आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात भारताकडून पाच गडी राखून पराभव पत्करल्यानंतर पाकिस्तानची खेळातच नाही तर जगभरात नाचक्की झाली. सामन्यानंतर भारतीय संघाने नक्वी यांच्या हस्ते ट्रॉफी नाकारल्याने, नक्वी ट्रॉफी आणि पदकं आपल्यासोबत घेऊन गेल्याने हा विषय अधिक रंगला. आता पुन्हा पाकिस्तानी कर्णधाराने केलेल्या घोषणेमुळे गदारोळ माजला आहे.
भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव याने आशिया कप 2025 मधील त्याची फी भारतीय लष्कराला दान करणार असल्याचे घोषित केले. त्यानंतर पाकिस्तानी कर्णधार सलमान अली आगा याने देखील सामन्यानंतर पत्रकार परिषद घेतली, आणि त्याची मॅच फी भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये मारल्या गेलेल्या पाकिस्तानी नागरिकांच्या कुटुंबाला दान करणार असल्याची घोषणा केली.
यामध्ये कुख्यात दहशतवादी मसूद अझहरचा देखील समावेश आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये मसूद अझहरच्या कुटुंबाचा खात्मा झाला. मात्र मसूद अजूनही सुरक्षित आहे. यामुळे अझहरला पैसे देऊन दहशतवादाला पाठिंबा दर्शवल्यामुळे संताप व्यक्त केला जातोय. आगाच्या या निर्णयामुळे पाकिस्तानी संघ दहशतवाद्यांना प्रोत्साहन देत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. सोशल मीडियावर चाहत्यांनीही या घोषणेला “मॅच फी की आतंकी फंडिंग” असा टोला लगावला आहे.
