अस्मानी संकटाचा कहर! बार्शीतील दोन शेतकऱ्यांनी धरली मृत्यूची वाट

News

काही आठवड्यांपासून महाराष्ट्रातील जिल्ह्यांवर अस्मानी संकट उद्धवले आहे. गेल्या काही दिवसांपासून मराठवाडा, सोलापूर, सांगली भागांत मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. सोलापूर मधील नदी, नाले तुडुंब वाहत आहेत. शहरांमध्ये, गावांमध्ये या नदी नाल्यांचे पाणी गेल्याने अनेक ठिकाणी पाणी भरले आहे. शासनाने नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरिक केले आहे. मात्र शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

शेतीचे नुकसान झाल्याने शेतकरी चिंतेत असून वर्षभर केलेली मेहनत पाण्यात गेल्याने अनेकजण हतबल झाले आहेत. अशातच सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील दहिटणे आणि कारी या दोन गावांमधील शेतकऱ्यांनी एकाच दिवशी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. 24 सप्टेंबर, बुधवारी, दोन्ही गावांतील गावकऱ्यांनी हळहळ व्यक्त केली. अतिवृष्टीमुळे पिकांच नुकसान आणि कर्जाचे ओझे यामुळे आत्महत्या केली असल्याचे कुटुंबीय आणि गावकऱ्यांकडून सांगितले जात आहे.

दहिटणे गावातील लक्ष्मण गवसाने (५८) यांची दीड एकर कोरडवाहू शेती होती. गेले काही दिवस सततंधार लागलेल्या पावसामुळे शेतात पाणी साचून पिकाचे नुकसान झाल. तसेच गवसाने हे काही दिवसांपासून आजाराने देखील ग्रस्त होते. त्यात पावसामुळे ते मानसिक तणावाखाली होते. 23 सप्टेंबर रोजी दुपारी ‘बाजारातून जाऊन येतो’ असे सांगून ते घराबाहेर पडले ते पुन्हा परतलेच नाही. 24 सप्टेंबर रोजी गावातील एका इसमाला त्यांचा मृतदेह गावातील एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. या घटनेमुळे गवसाने कुटुंबीयांवर आभाळ कोसळले आहे.

कारी गावातील शेतकरी शरद भागवत गंभीर (45) यांनी देखील याच दिवशी आत्महत्या केली. गंभीर यांची साडेतीन एकर शेती असून यावर पेरू आणि लिंबूचे पीक होते. मात्र संततधार पावसाने जमिनीवर अति प्रमाणात पाणी राहिल्याने संपूर्ण पीक खराब झाले. गंभीर यांनी बँकेतून 7 लाखांचे कर्ज घेतले होते, तसेच गावातील काही मंडळींकडून 3 लाख रूपये उधार घेतले होते. पीक खराब झाल्याने कर्ज फेडण्याच्या चिंतेत गाईला बांधण्याच्या दावणाने गळफास घेऊन आत्महत्या केली.

दोन्ही मृत्यू आकस्मिक म्हणून नोंदवण्यात आल्या असून, पोलिस अधिक तपास करत आहेत. स्थानिकांनी तातडीने सर्वेक्षण करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याची मागणी केली आहे.

Leave a Reply