आजच्या बदलत्या कॉर्पोरेट संस्कृतीत ऑफिसमध्ये निर्माण होणारे खासगी संबंध सामान्य होत चालले आहेत. कामाच्या ठिकाणी दीर्घकाळ एकत्र वेळ घालवताना अनेकांच्या आयुष्यात सहकाऱ्यांशी जवळीक वाढत असल्याचे जगभरात दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या एका मोठ्या जागतिक सर्वेक्षणातून भारताबाबत आश्चर्यकारक माहिती समोर आली आहे. ऑफिस अफेअर्समध्ये भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे.
‘ॲशले मॅडिसन’ आणि ‘यूगव्ह’ या दोन संस्थांनी ११ देशांतील १३,५८१ प्रौढांवर हा अभ्यास केला. मेक्सिको या यादीत सर्वाधिक वर असून तिथे ४३% लोकांनी सहकाऱ्यासोबत नातं असल्याचे मान्य केले. त्यानंतर लगेच भारताचा क्रम लागतो. भारतातील ४०% प्रतिसादकर्त्यांनी ऑफिसमधील व्यक्तीसोबत प्रेमसंबंध ठेवल्याचे सांगितले.
अमेरिका, ब्रिटन आणि कॅनडासारख्या विकसित देशांमध्ये हे प्रमाण सुमारे ३०% असून तुलनेने कमी आहे. यावरून दिसते की डिजिटल युगात प्रोफेशनल बाउंडरीजची चर्चा वाढली असली तरी, कामाच्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या वैयक्तिक नात्यांची संख्या भारतात अजूनही मोठ्या प्रमाणात आहे.
या अभ्यासात पुरुष आणि महिलांच्या अनुभवांमध्ये स्पष्ट फरक दिसून आला. पुरुषांपैकी अर्ध्याहून अधिक (५१%) जणांनी ऑफिस अफेअरची कबुली दिली, तर महिलांमध्ये हे प्रमाण ३६% होते. वैयक्तिक किंवा व्यावसायिक परिणामांच्या भीतीमुळे अनेक जण अशा नात्यांपासून दूर राहतात. २९% महिलांनी करिअरवर परिणाम होईल या भीतीने ऑफिस रिलेशन टाळल्याचे सांगितले, तर पुरुषांमध्ये हा आकडा २७% होता.
१८ ते २४ वयोगटातील तरुण कर्मचारी मात्र या बाबतीत सर्वाधिक सजग आहेत. ३४% तरुणांना अशा संबंधांचा नोकरीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो, अशी भीती आहे. हे GEN Z मध्ये वाढणारी व्यावसायिकता आणि वैयक्तिक सीमांची जाण अधोरेखित करते.
लांब कामाचे तास, सततचा ताण आणि भावनिक आधाराची कमतरता ही ऑफिस अफेअर्स वाढण्याची प्रमुख कारणे असल्याचे अभ्यासकांचे निरीक्षण आहे. अनेक कर्मचाऱ्यांची जीवनशैली अशी बनली आहे की घरापेक्षा ऑफिसमध्ये जास्त वेळ जातो. त्यामुळे सहकाऱ्यांशी नैसर्गिकरीत्या जवळीक वाढण्याची शक्यता अधिक असते.
समुपदेशन मानसशास्त्रज्ञ सांगतात की, अनेक जण भावनिक एकाकीपणा किंवा नात्यातील अंतरामुळे ऑफिसमध्ये मिळणाऱ्या ‘अटेंशनकडे’ आकर्षित होतात. जोडीदाराकडून दुर्लक्ष झाल्याची भावना किंवा सततची भांडणे या गोष्टींमुळे लोकांना बाहेर कुठे तरी आधार शोधण्यास प्रवृत्त करतात. मोठ्या शहरांमध्ये तर ही परिस्थिती आणखी गुंतागुंतीची होते.
विशेषज्ञांच्या मते, ऑफिस अफेअर्स बहुधा जास्त काळ टिकत नाही. सुरुवातीची उत्सुकता संपल्यावर नात्यात ताण येऊ लागतो आणि अनेकदा दोघांच्या वैयक्तिक तसेच व्यावसायिक आयुष्यावरही त्याचा विपरीत परिणाम होतो.अस्थिर वैयक्तिक जीवनामुळे कामातील लक्ष कमी होते, कामाविषयीची आवड घटते आणि करिअरची दिशा ढळते, असे मानसोपचार तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
सर्वेक्षणातून हे स्पष्ट होते की आधुनिक कामकाजाच्या पद्धतींमुळे ऑफिस हे फक्त कामाचे ठिकाण न राहता सामाजिक आणि भावनिक नात्यांचे केंद्र बनत आहे. पण अशी नाती जितकी सहज निर्माण होतात, तितकीच त्यांची गुंतागुंतही वाढत असते. त्यामुळे वैयक्तिक मर्यादा, व्यावसायिक नीती आणि भावनिक आरोग्य या तिन्ही गोष्टींची जाणीव ठेवूनच अशा नात्यांना सामोरे जाण्याची गरज आहे.
