Jabari Khabari – Latest Marathi News | ताज्या बातम्या

HEADLINES

लग्न नको म्हणून रचला सिने स्टाईल प्लॅन; सापाची कात ठेवून प्रियकरासोबत काढला पळ

उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यात एक धक्कादायक आणि तितकाच फिल्मी प्रकार समोर आला आहे. लग्नापासून सुटका करून घेण्यासाठी एका २५ वर्षीय तरुणीने असा काही प्लॅन रचला की, संपूर्ण गाव काही काळासाठी दहशतीत गेलं. ‘इच्छाधारी नागीण’ची अफवा पसरल्यानंतर गावकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली; मात्र पोलिस तपासात वेगळंच सत्य समोर आलं.

सदर घटना फफूंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. रीना (नाव बदललेले) हिचं लग्न तिच्या कुटुंबीयांनी ठरवलं होतं. मात्र तिला हे नातं मान्य नव्हतं. ती या लग्नामुळे नाराज होती. कुटुंबीयांना थेट विरोध करण्याऐवजी तिने वेगळाच मार्ग निवडला. घरातून पळून जाण्यापूर्वी रीनाने एक धक्कादायक प्लॅन आखला. रात्रीच्या वेळी ती शांतपणे घराबाहेर पडली. मात्र जाण्यापूर्वी तिने आपल्या खोलीतील बेडवर तब्बल ५ फूट लांबीच्या सापाची कात आणि काही बांगड्या ठेवून दिल्या.

सकाळी बराच वेळ ती खोलीबाहेर आली नाही, तेव्हा कुटुंबीयांना संशय आला. खोलीत जाऊन पाहिल्यावर सापाची कात दिसताच घरात आणि नंतर संपूर्ण गावात एकच गोंधळ उडाला. कोणी म्हणू लागले की ती ‘इच्छाधारी नागीण’ होती आणि कात टाकून निघून गेली. काहींनी याला चमत्काराचा रंग दिला. पाहता पाहता तिच्या घराबाहेर मोठी गर्दी जमली. अफवा वाऱ्यासारखी पसरल्यानंतर एका गावकऱ्याने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला. चौकशीत समोर आलं की रीनाचे आधीपासूनच प्रेमसंबंध सुरू होते. तिच्या घरच्यांना हे मान्य नव्हतं आणि त्यांनी तिचं लग्न दुसरीकडे ठरवलं होतं. लग्न टाळण्यासाठी आणि कोणालाही संशय येऊ नये म्हणून रीनाने ‘नागीण’ बनल्याचा नाट्यमय प्लॅन रचला. त्यानंतर ती रात्रीच्या अंधारात प्रियकरासोबत पळून गेली.

प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी तपास सुरू केला असता रीनाचे आधीपासूनच प्रेमसंबंध असल्याचं समोर आलं. कुटुंबीयांनी तिचं लग्न दुसरीकडे ठरवल्यामुळे तिने हा बनाव रचल्याचं तपासात स्पष्ट झालं. रात्रीच्या वेळी ती प्रियकरासोबत घरातून निघून गेल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिस सध्या त्या तरुणीचा आणि तिच्या प्रियकराचा शोध घेत आहेत. अद्याप त्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही. या घटनेमुळे गावात अंधश्रद्धा, अफवा आणि वास्तव यावर चर्चा रंगल्या आहेत.

About The Author

SHARE THIS POST :

Facebook
Twitter
LinkedIn
Pinterest