आजच्या स्वार्थी जगात कुणी साधं चॉकलेट सुद्धा शेअर करत नाहीत, मग आपला जीवनसाथी शेअर करणं तर लांबचं राहिलं. आताचं उदाहरण द्यायचं झाल्यास “कोल्ड प्ले” कॉन्सर्टमध्ये एका जोडप्याचं भाडं उघडं पडलं. त्यानंतर त्या जोडप्याची झालेली पळापळ अगदी जगभर प्रसिद्ध झाली.
भारत याबाबतीत थोडा वेगळा आहे. भारताला विविध परंपरा, रूढी, प्रथांचा इतिहास आहे. प्रत्येक भागात वेगवेगळ्या परंपरा, सवयी, आणि जीवनशैली आढळून येतात. काही परंपरा काळाच्या पडद्या आड झाल्या असल्या तरी काही परंपरा अजूनही जिवंत आहेत. अशीच एक अनोखी प्रथा हिमाचल प्रदेशात आजही जिवंत आहे. या प्रथेचे नाव “द्रौपदी प्रथा” असे आहे.
नुकतेच हिमाचल प्रदेशातील “हट्टी” समाजातील एका महिलेने द्रौपदी प्रथेनुसार दोन भावांशी लग्न केले. या लग्नाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. हिमाचल प्रदेशातील सिरमौर जिल्ह्यात हे लग्न पार पडले. जे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहे. शिलाई गावातील प्रदिप नेगी आणि कपिल नेगी या दोन बंधूंचा कुन्हट गावातील सुनीता हिच्याशी विवाह संपन्न झाला. तिथल्या गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही त्यांची पुर्वापार चालत आलेली प्रथा आहे. त्यामुळे असा विवाह त्यांच्यासाठी नवलाची गोष्ट नाही. काही वेळा एका घरात तीन किंवा चार भाऊ असतील तर तिथे देखील कुटुंबीय आणि वधू वरांच्या संमत्तीने असे विवाह लावले जातात.
काय आहे ही द्रौपदी प्रथा?
महाभारतातील द्रौपदी विवाह कथेशी याचा संबंध आहे. द्रौपदी प्रथेला बहुपती प्रथा असेही म्हणतात. या प्रथेनुसार एक महिला एकाच कुटुंबातील भावांशी लग्न करते. ही प्रथा मुख्यत: हिमाचल प्रदेशातील सिरमौर, किन्नौर भागांमध्ये आढळते.
या प्रथेमागे काही सामाजिक आणि आर्थिक कारण असल्याचे सांगितले जाते. डोंगराळ भागातील लोकसंख्या कमी असल्याने, शेतीची जागा कमी असते. अशात जर सगळ्या भावंडांनी वेगवेगळे कुटुंब प्रस्थापित केल्यास मालमत्ता वाटणीचा प्रश्न उद्भवू शकतो. यामुळे एकाच महिलेशी विवाह करून कुटुंब एकत्र ठेवण्याचा प्रयत्न केला जातो.
भारतीय कायद्यानुसार, बहुपती करणे हे बेकायदेशीर आहे. त्यामुळे अशा विवाहांचा सरकारी किंवा कायदेशीर नोंदवहित समावेश केला जात नाही. तरीही काही भागांत ही प्रथा अजूनही सांस्कृतिक व पारंपारिक स्वरूपात अस्तित्वात आहे.