‘द काश्मीर फाईल्स’ आणि ‘द व्हॅक्सीन वॉर’ सारखे संवेदनशील विषय हाताळणारे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री पुन्हा एकदा त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. अलीकडेच ‘कर्ली टेल्स’ला दिलेल्या मुलाखतीत विवेक अग्निहोत्री आणि त्यांची पत्नी, मराठमोळी अभिनेत्री पल्लवी जोशी यांनी वैयक्तिक जीवनाबद्दल काही किस्से सांगितले. याच दरम्यान विवेक यांनी महाराष्ट्रीयन जेवणाबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर मोठा गदारोळ माजला आहे.
पल्लवी जोशी यांनी मुलाखती दरम्यान सांगितले की, “मी जे काही मराठी पदार्थ बनवायचे ते विवेकना अजिबात आवडायचे नाही. ते कायम ‘हे गरीबांचं खाणं आहे’ अशी खिल्ली उडवायचे. खरं तर मराठी पदार्थ खूप साधे आणि पौष्टिक असतात. आपण कमीतकमी तेलाचा वापर करतो.” पण विवेक अग्निहोत्री हे दिल्लीचे असल्याने त्यांना सुरूवातीला साध्या पद्धतीच्या जेवणाची माहिती नव्हती.
यानंतर विवेक अग्निहोत्री यांनीही आपला अनुभव सांगितला. ते म्हणाले, “मी दिल्लीचा आहे. तिथे बटर चिकन, कबाब, तंदुरी असे मसालेदार पदार्थ असतात. आमच्या लग्नानंतर पल्लवी म्हणाली वरण-भात खा. म्हटलं ठिके खाऊया. मग ती म्हणाली कढी खा. मला वाटलं होतं की कढीवर तूप तरंगत असेल, लाल मिरचीचा तडका असेल. पण मराठी लोकांची कढी म्हणजे हेल्थ फूडसारखी असते. मला धक्काच बसला. हे तर शेतकऱ्यासारखं गरीब जेवण आहे, आणि मी तिच्यासोबत कसं राहणार, असा विचार मनात आला.”
विवेक यांच्या या विधानानंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली. वरण-भात हे सात्विक आणि पौष्टिक जेवण आहे, आयुर्वेदातही त्याला महत्त्व दिलं आहे. अशा अन्नाची खिल्ली उडवणं चुकीचं असल्याचं नेटकऱ्यांनी सुनावलं. केवळ मराठी जेवणाला गरीब म्हणणं नव्हे तर शेतकऱ्यांच्या जीवनाशी त्याची तुलना केल्यानेही नेटकऱ्यांनी विवेक यांच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
सध्या विवेक अग्निहोत्री त्यांचा नवा चित्रपट ‘द बंगाल फाईल्स’मुळे चर्चेत आहेत. पण त्याचवेळी या वादग्रस्त विधानामुळे ते सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत. मराठी जेवण साधं असलं तरी ते आरोग्यदायी आहे, आणि त्याला गरीबांचं अन्न म्हणणं म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अपमान असल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे.
