मुंबईतील रंगभूमीचा एक अनमोल ठेवा – पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आता नूतनीकरणानंतर नव्या रूपात रंगकर्मी आणि कलाप्रेमींच्या सेवेत दाखल होत आहे. शुक्रवार, २८ फेब्रुवारी २०२५ रोजी संध्याकाळी ६:०० वाजता, या अत्याधुनिक संकुलाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री शिवेंद्रसिंह भोसले, खासदार अनिल देसाई, आमदार महेश सावंत यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होईल.
रंगभूमीचे नवे युग सुरू
पु. ल. देशपांडे कला अकादमी ही केवळ एक वास्तू नाही, तर ती महाराष्ट्राच्या रंगभूमीचा आत्मा आहे. विविध कला प्रकारांना प्रोत्साहन देणाऱ्या या संकुलाने अनेक प्रतिभावान कलाकार घडवले आहेत. याच परंपरेला नवा साज चढवणारे नवीन बोधचिन्ह अनावरणाच्या तयारीत आहे.
नव्या अकादमीची वैशिष्ट्ये
नूतनीकरणानंतर अकादमी अधिक अत्याधुनिक आणि सुविधायुक्त झाली आहे.
- रवींद्र नाट्यमंदिर व लघु नाट्यगृहे – अत्याधुनिक ध्वनी तंत्रज्ञान आणि अंतर्गत सजावट
- प्रदर्शन व तालीम दालने – कलाकारांसाठी उत्कृष्ट सुविधा
- नवीन खुला रंगमंच – निसर्गरम्य आणि सुसज्ज
- आभासी चित्रीकरण व ध्वनी संकलन कक्ष – डिजिटल युगातील अत्याधुनिक कला सुविधा
- कलाविषयक अभ्यासक्रम – २० प्रकारचे प्रमाणपत्र व पदविका अभ्यासक्रम लवकरच सुरू
कलाकार आणि रसिकांसाठी पर्वणी
लोककला, अभिजात कला, दृश्यात्मक आणि दृकश्राव्य कला यांना पूरक ठरणारे हे संकुल नवोदित आणि दिग्गज कलाकारांसाठी पर्वणी ठरणार आहे. नाटक, संगीत, चित्रपट आणि दृकश्राव्य माध्यमांसाठी आवश्यक अशा सर्व आधुनिक सुविधा येथे उपलब्ध आहेत.
महाराष्ट्राच्या रंगभूमीचे भविष्य उज्ज्वल
रंगभूमीच्या विकासाला नवा आयाम देणारे पु. ल. देशपांडे कला अकादमी संकुल नव्या युगात प्रवेश करत आहे. कलाक्षेत्र, शिक्षण, नवसंजीवनी आणि नवकल्पना यांचे हक्काचे व्यासपीठ असलेल्या या संकुलाचे उद्घाटन सोहळा रसिकांसाठी एक संस्मरणीय क्षण ठरणार आहे.२८ फेब्रुवारी २०२५ – नाट्यरसिक, कलाकार आणि कलाप्रेमींसाठी हा दिवस अविस्मरणीय ठरणार आहे!
