सोलापूरमधील बाळे परिसरातून हादरवून टाकणारी एक गंभीर घटना समोर आली आहे. प्रेमसंबंधांमधील फसवणुकीमुळे एका तृतीयपंथीय व्यक्तीने आत्महत्या केल्याचा आरोप त्या तृतीयपंथीच्या कुटुंबियांनी आणि गुरूंनी केला आहे. मागील अनेक वर्षांपासून एका तरुणासोबत प्रेमसंबंध असलेल्या या व्यक्तीने आपलं दुखणं सांगणारा एक व्हिडिओ रेकॉर्ड करून जीवघेणा निर्णय घेतल्याचं उघड झालं आहे.
१२ वर्षांचं नातं आणि शेवटचा निर्णय
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती आणि संबंधित तरुणामध्ये जवळपास १२ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. या काळात तरुणाने तृतीयपंथी व्यक्तीसोबत लग्न केले. पीडिताला त्यांच्या कुटूंबियांसमवेत सगळे संबंध तोडण्यास भाग पाडले असल्याचे व्हिडीओमध्ये सांगितले. नंतर त्या तरुणाने फसवणूक करत दुसरीकडे लग्नाची तयारी सुरू केल्याने पीडित व्यक्ती मानसिक तणावात गेली असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.
पीडित व्यक्तीने आत्महत्येपूर्वी केलेल्या व्हिडिओमध्ये, “आमचं आठ वर्षांचं नातं आहे. त्याने माझ्याशी लग्न करून मला समाजापासून दूर नेलं, माझ्याशी संपर्क तोडला. आता तो दुसरं लग्न करतोय. माझ्या मृत्यूला तोच जबाबदार आहे,” असे आरोप केले आहेत.
गुरूंचे गंभीर आरोप
तृतीयपंथीय समुदायातील गुरूंनीही गंभीर आरोप करत सांगितले की, त्या तरुणाने पीडित व्यक्तीला दुसरीकडे नेऊन ठेवले आणि जवळपास वर्षभर कोणालाही भेटू दिले नाही. त्यांना घराबाहेर जाण्यास मनाई होती, इतरांशी बोलण्यासही मज्जाव होता. मारहाण केल्याचाही आरोप त्यांनी केला.
त्यांनी पुढे सांगितले की, “माझ्या शिष्याने मरण्यापूर्वी व्हिडिओ करून सर्व सत्य सांगितलं आहे. पोलिसांनी त्या तरुणावर तात्काळ कारवाई करावी,” अशी मागणी गुरूंनी केली.
कुटुंबीयांचा आरोप– फसवणूक, पैसे आणि अत्याचार
कुटुंबीयांच्या मते, तरुणाने प्रेमसंबंधाच्या नावाखाली फसवणूक केली. पैशांपासून सोन्यापर्यंत अनेक गोष्टी घेतल्या. राहण्याची जागा बदलून वेगळं ठेवलं आणि त्याच्यावर मानसिक व शारीरिक त्रास दिला. शेवटी दुसरीकडे लग्न करण्याची तयारी सुरू केल्याने पीडित व्यक्तीने आत्महत्या केली, असा दावा नातेवाईकांनी केला.
पोलिस कारवाईची मागणी
घटनेनंतर सोलापूरच्या सरकारी रुग्णालय परिसरात तृतीयपंथीय समुदायाची मोठी गर्दी झाली. पीडित व्यक्तीच्या निधनानंतर आरोपी तरुणावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
