HEADLINES

शिवचरित्र समजून घेण्यासाठी कोणत्या बखरी महत्त्वाच्या आहेत ? | Chhatrapati Shivaji Maharaj | Maharashtra

शिवचरित्र समजून घेण्यासाठी कोणत्या बखरी महत्त्वाच्या आहेत?

मराठ्यांच्या इतिहासाच्या भारतीय साधनापैकी ‘बखर वाङ्मय’ हे महत्त्वपूर्ण साधन मानले जाते. बखर वाङ्मयात करीना, हकिकती, कैफियती, आज्ञापत्र, आत्मवृत्त, प्रसिद्ध ऐतिहासिक स्त्री-पुरुषांची चरित्रे, त्यांच्या संबधीच्या आख्यायिका इत्यादीचा समावेश होता. बखरीचे लेखन प्रामुख्याने स्वराज्य स्थापनेपासून जास्त प्रमाणात झाले. स्वराज्य स्थापनेपासून पेशवाईच्या शेवटापर्यंत २०० ते २५० बखरींचे लिखाण झाले असावे. राजकीय व्यक्तींच्या आज्ञेवरुन बखरींचे लिखाण जास्त प्रमाणात झाले आहे.

१. सभासद बखर: शिवकाळावर प्रकाश टाकणारी अत्यंत महत्त्वपूर्ण बखर म्हणून सभासद बखरीकडे पाहिले जाते. ही बखर कृष्णाजी अनंत सभासद यांनी १६९४ मध्ये लिहिली. या बखरीत शिवाजी महाराजांच्या आरंभापासून अंतापर्यंतच्या सर्व पराक्रमाचे वर्णन आहे. अत्यंत संक्षिप्त असली तरी ही बखर समकालीन असल्याने तिला महत्त्व आहे. राजाराम महाराजांच्या आज्ञेला मान देवून सभासदाने जिंजिच्या किल्ल्यात ही बखर लिहिली. या बखरीत शिवाजी महाराजांच्या पराक्रमा व्यतिरिक्त राज्यव्यवस्था, सैन्यव्यवस्था, गडकोट, खजिना, रयतेच्या सुधारणा, देवस्थान, पीर, मशिदी यांच्या देणग्या, अष्टप्रधान मंडळ या संबधीची माहिती आहे. सभासदांची बखर ही समकालीन असली तरी या बखरीत काही उणीवा आहेत. ही बखर स्मृतीवर आधारित असल्याने या बखरीत स्थळ, काल, घटना यांचा क्रम नाही. तसेच शिवाजी महाराजांच्या जीवनातील काही महत्त्वपूर्ण घटनांचा उल्लेख या बखरीत नाही. काही काल्पनिक घटनांच्या उल्लेखामुळे तिच्या विश्वसनियतेवर प्रश्न निर्माण केले जातात.

२. चिटणीस बखर: बखर वाङ्मयातील शिवकाळावर प्रकाश टाकणारी दुसरी महत्त्वपूर्ण बखर म्हणजे ‘चिटणीस बखर’. ही बखर मल्हार रामराव चिटणीस यांनी लिहिली. ही ‘शिव छत्रपती महाराज यांचे सप्तप्रकरणात्मक चरित्र’ या नावाची सात प्रकरणाची बखर आहे. या बखरीचे लिखाण सातारच्या दप्तरखान्यातील कागदपत्रे, ऐकीव माहिती, आख्यायिका यांच्या आधारे करण्यात आले आहे. ही बखर शिवाजी महाराजांच्या मृत्युनंतर १३० वर्षाने लिहिली आहे. या बखरीत स्थळ व काळ यांचा विपर्यास दिसतो. मात्र इतिहास अभ्यासाचे एक साधन म्हणून या बखरीला महत्त्व आहे.

३. श्री शिवछत्रपतींची ९१ कलमी बखर : ही शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील मंत्री दत्ताजी त्रिमल वाकनविस यांनी लिहिली. त्यामुळे या बखरीतील लिखाण हे अस्सल दर्जाचे ठरते. या बखरीत मालोजीराजे पासून शिवाजी महाराजांच्या मृत्युपर्यंतची माहिती दिली आहे. मात्र या बखरीतील काही काल्पनिक गोष्टी व दैवी चमत्कारांचा समावेश यामुळे या बखरीचे मूल्य कमी झाले.

४. चित्रगुप्ताची बखर : ही बखर रघुनाथ यादव चित्रगुप्त यांनी लिहिली आहे. बखरीत चित्रगुप्ताने काही ठिकाणी काव्यात्मक लिखाण केले आहे. चित्रगुप्ताच्या बखरीबाबत इतिहासाचार्य राजवाडे म्हणतात “रघुनाथ यादवाला परंपरेने ऐकलेली शिवाजी महाराजांची व त्यांच्या कर्त्यापुरुषांची भरपूर माहिती होती. सभासद बखरीत ज्या व्यक्तींची आडनावे दिली नाहीत, त्यांची आडनावे चित्रगुप्त लिहिण्याच्या झोकात सहजासहजी देवून जातो.” यावरुनच त्यांनी ही बखर अभ्यासपूर्ण अवलोकनातून लिहिली होती हे सिद्ध होते.

५. दलपतरायाची बखर : ही बखर शिवाजी महाराजांच्या शत्रूगोटातील व्यक्ती दलपतराय यांनी लिहिली. या बखरीतून शिवाजी महाराजांच्या कार्याविषयी शत्रुपक्षातील लोकांचे मत काय होते याची माहिती मिळते. या बखरीतील तारखा शिवचरित्राच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरल्या आहेत, म्हणून या बखरीला महत्त्व आहे.

६. शिवदिग्विजय बखर: ही बखर कोणी लिहिली या बाबतची माहिती उपलब्ध नाही. मात्र इतिहास संशोधक नंदुरबारकर व दांडेकर यांनी तिचे संपादन करुन सन १८९५ साली प्रसिद्ध केली. शिवचरित्रातील अनेक घटना व पराक्रम यांचे वर्णन या बखरीत आहे हे वर्णन करण्यासाठी आपण बारनिशी (जमाखर्च) दाखले, पत्रे, व जुने ग्रंथ याचा आधार घेतल्याचे बखरकार नमुद करतो.

७. मराठा साम्राज्याची छोटी बखर : या बखरीची रचना सन १८१७ झाली असावी. इतिहास संशोधक बाळाजी जनार्दन मोडक यांनी ती “काव्येतिहास संग्रह” या मासिकात प्रसिद्ध केली. स्थळ, काल व व्यक्ती यांचा बराच विपर्यास या बखरीत आहे. तरीही शिवचरित्रामधील काही नव्या बाबी या बखरीतून पुढे येतात.

८. छत्रपती संभाजी व छत्रपती राजारामाची बखर : या दोन्ही बखरी मल्हारराव रामराव चिटणीस यांनी लिहिल्या. या दोन्ही बखरीत छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज यांच्या व्यतिरिक्त शिवकाळातील अनेक सरदार घराणी व त्यांचे पराक्रमी पुरुष यांची ही माहिती मिळू शकते.

मराठ्यांच्या इतिहासाची साधने अनेक संस्थानिक व सरदार घराण्यांमध्ये विखुरली गेली होती. अशा विखुरलेली ऐतिहासिक कागदपत्रे गोळा करुन ती प्रकाशित करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य महाराष्ट्रामध्ये डॉ. साने, डॉ. खरे, डॉ. पारसनीय, डॉ. राजवाडे, डॉ. सरदेसाई इत्यादी संशोधनकांनी केले. या संशोधकांच्या कार्यामुळेच मराठ्यांच्या इतिहासलेखनाला चालना मिळाल्याचे दिसून येते.

About The Author

SHARE THIS POST :

Facebook
Twitter
LinkedIn
Pinterest