Jabari Khabari – Latest Marathi News | ताज्या बातम्या

HEADLINES

मराठी माणसाला “आपटून मारू” म्हणणाऱ्या दुबेंना महिला खासदारांचा दणका

मराठी माणसाला "आपटून मारू" म्हणणाऱ्या दुबेंना महिला खासदारांचा दणका

भाषेवरून मराठी माणसाबद्दल अरेरावीची भाषा वापरणाऱ्या भाजप खासदार निशिकांत दुबे यांना महाराष्ट्रातील काही महिला खासदारांनी चांगलाच दणका दिला. अधिवेशनानंतर संसदेच्या लॉबीमध्ये येताच दुबेंना महिला काँग्रेस खासदारांनी घेराव घालत त्यांच्या वक्तव्याबद्दल जाब विचारला. महिलांच्या घेरावातून कसाबसा मार्ग काढत दुबेंनी स्वत:ची सुटका करून घेतली. यानंतर लॉबी परिसर जय महाराष्ट्रच्या घोषणांनी दणाणला.

संसदेत नेमके काय घडले?
बुधवारी लोकसभेचे कामकाज तहकूब झाल्यानंतर काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड, शोभा बच्छाव, प्रतिभा धानोरकर या निशिकांत दुबे यांना शोधत होत्या. निशिकांत दुबे संसदेच्या लॉबीमध्ये येताच तिघींनी त्यांना घेरून प्रश्नांची सरबत्ती केली. “मराठी लोकांना मारण्याची भाषा तुम्ही कसे करू शकता? तुम्ही आपटून आपटून कुणाला आणि कसे मारणार? कसली ही तुमची अर्वाच्च भाषा? तुमचे वागणे बोलणे योग्य नाही. मराठी भाषिंकाविरूद्ध ही अरेरावी खपवून घेतली जाणार नाही.” अशा शब्दांत वर्षा गायकवाड यांनी दुबेंना सुनावले. महिला खासदारांचा रूद्रावतार पाहून निशिकांत दुबे यांनी “आप तो मेरी बहन हो”, असे म्हणत हात जोडून तिथून पळता पाय काढला. यानंतर गायकवाड यांनी “जय महाराष्ट्र” अशा घोषणा देत लॉबी दणाणूण सोडली.

अवघ्या काही मिनिटांत घडलेल्या या घडामोडीची संसद परिसरात चांगलीच चर्चा रंगली. घडलेल्या प्रकारामुळे मराठी खासदारांच्या चेहऱ्यावर हसू उमटले होते.

नेमके काय होते निशिकांत दुबे यांचे वक्तव्य
“मराठी माणसे कुणाची भाकरं खातात? मराठी लोक आमच्या पैशांवर जगतायत! कोणते उद्योग आहेत यांच्याकडे? किती टॅक्स भरतात हे? असे म्हणत मराठी माणसाला दुबे यांनी डिवचले होते. त्याचबरोबर ठाकरे बंधूंना उद्देशून तुम्ही खरंच बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार असाल, तर तुमच्या जवळील माहीम दर्गावर जावं आणि तेथील उर्दु भाषिकांना मारुन दाखवावं, आपल्या घरात कोणीही सिंह असतो. तुमच्यात हिंमत असेल तर बिहार, तामिळनाडू, उत्तरप्रदेशात या, तुम्हाला दाखवून देऊ…महाराष्ट्राबाहेर या, तुम्हाला आपटून आपटून मारु असे म्हटले होते. यावरून वाद अधिकचं चिघळला.

 

About The Author

SHARE THIS POST :

Facebook
Twitter
LinkedIn
Pinterest