भारतात आंघोळ करणं हा वैयक्तिक स्वच्छतेचा विषय नसून, तो एक ‘कौटुंबिक सन्मानाचा’ प्रश्न आहे! जर तुम्ही सकाळी ११ वाजेपर्यंत आंघोळ केली नाही, तर घरातले लोक तुमच्याकडे अशा नजरेने बघतात जणू काही तुम्ही नुकताच एखादा मोठा आंतरराष्ट्रीय गुन्हा केला आहे. हिवाळ्यात तर आंघोळ न करणं हा मुद्दा सर्वात जास्त गहन चर्चेचा विषय ठरतो. मग काही आळसावलेले लोक, कवी सौमित्रच्या ‘ऊन जरा जास्त आहे’ या कवितेसारखं “थंडी जरा जास्तच आहे” म्हणत गुगलवर असलेल्या माहितीनुसार रोज आंघोळ करणं शरीराला घातक आहे याची शास्त्रीय कारणं देतात. आता विज्ञान सांगतंय म्हटल्यावर बरोबर असेलच ही खोटी आशा मनाशी बाळगून असाल तर मग तुम्हाला डॉक्टरकडून शाही स्नान करून घ्यायची वेळ येईल. त्यामुळे चला, विज्ञानाच्या बादलीत थोडा साबण लावून या प्रश्नाचा फेस करूया!
संशोधनाचा ‘फेस’ काय सांगतो?
अमेरिकेच्या हॉर्वर्ड हेल्थ (Harvard Health Publishing) नुसार, मानवी त्वचा नैसर्गिक तेलाचा आणि चांगल्या बॅक्टेरियांचा एक थर तयार करते, जो त्वचेचे संरक्षण करतो. जेव्हा आपण रोज साबणाने आंघोळ करतो, तेव्हा हा ‘सुरक्षा कवच’ नष्ट होतो. संशोधक म्हणतात की, जास्त आंघोळीमुळे त्वचा कोरडी पडते आणि त्यात सूक्ष्म भेगा पडतात, ज्यातून रोगकारक बॅक्टेरिया शरीरात शिरकाव करू शकतात. डॉ. एलेन लार्सन (Columbia University) यांच्या मते, आंघोळ केल्याने तुम्हाला फ्रेश वाटतं आणि दुर्गंधी जाते, हे मान्य; पण त्यामुळे तुम्ही आजारी पडण्यापासून वाचता, याचे ठोस पुरावे कमी आहेत. उलट, थोड्या प्रमाणात बॅक्टेरियांच्या संपर्कात राहिल्याने आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती अधिक मजबूत होते. जर तुम्हाला गजकर्ण (Eczema) सारखे त्वचेचे रोग असतील, तर रोज साबण लावून आंघोळ करणं तुमच्यासाठी ‘व्हिलन’ ठरू शकतं. संशोधक सांगतात की, दररोज फक्त हात, पाय, काख आणि गुप्तांग स्वच्छ धुणे पुरेसे आहे. बाकी शरीराला रोज साबणाची गरज नसते.
आशियाई देशांचा ‘ट्रॉपिकल’ ट्विस्ट
आता हे संशोधन वाचून तुम्ही बादली फेकून द्यायची गरज नाही! कारण हे पाश्चात्य संशोधन भारताच्या हवामानाला १००% लागू होत नाही. इथे घराबाहेर पडल्यावर ५ मिनिटांत आपण ‘घामाच्या धारेने’ भिजतो. इथल्या धूळ, प्रदूषण आणि घामात जर तुम्ही रोज आंघोळ केली नाही, तर तुमच्या जवळ माणसांपेक्षा माश्याच जास्त येतील! भारतात आर्द्रता जास्त असल्याने शरीरावर ‘स्टॅफिलोकोकस’ (Staphylococcus) सारख्या बॅक्टेरियांची वाढ वेगाने होते. त्यामुळे इथल्या वातावरणात घाम आणि धूळ धुवून काढण्यासाठी रोजची आंघोळ ही ‘लक्झरी’ नसून ‘गरज’ आहे. जपानमधील एका अभ्यासानुसार, कोमट पाण्याने आंघोळ केल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो.
मानसिक आरोग्य आणि ‘शॉवर थॉट्स’
आंघोळ करताना आपल्याला जगातील सर्वोत्कृष्ट आयडिया का सुचतात? कारण सायकोलॉजिकल रिसर्चनुसार, आंघोळ करताना आपले शरीर डोपामाइन (Dopamine) सोडते, ज्यामुळे तणाव कमी होतो आणि सर्जनशीलता वाढते. त्यामुळे आंघोळ हे केवळ शरीर स्वच्छ करण्याचं साधन नाही, तर ते एक ‘मेंटल रिसेट’ बटण आहे.
या दोन्ही गोष्टींचा विचार करता आपल्याला गरज आहे ती ‘मिडल पाथ’ची. ज्या दिवशी तुम्ही एसीत बसून आहात, त्या दिवशी साबणाला सुट्टी दिली तरी चालेल. ५ मिनिटांची आंघोळ तुम्हाला ‘फ्रेश’ ठेवते, तर २० मिनिटांची आंघोळ तुमची त्वचा आणि पाण्याचे बिल दोन्ही ‘ड्राय’ करते. आंघोळ अशी करा की, तुमच्या त्वचेला त्रास होणार नाही व शेजाऱ्याला वास येणार नाही. आणि भारतासारख्या देशात राहून आंघोळ न करता राहणं, हे गंगापूरी महाराज सारखे साधू किंवा नागा साधूच करू शकतात. भौतिक सुखाच्या आहारी जाऊनही रोज आंघोळ न करण्याचा निर्णय घेत असाल तर मग तुमच्या मोक्षाची वाट ही डॉक्टरला कोणती सिद्धी प्राप्त आहे ह्यावर अवलंबून असेल.
