Ram Mandir

Ram Mandir:‘रामायण कंट्री’मध्ये बांधले जाणार अयोध्येपेक्षाही भव्य राम मंदिर!

News

Ram temple in Trinidad and Tobago: ‘रामायण कंट्री’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, त्रिनिदाद आणि टोबॅगो या देशांत भव्य राम मंदिर उभारले जाणार आहे. त्रिनिदाद आणि टोबॅगो हे एक बेट राष्ट्र आहे. या देशाची राजधानी पोर्ट ऑफ स्पेनमध्ये भव्य राम मंदिर उभारण्याची परवानगी या देशातील प्रशासनाने दिली आहे. या देशात लाखोंच्या संख्येने हिंदूंचे वास्तव्य आहे. कॅरेबियनमध्ये हिंदू धर्माचे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक केंद्र म्हणून स्वतःची ओळख निर्माण करण्याच्या दिशेने उचललेले एक पाऊल म्हणून या देशात राम मंदिर उभारले जाणार आहे. या देशाला ‘रामायण कंट्री’ का म्हटले जाते? इथे राम मंदिर उभारण्याचे कारण काय? भारताचा या देशाशी संबंध काय? त्याविषयी सविस्तर जाणून घेऊयात…

त्रिनिदाद आणि टोबॅगोमध्ये राम मंदिर
त्रिनिदाद आणि टोबॅगोमध्ये हिंदू आणि भारतीय वंशाचे लोक मोठ्या संख्येने राहतात. त्रिनिदाद आणि टोबॅगोमध्ये लवकरच भगवान रामाला समर्पित एक भव्य मंदिर बांधण्यात येणार आहे. या देशात गेल्या अनेक दशकांपासून भारतीयांचे वास्तव्य आहे. पब्लिक युटीलिटी मिनिस्टर बॅरी पदरथ यांनी सांगितले आहे की, सरकार या उपक्रमाला जोरदार पाठिंबा देत आहे. या वर्षाच्या सुरुवातीला अयोध्येतील श्री रामाच्या मूर्तीची प्रतिकृती कॅरेबियन राष्ट्रात आणण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि धार्मिक नेत्यांमध्ये चर्चा सुरु आहे.

एएनआयच्या वृत्तानुसार, “त्रिनिदाद आणि टोबॅगोला अनेकदा रामायण कंट्री किंवा रामायणाचा देश म्हणून संबोधले जाते. रामलल्ला उपक्रमाचे आम्ही स्वागत करतो. आम्ही त्याला पाठिंबा देतो,” असे पदरथ म्हणाले. त्यातून भारताबाहेर हिंदू परंपरा जपण्यात या बेट राष्ट्राची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित होते. मंत्र्यांनी सांगितले की, मंदिराच्या प्रकल्पाबाबत सरकारी अधिकारी सक्रियपणे चर्चा करीत आहेत. ही चर्चा न्यूयॉर्कमधील ‘ओव्हरसीज फ्रेंड्स ऑफ राम मंदिर’चे संस्थापक प्रेम भंडारी यांच्या प्रस्तावानंतर सुरू झाली आहे. त्यांनी उत्तर प्रदेशातील अयोध्येला भेट देऊ न शकणाऱ्या उत्तर अमेरिकेतील भक्तांसाठी कॅरेबियन देशात ‘अयोध्या नगरी’ म्हणजेच हिंदू धार्मिक-आध्यात्मिक केंद्र विकसित करण्याची कल्पना मांडली होती.

भंडारी यांनी त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या पंतप्रधान कमला परसाद-बिसेसर यांच्यासमोर ही कल्पना मांडली. मे २०२५ मध्ये अयोध्येतील मंदिरातील रामलल्ला मूर्तीच्या प्रतिकृतीचे त्रिनिदादमध्ये अनावरण करण्यात आले. त्रिनिदाद आणि टोबॅगोमधील ‘अयोध्या श्रीराम संस्थे’चे अध्यक्ष अमित अलाघ तसेच भंडारी यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या या भव्य कार्यक्रमाला १०,००० हून अधिक भाविकांनी गर्दी केली होती.

या राम मंदिराची वैशिष्ट्ये काय?
या जुळ्या बेटांच्या राष्ट्रात आज अनेक हिंदू मंदिरे आहेत. पब्लिक युटीलिटी मिनिस्टर पदरथ यांच्या मते, त्रिनिदाद आणि टोबॅगो हिंदू धार्मिक भावना व्यक्त करण्यासाठी या प्रदेशातील एक प्रमुख स्थान ठरत आहे. १९ व्या शतकात भारतीय करारबद्ध कामगार आल्यापासून या भागात भगवद् गीता आणि रामायणाचे पठण पिढ्यान् पिढ्या सुरू आहे. पदरथ यांनी एएनआयकडे स्पष्ट केले, “भारतातील सांस्कृतिक आणि धार्मिक अभिव्यक्तीला, विशेषतः हिंदू धर्माला या प्रदेशात जपले गेले आहे आणि त्याला जिवंत ठेवले आहे.” आजही येथे हनुमान मंदिर, शिव मंदिर, तसेच दिवाळी नगर यांसारखी सांस्कृतिक ठिकाणे आहेत.

पदरथ म्हणाले की, प्रस्तावित राम मंदिर केवळ पूजास्थान म्हणून नव्हे, तर सांस्कृतिक शिक्षण, सामुदायिक मेळावे, आध्यात्मिक उपक्रम व पर्यटनासह अनेक उद्देशांसाठी प्रभावी ठरेल. या प्रस्तावित मंदिराचे अयोध्येतील पवित्र स्थळाशी असलेले संबंध जगभरातील हिंदू वंशाच्या लोकांना आकर्षित करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. “राम मंदिर केवळ भक्तीचे ठिकाण नसेल, तर सांस्कृतिक जतन करण्याचे केंद्र आणि जागतिक स्तरावरील भारतीय वंशाच्या लोकांसाठी तीर्थक्षेत्र असेल,” असे पदरथ पुढे म्हणाले.

मंत्रिमहोदयांनी आगामी महिन्यांत मंदिराच्या प्रकल्पाबद्दल आणि देशातील हिंदू धार्मिक जीवनाला पाठिंबा देण्यासाठीच्या इतर उपक्रमांबद्दल मोठी घोषणा करणार असल्याचे सांगितले आहे. त्रिनिदाद आणि टोबॅगोमध्ये शिवरात्री, होळी, गणेशोत्सव, नवरात्र व दसरा यांसारखे भारतीय सण साजरे केले जातात. त्यात स्थानिक, तसेच इतर समुदायांचे नागरिकही सहभागी होतात.

Leave a Reply