Vande mataram 150:युद्धगीत ते राष्ट्रीय गीत! वंदे मातरम् ची Untold Story

Vande mataram 150 Vande Mataram 150

थोर कादंबरीकार, संपादक, कवी आणि तत्त्वज्ञ बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी 1875 साली लिहिलेल्या ‘वंदे मातरम्’ या भारतमातेच्या स्तुतीगीताला येत्या 7 नोव्हेंबर रोजी 150 वर्ष पूर्ण होत आहेत. भारतीयांच्या मनात राष्ट्रभावना जागृत करण्यात मोलाचा वाटा असलेल्या या गीताचा वर्धापन दिन धूमधडाक्यात साजरा करण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं विशेष नियोजन सुरू केलंय. या दिवशी संपूर्ण राज्यभर विशेष कार्यक्रम घेतले जाणार आहेत.

‘वंदे मातरम्’चा जन्म कसा झाला? :

बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी 1870 च्या सुमारास रचलेलं ‘वंदे मातरम्’ हे गीत ‘आनंद मठ’ या कादंबरीत क्रांतिकारकांचं युद्धगीत म्हणून समाविष्ट केलं. मातृभूमीला माता मानून तिची स्तुती करणारं हे गीत पुढं स्वातंत्र्य चळवळीचा आत्मा बनलं. 1905 च्या बंगाल फाळणीविरोधी आंदोलनात या गीतानं स्वातंत्र्य सैनिकांना प्रेरणा दिली. काँग्रेसच्या अधिवेशनांमध्येही हे गीत गायले जाऊ लागले.
मातृभूमीला देवीच्या रूपात चित्रित करणाऱ्या या गीतानं भारतीय अस्मितेचा उद्घोष केला. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या या साहित्यकृतीनं तत्कालीन सामाजिक आणि राजकीय परिस्थितीत क्रांतिकारी बदल घडवले. आजही ‘वंदे मातरम्’ ऐकताना प्रत्येक भारतीयांच्या मनात देशप्रेमाची ज्योत प्रज्वलित होते.
भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या ‘आनंद मठ’ या कादंबरीला आणि त्यातील ‘वंदे मातरम्’ या गीताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. 1882 मध्ये प्रकाशित झालेली ही बंगाली कादंबरी आणि त्यातील ‘वंदे मातरम्’ हे गीत देशभक्ती आणि राष्ट्रीय अस्मितेचं प्रतीक मानलं जातं. ‘आनंद मठ’ ही कादंबरी 18 व्या शतकातील बंगालमधील संन्यासी बंडखोरीवर आधारित आहे. या कादंबरीत संन्यासी आणि फकीरांनी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि स्थानिक जुलमी जमींदारांविरुद्ध केलेल्या लढ्याचं चित्रण आहे.

१९०५ मध्ये बंगालच्या फाळणीच्या ब्रिटिश निर्णयाला प्रतिसाद म्हणून सुरू झालेल्या भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वदेशी चळवळ हा एक महत्त्वाचा भाग होता. या चळवळीने भारतीयांना ब्रिटिश वस्तूंवर बहिष्कार टाकण्यास आणि त्याऐवजी भारतीय बनावटीच्या उत्पादनांना प्रोत्साहन देण्यास प्रोत्साहित केले. ब्रिटिश अर्थव्यवस्थेला धक्का पोहोचवण्यासाठी आणि राष्ट्रीय अभिमानाची भावना वाढवण्यासाठी हे केले गेले. देशभरातील लोकांनी केवळ भारतीय बनावटीच्या वस्तूंचा वापर करून, निदर्शने आयोजित करून आणि स्वावलंबनाच्या कल्पनेला चालना देऊन यात भाग घेतला. ब्रिटिश राजवटीविरुद्ध भारतीयांना एकत्र करण्यात स्वदेशी चळवळीने महत्त्वाची भूमिका बजावली आणि भविष्यातील स्वातंत्र्यलढ्यांचा पाया रचला.

विसाव्या शतकाच्या सुरुवातीला स्वदेशी चळवळीदरम्यान, “वंदे मातरम्” हे ब्रिटिश आर्थिक धोरणाच्या प्रतिकाराचे एक महत्त्वाचे प्रतीक बनले. हे स्तोत्र मुक्तिसंग्रामातील सैनिक, कार्यकर्ते आणि नियमित रहिवासी यांनी गायले होते, ज्यामुळे अन्यायाला तोंड देताना प्रेरणा आणि बळ मिळाले.

बाळ गंगाधर टिळक, लाला लजपत राय आणि अरबिंदो घोष यांसारख्या नेत्यांनी “वंदे मातरम्” या गाण्याचा वापर एकात्मतेचा नारा म्हणून केला आणि ते लवकरच भारताच्या स्वातंत्र्य चळवळीच्या भावनेशी जोडले गेले. ब्रिटीशांनी हे गाणे दडपण्याचा प्रयत्न केला, जनतेला उत्तेजन देण्याची त्याची क्षमता ओळखून, परंतु त्यांच्या प्रयत्नांमुळे त्याची लोकप्रियता वाढली.

कोण होते बंकिमचंद्र चट्टोपाध्याय?
26 जून 1838 रोजी कलकत्त्याजवळील नहाटी इथं जन्मलेलं बंकिमचंद्र चट्टोपाध्याय हे आधुनिक भारतीय साहित्यातील अग्रणी कादंबरीकार होते. 1858 मध्ये कलकत्ता विद्यापीठाचे पहिले पदवीधर होऊन त्यांनी सरकारी नोकरी स्वीकारली. ‘राजमोहन्स वाइफ’ (1864) ही त्यांची पहिली इंग्रजी कादंबरी, तर ‘दुर्गेशनंदिनी’, ‘कपालकुंडला’, ‘मृणालिनी’, ‘विषवृक्ष’, ‘इंदिरा’, ‘चंद्रशेखर’, ‘राजसिंह’ आणि ‘आनंदमठ’ (1882) या बंगाली कादंबऱ्यांनी त्यांना ख्याती मिळवून दिली. ‘बंगदर्शन’ नियतकालिकाचे संपादन करत त्यांनी वैचारिक लेखनाला चालना दिली. आधुनिक भारतीय कादंबरी लेखनाची पायाभरणी करून त्यांनी सामाजिक, कौटुंबिक आणि ऐतिहासिक विषय हाताळले. बंगाली साहित्याला समृद्ध करणाऱ्या बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांचं 1894 मध्ये निधन झालं.

मूळ वंदे मातरम तुम्हाला माहीत आहे का?
वंदे मातरम या राष्ट्रीय गीतातील आपण दोनच श्लोक म्हणतो. पण तुम्हाला मूळ वंदे मातरम गीत माहीत आहे का?
वन्दे मातरम्
सुजलां सुफलां मलयजशीतलाम्
शस्य श्यामलां मातरं ।
शुभ्र ज्योत्स्ना पुलकित यामिनीम्
फुल्ल कुसुमित द्रुमदलशोभिनीम्,
सुहासिनीं सुमधुर भाषिणीम् ।
सुखदां वरदां मातरम् ॥ वन्दे मातरम्
सप्त कोटि कण्ठ कलकल निनाद कराले
निसप्त कोटि भुजैर्धृउत खरकरवाले
के बोले मा तुमी अबले
बहुबल धारिणीं नमामि तारिणीम्
रिपुदलवारिणीं मातरम् ॥ वन्दे मातरम्
तुमि विद्या तुमि धर्म, तुमि हृदि तुमि मर्म
त्वं हि प्राणाः शरीरे
बाहुते तुमि मा शक्ति,
हृदये तुमि मा भक्ति,
तोमारै प्रतिमा गडि मन्दिरे मन्दिरे ॥ वन्दे मातरम्
त्वं हि दुर्गा दशप्रहरणधारिणी
कमला कमलदल विहारिणी
वाणी विद्यादायिनी, नमामि त्वाम्
नमामि कमलां अमलां अतुलाम्
सुजलां सुफलां मातरम् ॥ वन्दे मातरम्
श्यामलां सरलां सुस्मितां भूषिताम्
धरणीं भरणीं मातरम् ॥ वन्दे मातरम्

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *