
‘मामाच्या गोव्याला जाऊया’ची बॉक्स ऑफिसवर हळूहळू रंगणारी ट्रिप! २०२६ मधील मराठी चित्रपटांच्या ओपनिंग वीकेंडमध्ये ९व्या स्थानावर झेप!!!
गोव्याच्या ट्रिपचं एक वैशिष्ट्य असतं… सुरुवातीला मित्र वेळेवर जमतील का, गाडी निघेल का, याचाच गोंधळ असतो. पण एकदा का प्रवास सुरू झाला की मग धमाल थांबत नाही! अगदी अशीच काहीशी गोष्ट ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ या मराठी विनोदी चित्रपटाचीही पाहायला मिळत आहे.
पहिल्या दोन दिवसांत संथ वाटचाल करणाऱ्या या चित्रपटाने रविवारी मात्र भन्नाट मुसंडी मारली. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने स्वतःचं अस्तित्व ठळकपणे दाखवून दिलं आहे. विशेष म्हणजे, २०२६ मधील मराठी चित्रपटांच्या सर्वात मोठ्या ओपनिंग वीकेंडच्या यादीत ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ने ९वे स्थान पटकावले आहे.
रविवारी मिळाला ‘फुल ऑन’ प्रतिसाद
चित्रपटाने प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी, म्हणजे रविवारी ४१ लाख रुपयांची नेट कमाई केली. शनिवारी मिळालेल्या २३ लाख रुपयांच्या तुलनेत तब्बल ७८.२६ टक्क्यांची वाढ ही कोणत्याही चित्रपटासाठी सकारात्मक संकेत मानली जाते.ही वाढ फक्त आकड्यांपुरती नाही, तर प्रेक्षकांमध्ये चित्रपटाची चर्चा वाढत असल्याचंही लक्षण आहे. सोशल मीडियावरील प्रतिक्रिया, मित्रांकडून मिळणाऱ्या शिफारसी आणि कुटुंबासोबत पाहण्याजोगा हलकाफुलका मनोरंजनाचा पर्याय म्हणून चित्रपटाकडे अनेकांचा कल वाढताना दिसत आहे.
पहिल्या वीकेंडची कमाई किती?
पहिल्या तीन दिवसांत ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ने भारतीय बॉक्स ऑफिसवर अंदाजे ७२ लाख रुपये नेट, तर ८४ लाख रुपये ग्रॉस कमाई केली आहे. आकडे अपेक्षे एवढे मोठे नसले तरी चित्रपटासाठी अजूनही खेळ संपलेला नाही. कारण मराठी चित्रपटांमध्ये अनेकदा चांगल्या चर्चेच्या जोरावर दुसऱ्या आठवड्यापासून प्रेक्षकसंख्या वाढल्याची अनेक उदाहरणे आहेत.
खरी परीक्षा आता वीकडेजची
बॉक्स ऑफिसवरील यशाचा निर्णय केवळ पहिल्या वीकेंडवर होत नाही. सोमवारपासून गुरुवारपर्यंत चित्रपट किती स्थिर कमाई करतो, यावर त्याचा पुढील प्रवास अवलंबून असतो. जर ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ने आठवड्याच्या दिवसांतही हीच गती कायम ठेवली, तर हा चित्रपट हळूहळू मजबूत कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांच्या यादीत स्थान मिळवू शकतो. एकंदरीत, सुरुवात जरी सावध झाली असली तरी गोव्याच्या या ट्रिपला आता वेग येताना दिसत आहे. पुढील काही दिवसांत प्रेक्षकांचा प्रतिसाद असाच वाढत राहिला, तर ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ची ही बॉक्स ऑफिस सफर आणखी रंगतदार होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.



