रेनमध्ये गर्दी होतीच. ट्रेन सलामतपूर स्थानकाजवळ पोहोचली आणि त्याच वेळी ८-१० तृतीयपंथीय डब्यात शिरले. त्यांनी प्रवाशांकडून जबरदस्तीने पैसे मागायला सुरुवात केली.

आदर्शने पैसे द्यायला नकार दिला, तेव्हा एका तृतीयपंथीयाने त्याच्या खिशात हात घालण्याचा प्रयत्न केला. आदर्शने त्याचा विरोध केला आणि इथेच भांडण सुरू झालं. त्या टोळीने आदर्शला बेदम मारहाण केली. त्याला लोळवून तोंडावर, पोटावर लाथा मारल्या, अंगावर उड्या मारल्या. काही प्रवाशांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण बहुतांश लोक बघ्याची भूमिका घेत होते.

मारहाणीत आदर्श जबर जखमी झाला होता. विदिशा स्टेशन आल्यावरही त्या टोळीने त्याला बाहेर पडू दिलं नाही. अखेर, गंजबसोदा स्थानक येताच त्या तृतीयपंथीयांनी त्याला सरळ ट्रेनमधून फेकून दिलं. तो जागीच ठार झाला.

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे हा मृतदेह तब्बल १२ तास रेल्वे रुळांजवळ पडून होता. दुसऱ्या दिवशी दुपारी २ वाजेपर्यंत पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. समाज आणि प्रशासनाच्या या निष्काळजीपणावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

ही केवळ एक घटना नाही, संपूर्ण देशभरात तृतीयपंथीयांच्या काही टोळ्या लोकांना अशाच प्रकारे त्रास देत आहेत.
मुंबई लोकलमध्ये प्रवाशांवर ब्लेडने हल्ले करण्याच्या घटना समोर आल्या आहेत. कल्याणमध्ये चार तृतीयपंथीयांनी एका महिलेला आणि तिच्या लहान मुलांना मारहाण केली. काही महिन्यांपूर्वी मुंबईतच एका ट्रॅफिक पोलिसाला तृतीयपंथीयांनी मारहाण केली होती.

लोकं हे सगळं गप्प बसून बघत आहेत, पण यावर आळा कधी बसणार, हा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

समाज तृतीयपंथीयांचा सन्मान करतो, पण अशा घटना वाढल्या तर त्याचा विपरीत परिणाम संपूर्ण समाजावर होईल. अनेक ठिकाणी असेही समोर आले आहे की, तृतीयपंथीयांच्या नावाखाली काही पुरुष या टोळ्यांमध्ये सामील होऊन लोकांना त्रास देत आहेत. त्यामुळे सरकार आणि प्रशासनाने यावर तातडीने कारवाई केली नाही, तर येणाऱ्या काळात परिस्थिती हाताबाहेर जाईल.

तुमच्या मते, सरकारने यावर कोणती ठोस पावलं उचलली पाहिजेत? हे आम्हाला जरूर कळवा.

Leave a Reply