नायक आपल्या आजूबाजूलाच असतो – आपणच ओळखायचं!

News

आपल्या आजच्या धकाधकीच्या जीवनात ‘यश’ आणि ‘लोकप्रसिद्धी’ हे दोन शब्द प्रत्येकाच्या जगण्यात महत्त्वाचे झाले आहेत. कोणतीही कृती ही प्रसिद्धीसाठी, पुरस्कारासाठी किंवा मान-सन्मानासाठी केली जाते. पण याच समाजात काही व्यक्ती अशाही असतात, ज्यांच्या निःशब्द कामातून, निस्वार्थतेतून आणि प्रामाणिक सेवेतून त्यांचं कार्य ‘गाजत’ नाही, पण ‘वाजतं’ अशाच एका नायकाची गोष्ट – रामेश्वर यांची गोष्ट…

मध्य प्रदेशातील झाशी येथे कार्यरत असलेल्या वरिष्ठ विभागीय ऑपरेशन मॅनेजर संजय कुमार यांनी आपल्या एका सहकाऱ्याबद्दल सांगितलेली गोष्ट संपूर्ण देशासाठी एक आदर्श ठरत आहे. ते म्हणतात रामेश्वर हे नाव सामान्य वाटलं तरी त्यामागची कार्यतत्परता, निष्ठा आणि नम्रता फारच असामान्य आहे. चला तर मग या रामेश्वर यांनी नेमकं असं काय काम केलंय ज्यामुळे एका वरिष्ठ अधिकाऱ्याला त्यांच्याबद्दल आपुलकीने आणि आदराने ट्विट करावं लागलं.

शेवटच्या दिवसाची पहाटही सेवेस अर्पण
रामेश्वर आपल्या सेवेनिवृत्तीच्या शेवटच्या दिवशी देखील, कडाक्याच्या थंडीमध्ये ऑफिसमध्येच झोपले होते. बहुधा अनेकांनी आपला शेवटचा दिवस सेलिब्रेशनसाठी, निरोपासाठी किंवा विश्रांतीसाठी राखून ठेवला असता. पण रामेश्वर सकाळी ५ वाजता उठले आणि कोणालाही काही न सांगता, संपूर्ण ऑफिसची स्वच्छता करून टाकली. जणू हेच त्यांचं आपल्या कृतीतून सेवेला वंदन करणं होतं –

“एक कप चहा” देखील नाकारलेली निष्ठा
संपूर्ण सेवावधीत, रामेश्वर यांनी एक कप चहा देखील कोणाकडून स्वीकारला नाही. ही बाब ऐकून अनेकांना आश्चर्य वाटेल, पण हीच त्या माणसाची वृत्ती होती – स्वावलंबी, निःस्पृह आणि संपूर्णतः कर्तव्यनिष्ठ. चहा न घेणं ही बाब नव्हे, तर कोणतीही कृपा न घेता, आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडणं – हे त्यामागचं अधोरेखित तत्त्व आहे.

काम हाच देव आणि कर्मस्थान हेच मंदिर
रामेश्वरसारखे लोक नायक असतात, पण त्यांच्या कार्याचा कधीच गाजावाजा होत नाही, त्यांना तो मंजूरही नसतो. ते शांत असतात, पण त्यांचं कर्म इतकं प्रभावी असतं की त्यांच्या अनुपस्थितीतच जाणवतं की, त्यांनी काय काय हाताळून ठेवलं होतं. अशा व्यक्तींसाठी कार्यालय स्वच्छ राहणं ही केवळ जबाबदारी नसते, तर ती एक श्रद्धा असते – जिथे आपण काम करतो, ते स्थान मंदिरासारखं पवित्र राखणं हाच त्यामागे त्यांचा उद्देश असतो.

प्रत्येक कार्यालयात असतो एक ‘रामेश्वर’
आपण जरा डोळसपणे बघितलं, तर आपल्या आजूबाजूला देखील असे अनेक कर्मचारी दिसतील, जे कुठलाही गाजावाजा न करता, कुठल्याही अपेक्षेविना आपलं काम करत असतात. ते वेळेआधी येतात, उशीरापर्यंत थांबतात, आजारी असूनही अनुपस्थित राहत नाहीत, आणि आपल्या संस्थेची ‘मुल्यं’ जपतात.

‘अदृश्य नायकांना’ सलाम
रामेश्वर यांच्या रुपाने आपल्याला समजते की, सेवा, निष्ठा आणि नम्रता हीच खरी देशसेवा आहे. पुरस्कार, जाहिराती किंवा मीडिया कव्हरेज यापलीकडे जाऊन, ही खरी ‘देशसेवा’ आहे – जी आपापल्या कामाच्या जागी निष्ठेने काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या रूपात दिसते. आज आपण सर्वांनी असा संकल्प करायला हवा की आपण आपल्या कार्यालयातील, संस्थेतील किंवा परिसरातील अशा निस्वार्थ सेवेकऱ्यांना ओळखू, त्यांना आदर देऊ आणि त्यांच्या मार्गदर्शनाने स्वतःमध्येही सेवा वृत्ती विकसित करू. कारण शेवटी, “नायक तोच असतो, जो कधीच स्वतःला नायक समजत नाही… परंतु त्याने केलेल्या कार्यातून इतरांना प्रेरणा मिळत असते.”

Leave a Reply