Random News

तेलंगणा सरकारने विकासाच्या नावाखाली जंगल संपवलं ! ALL EYES ON HCU

भारतात जंगल संरक्षणासाठी अनेक ऐतिहासिक आंदोलनं झाली. चिपको आंदोलनानं जगभरात खळबळ उडवली, तर आदिवासी समाजानं आपली ‘जल, जंगल, जमीन’ टिकवण्यासाठी शतकानुशतके संघर्ष केला. मात्र, आधुनिकतेच्या नावाखाली जंगलतोड थांबायचं नाव घेत नाही. नुकतीच हैदराबादमधील कंचा गचीबावली भागातील तब्बल ४०० एकर जंगल बुलडोझरखाली उध्वस्त केलं गेलं, आणि हे वास्तव पाहून पर्यावरणप्रेमी, विद्यार्थी, आणि स्थानिकांच्या मनात संतापाची लाट उसळली आहे.

तेलंगणातील रंगरेड्डी जिल्ह्यातील कंचा गचीबावली भागात राज्य सरकारनं ‘वर्ल्ड-क्लास IT पार्क आणि हब’ उभारण्याच्या उद्देशानं जंगल नष्ट करण्याचा निर्णय घेतला. हैदराबाद सेंट्रल युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी याला प्रखर विरोध केला. पण ३० मार्च रोजी सरकारच्या आदेशानुसार मोठमोठे बुलडोझर जंगलात उतरले आणि अवघ्या दोन दिवसांत हिरवाईचा मातीच्या ढिगाऱ्यात परिवर्तित केला.

जंगलाच्या या विध्वंसानं तिथल्या जैवविविधतेवर गंभीर परिणाम झाला. अनेक हरिणांचे कळप गोंधळून इकडून तिकडे धावताना दिसले, मोर भयभीत होऊन टाहो फोडत होते, तर असंख्य पक्ष्यांची घरटी उद्ध्वस्त झाली. या घटनेमुळे तापमान १ ते ४ अंशांनी वाढल्याचंही पर्यावरणतज्ज्ञांनी नोंदवलं आहे.
ही जमीन लिलावासाठी काढण्याच्या निर्णयाला सुरुवातीपासूनच विद्यार्थी संघटनांचा, शिक्षकांचा आणि स्थानिक नागरिकांचा विरोध होता. विद्यार्थ्यांनी यासाठी आंदोलन उभारलं, मात्र सरकारनं त्यांना पोलिसांच्या जोरावर चिरडण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन त्यांना मारहाण केली, कपडे फाटेपर्यंत त्यांना खेचलं आणि दिवसभर कोठडीत डांबून ठेवलं. यावरून सरकारवर टीकेचा भडिमार सुरू झाला आहे. “ही लोकशाही नाही, हुकूमशाही आहे,” असं म्हणत सोशल मीडियावर #SaveHCUBiodiversity, ‘ALL EYES ON HCU’ हे हॅशटॅग ट्रेंड होत आहेत.

तेलंगणा सरकारनं या जंगलाला ‘वनक्षेत्र’ मानण्यास नकार दिला, पण पर्यावरणतज्ज्ञ आणि अभ्यासक या दाव्याला धुडकावून लावत आहेत. त्यांच्यानुसार या भागात ४५५ प्रजातींचे पक्षी, प्राणी आणि कीटक होते, ज्यांचं आता अस्तित्व धोक्यात आलं आहे.

भारतासह संपूर्ण जग ग्लोबल वॉर्मिंग, हवामान बदल, वाढतं तापमान, पूर आणि दुष्काळासारख्या नैसर्गिक आपत्तींशी झुंजत आहे. अशा परिस्थितीत जंगलतोडीच्या घटनांनी संकट आणखी गडद होत आहे. दररोज जगभर ४० लाख झाडं तोडली जातात, आणि त्याचा फटका हवामान बदलाला बसतो.

हैदराबादच्या या जंगलतोडीनंतर आता तेलंगणा सरकार मागे हटेल का? केंद्र सरकार यात हस्तक्षेप करेल का? या लढ्यात न्याय मिळेल का? हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. पण शहराच्या हृदयातील जंगल पुन्हा फुलणार का? हा खरा प्रश्न आहे!

Team Jabari Khabari

Recent Posts

सामान्यांचे हजारो कोटी रुपये घेऊन महावितरणचा ‘व्हीलिंग चार्जेस’ घोटाळा

आपण दरमहा वीज बिल भरतो, पण त्यातील प्रत्येक आकड्याचा अर्थ आपल्याला माहित असतो का? वीज…

24 hours ago

आसाम, बंगाल ते दक्षिण भारत विधानसभा निवडणुका २०२६… देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लढत

२०२६ जसं चालू झालं, तसं एकूणच देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने रोमांचक लढत घेऊन आलं. मुंबई महानगरपालिका…

24 hours ago

Reko Diq Project – तांबे आणि सोन्याच्या जागतिक बाजारपेठेवर कब्जा मिळवण्यासाठी अमेरिकेची खेळी

आज जगातील सर्वच बलाढ्य देश आपल्या सोन्याच्या साठ्यात वाढ करण्यासाठी धडपडत असल्याचे चित्र आहे. आर्थिक…

2 days ago

मणिपूर: एका विजनवासाचा अंत की संघर्षाच्या नव्या अध्यायाची सुरुवात?

मणिपूर, भारताच्या प्रसिद्ध सेव्हन सिस्टर्स पैकी एक भौगोलिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या प्रगत राज्य. जिथे एकेकाळी निसर्गाचे…

2 days ago

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी पाड्यांमध्ये का असंतोष आहे?

"वन विभाग आम्हाला अतिक्रमणदार म्हणतो. पण आम्ही आदिवासी मूळनिवासी आहोत. आमची जमीन, शेती, देव-धर्म सगळं…

4 days ago

संसदेत मोदींवर हल्ला करण्याचा कट होता का?

भारतीय लोकशाहीचं मंदिर असलेल्या संसदेत गेल्या काही दिवसांपासून फारच गोंधळ चालू आहे. राहुल गांधी यांनी…

5 days ago