युरोप देश आणि तिथल्या मायग्रंट्सला दिला जाणार त्रास गेल्या काही आठवड्यांपासून चर्चेचा विषय ठरत आहे. गेल्या काही दिवसांत UK ची राजधानी लंडनमध्ये स्थलांतर थांबवण्याकरीता मोर्चा काढण्यात आला होता. आता पुन्हा अशीच एक बातमी समोर आली आहे. युरोपातीलच एक देश जॉर्जियाच्या सीमेवर काही भारतीयांना अमानुष वागणूक देण्यात आली आहे. एका भारतीय महिलेने जॉर्जियाच्या अधिकाऱ्यांनी तब्बल 56 भारतीय प्रवाशांसोबत चुकीचे वर्तन केल्याचा आरोप केला आहे.
ध्रुवी पटेल नावाच्या महिलेने तिने अनुभवलेला हा अनुभव इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. तिने लिहिलेल्या या पोस्टनुसार, त्यांच्या ग्रुप जवळ पात्र ई-व्हिसा आणि कागदपत्रे असून देखील त्यांना अपमानास्पद वागणूक देण्यात आली, तसेच सादाखलो सीमेवर बराच वेळ अडवून ठेवण्यात आले होते.
या पोस्टमध्ये, प्रवाशांना 5 तासांपेक्षा अधिक वेळ प्रचंड थंडीत उभे करून ठेवण्यात आले होते. ना खाण्यासाठी दिले ना शौचालय वापरण्याची परवानगी दिली. जॉर्जियाच्या अधिकाऱ्यांनी पासपोर्ट 2 तासांपेक्षा अधिक वेळ जप्त करून ठेवले होते. एवढचं नाही तर, कागदपत्रांची तपासणी न करताच व्हिसा अवैध असल्याचं सांगितलं.
ध्रुवी पटेल यांनी पुढे लिहिले आहे की, अधिकाऱ्यांनी प्रवाशांना फुटपाथवर जनावरांसारखं बसवून ठेवलं होतं. तसेच प्रवाशांचे गुन्हेगारांप्रमाणे व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात आले, प्रवाशांना घटनेचे रेकॉर्डिंग करण्यास रोखलं. सदर प्रकार लज्जास्पद आणि अमान्य असल्याचे तिने म्हटले आहे. या पोस्टमध्ये ध्रुवीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना टॅग करत लिहिले आहे की, भारताने यावर कडक भूमिका घ्यायला हवी.
युरोपातील आयर्लंडमध्ये भारतीयांचा छळ
गेल्या काही महिन्यांमध्ये आयर्लंडमध्ये भारतीय नागरिकांचा अमानूष छळ सुरू आहे. येथील स्थानिक तरूण भारतीय असल्याचे बघून त्यांच्यावर हल्ले करतात आणि नंतर तुमच्या देशात निघून जा असे सांगतात. असेच एका भारतीय वाहन चालकाला रक्तबंबाळ करून त्याचा व्हिडीओ व्हायरल केला गेला.
पुन्हा दोन दिवसांनी, उत्तर डब्लिनमधील बॅलीमुन येथे दोन प्रवाशांनी एका भारतीय टॅक्सीचालकावर बाटलीने हल्ला करून “Go Back to your Country” असे ओरडले. या ही पेक्षा भयंकर म्हणजे काऊंटी वॉटरफोर्डमधील एका सोसायटीमध्ये काही मुलांनी सहा वर्षांच्या भारतीय मुलीला चेहऱ्यावर मारले, सायकलने तिच्या गुप्तांगावर प्रहार केला आणि तिला देखील गो बॅक टू इंडिया असे सांगितले.
वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे भारतीय स्थलांतरितांच्या आश्रयावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जूनपासून भारतीयांवर हल्ल्यांची मालिका सुरू आहे. यामुळे अनेक भारतीय नागरिक आता आयर्लंड सोडण्याच्या विचारात आहेत.
