कल्पना करा – तुम्ही मुंबईहून मनमाडकडे जाणाऱ्या पंचवटी एक्स्प्रेसमध्ये आरामात बसलेले आहात. खिशात रोख पैसे थोडेच उरलेत, आणि पुढचं स्टेशन अजून दूर आहे. अशा वेळी जर चालत्या ट्रेनमध्येच ATM मशीन दिसलं, तर? होय, हे आता हे शक्य आहे!
भारतीय रेल्वेने एक अभूतपूर्व पाऊल उचलत, पहिल्यांदाच धावत्या रेल्वेत ATM सेवा उपलब्ध करून दिली आहे – तीही तुमच्या ओळखीच्या आणि लोकप्रिय पंचवटी एक्स्प्रेसमध्ये. ही केवळ सुविधा नाही, तर भारतीय रेल्वेच्या नवोपक्रमशीलतेचा एक ठळक पुरावा आहे. आता प्रवासादरम्यान रोख रक्कम हवी असेल, तर स्टेशनची वाट बघायची गरज नाही – कारण ATM आता तुमच्याच बोगीत असणार आहे!
भारतात प्रथमच: चालत्या गाडीत ATM!
मध्य रेल्वेने एक अनोखा उपक्रम राबवत चालत असलेल्या रेल्वेगाडीत एटीएम सेवा सुरू करण्याचा उपक्रम यशस्वी केला आहे. मुंबई ते मनमाड दरम्यान धावणाऱ्या पंचवटी एक्स्प्रेसमध्ये ATM मशीन बसवण्यात आले आहे. या सेवेमुळे प्रवाशांना चालत्या ट्रेनमध्येच रोख रक्कम काढण्याची सुविधा मिळणार आहे, जी आजवर केवळ कल्पनेतच होती. या प्रकारची सुविधा असलेली ही भारतातील पहिलीच एक्स्प्रेस गाडी ठरली आहे. त्यामुळे रेल्वेच्या इतिहासात एक नवा अध्याय सुरू झाला आहे.
कल्पनेपासून प्रत्यक्ष अंमलबजावणीपर्यंतचा प्रवास
ही अभिनव संकल्पना प्रथम भुसावळ विभागात आयोजित केलेल्या गैर-भाडे महसूल ग्राहक संवाद बैठकीत मांडण्यात आली होती. या संकल्पनेला बँक ऑफ महाराष्ट्रने उचलून धरत “नवीन, नाविन्यपूर्ण गैर-भाडे महसूल कल्पना योजना” (NINFRIS) अंतर्गत औपचारिक प्रस्ताव सादर केला. मध्य रेल्वेच्या सहकार्याने ही योजना प्रत्यक्षात उतरवण्यात आली आणि आज गाडी क्रमांक 12110 पंचवटी एक्स्प्रेस ही पहिली ATM युक्त गाडी ठरली आहे.
तांत्रिक सुधारणा आणि खास डबा
या सेवेसाठी मध्य रेल्वेच्या मनमाड वर्कशॉपमध्ये एक खास डबा तयार करण्यात आला आहे. यामध्ये ATM यंत्र बसवण्यासाठी विशेष विद्युत प्रणाली आणि नेटवर्क सिस्टीम लावण्यात आली आहे, जेणेकरून ट्रेन चालू असतानाही सेवा सुरळीत चालू राहील. हा ATM युक्त कोच AC चेअर कार कोचमध्ये बसवण्यात आला आहे. मंगळवारी सकाळी ही सेवा असलेली ट्रेन मुंबईत दाखल झाली, आणि लवकरच ही सेवा सर्वसामान्य प्रवाशांसाठी खुली होणार आहे.
दररोज 2200+ प्रवाशांना होणार लाभ
पंचवटी एक्स्प्रेसमध्ये दररोज सुमारे 2200 प्रवासी प्रवास करतात. एकूण 22 डब्यांची ही गाडी वेस्टिब्यूल कनेक्टेड असल्यामुळे, म्हणजेच एका डब्यांतून सहजपणे दुसऱ्या डब्यात जाता येते असल्याने, सर्व श्रेणीतील प्रवाशांना हे ATM वापरणे शक्य होणार आहे. या सुविधेचा विशेष फायदा ज्येष्ठ नागरिक, महिला आणि आकस्मिक गरज असलेल्या प्रवाशांना होणार आहे. प्रवासाच्या वेळी अचानक रोख रकमेची गरज भासल्यास ही सेवा अत्यंत उपयोगी ठरणार आहे.
सतत कनेक्ट राहणारे ATM
हे ATM मोबाईल नेटवर्कच्या मदतीने सतत ऑनलाईन राहणार आहे. त्यामुळे गाडी भरधाव वेगात असूनही रिअल टाईम व्यवहार करता येणार आहेत. ATM मशीनच्या माध्यमातून सामान्य व्यवहार जसे की रोख रक्कम काढणे, बॅलन्स तपासणे व मिनी स्टेटमेंट घेणे शक्य होणार आहे.
रेल्वेच्या महसुलात वाढ
ही सुविधा फक्त प्रवाशांसाठीच फायदेशीर नाही, तर रेल्वेला देखील नवा उत्पन्न स्रोत मिळवून देणार आहे. बँक ऑफ महाराष्ट्र आणि रेल्वे यांच्यातील करारामुळे गैर-भाडे महसुलात (NFR) वाढ होणार आहे, जो रेल्वेसाठी दीर्घकालीन फायदेशीर ठरू शकतो.
भारतात रेल्वेसेवा नव्या उंचीवर
पंचवटी एक्स्प्रेसमध्ये सुरू झालेली ही धावत्या ट्रेनमधील ATM सेवा केवळ एक सुरुवात आहे. भविष्यात देशातील इतर प्रमुख एक्स्प्रेस गाड्यांमध्ये देखील अशीच सुविधा उपलब्ध होईल, अशापद्धतीने शासकीय पातळ्यांवर नियोजन सुरू आहे. भारतीय रेल्वेच्या या नवकल्पनांनी प्रवास अधिक सुकर, सुरक्षित आणि आधुनिक होत आहे. ही सेवा केवळ एक यांत्रिक जोड नाही, तर प्रवाशांच्या गरजांचा विचार करून दिलेले एक प्रगत, नागरिकाभिमुख उत्तर आहे.