बंगळुरुतील एका उच्चभ्रू अपार्टमेंटमध्ये जे घडलं, त्याने संपूर्ण समाजाला हादरवून सोडलं. बाहेरून सुखी आणि प्रेमळ वाटणाऱ्या एका दाम्पत्यामध्ये असं काही असेल, याची कोणालाही कल्पना नव्हती. या थरारक घटनेमागे काय रहस्य दडलं होतं? राकेश खेडेकर आणि गौरी सांबरेकर यांच्या प्रेमकहाणीचा शेवट इतका भयावह का ठरला?
राकेश खेडेकर – एक हुशार, यशस्वी सॉफ्टवेअर इंजिनियर. त्याची पत्नी, गौरी सांबरेकर – मिडीया क्षेत्रात करिअर घडवण्याची स्वप्न पाहणारी महत्त्वाकांक्षी तरुणी. दोघांनी घरच्यांच्या विरोधाला न जुमानता दोन वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला. लग्नानंतर मुंबईतील गजबजाट मागे सोडून बंगळुरुच्या शांतशीत वातावरणात नवीन आयुष्य सुरू करण्याचा त्यांचा निर्णय होता. पण, ही नव्याने बांधलेली दुनिया केवळ बाहेरून सुंदर होती आतून मात्र, तणाव, संशय आणि संघर्ष यांनी गुरफटलेली होती.
मंगळवार, रात्री ११ वाजले असतील. राकेश आणि गौरी यांच्यात नेहमीप्रमाणेच एका क्षुल्लक गोष्टीवरून वाद झाला. आवाज वाढला, तणाव वाढला. पण या वेळी राकेशचा राग अनावर झाला. त्याच्या हाताला लागला किचनमधला चाकू आणि एका क्षणात त्याने तीनवाये केले! काही क्षणांपूर्वी भांडणाऱ्या गौरीच्या किंकाळ्या क्षणात बंद झाल्या. रक्ताचा सडा पडलेला स्वयंपाकघर… आणि त्याच्या मध्ये उभा असलेला राकेश – सुन्न, अगदी घाबरलेला… राकेशने घाईघाईने एक मोठी सुटकेस आणली आणि गौरीचा मृतदेह त्यात कोंबला. हे इतकं सोपं नव्हतं. तिच्या निर्जीव शरीराचा भार त्याच्या आत्म्यालाही जड वाटत असावा. पण आता मागे फिरणं शक्य नव्हतं. तो तिच्या रक्ताने माखलेल्या हातांनी बाहेर पडला आणि थेट पुण्याचा रस्ता धरला.
गुन्हा करून पळणाऱ्या आरोपींपेक्षा राकेश वेगळा ठरला. कारण त्याने स्वतःच आपल्या वडिलांना फोन केला. “मी तिला संपवलं! ती मला खूप त्रास देत होती.” एका बापासाठी ही बातमी सहन करणे अशक्य होतं. राकेशच्या वडिलांनी धडपडत मुंबई पोलिसांपर्यंत हा प्रकार पोहोचवला.
बंगळुरु पोलिसांनी तातडीने त्याचा शोध घेतला आणि जेव्हा त्याने स्वतःच आपल्या अपार्टमेंटचा पत्ता सांगितला, तेव्हा त्यांनी कल्पनाही केली नव्हती की, तिथे त्यांना काय पाहायला मिळणार आहे.
बंगळुरु पोलिस जेव्हा त्या फ्लॅटमध्ये पोहोचले, तेव्हा त्या अंधाऱ्या खोलीत एक सुटकेस ठेवलेली होती – घट्ट बंद. पोलिसांनी ती उघडताच त्यांना भयानक दृश्य पाहायला मिळालं. गौरीचा रक्ताळलेला मृतदेह, थंड पडलेला चेहरा.
ही फक्त एक हत्या नव्हती, तर एका नात्याचा अंतिम शेवट होता. एकेकाळी ‘एकमेकांशिवाय जगू शकत नाही’ म्हणणारे दोन जीव आता एकमेकांसाठी शत्रू झाले होते. हा केवळ एका व्यक्तीचा गुन्हा आहे, की सामाजिक दबाव, मानसिक तणाव आणि प्रेमाच्या चुकीच्या कल्पनांनी घडवलेली शोकांतिका?
वारंवार प्रेमप्रकरणातून घडणाऱ्या या अशा घटनांमधून एकच प्रश्न निर्माण होतोय. प्रेमातला तणाव, गैरसमज आणि मनात साठवलेला राग याचा असा हिंस्र शेवट होऊ शकतो का?
याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला नक्की कळवा.