Mhada Lottery 2025: म्हाडाच्या 5285 घरांसाठी 13,891 अर्ज

Lifestyle News

महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (MHADA) च्या कोकण गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळाने ठाणे, वसई या ठिकाणी गृहनिर्माण योजनेअंतर्गत 5,285 निवासी सदनिका, तसेच सिंधुदुर्ग आणि कुळगाव-बदलापूर जिल्ह्यातील 77 भूखंडांच्या विक्रीसाठी लॉटरी जाहिर केली आहे.

या योजनेअंतर्गत अर्ज भरण्याची प्रक्रिया 14 जुलै 2025 रोजी दुपारी 1 वाजल्यापासून सुरू झाली, अगदी काही दिवसांतच म्हाडाकडे 13,891 अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी 5,165 अर्जदारांनी आधीच अनामत रक्कम भरली आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 13 ऑगस्ट 2025 असून, 14 ऑगस्ट 2025 च्या रात्री 11.59 वाजेपर्यंत अनामत रक्कम भरण्याची मुदत आहे.

पात्र अर्जांची तात्पुरती यादी 21 ऑगस्ट 2025 रोजी संध्याकाळी 6 वाजता म्हाडाच्या अधिकृत वेबसाइटवर प्रकाशित केली जाईल. तर तक्रारी व आक्षेप नोंदविण्याची अंतिम तारीख 25 ऑगस्ट 2025 संध्याकाळी 6 वाजेपर्यंत असेल. पात्र अर्जदारांची अंतिम यादी 1 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजता त्याच वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाईल.

लॉटरीची सोडत 3 सप्टेंबर रोजी
3 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता, ठाण्यातील डॉ. काशीनाथ घाणेकर सभागृहात संगणकीकृत पद्धतीने लॉटरीची सोडत काढली जाईल. अर्जदारांना एसएमएस, ईमेल आणि मोबाईल अॅप्लिकेशनद्वारे लॉटरीचा निकाल मिळेल.

पाच गृहनिर्माण योजनांमध्ये फ्लॅट्स उपलब्ध
ही लॉटरी पाच घटकांमध्ये विभागली गेली आहे. 20 टक्के समावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत 565 घरे उपलब्ध आहेत. तर 15 टक्के एकात्मिक नागरी गृहनिर्माण योजनेअंतर्गत 3002 घरे उपलब्ध आहेत. कोकण गृहनिर्माण योजनेअंतर्गत 1,677 घरे असून, यामध्ये 50 टक्के परवडणाऱ्या गृहनिर्माण श्रेणी अंतर्गत 41 घरे उपलब्ध आहेत. याशिवाय कोकण बोर्ड गृहनिर्माण योजनेअंतर्गत 77 निवासी भूखंड उपलब्ध आहेत.

Leave a Reply