Crime Story:कोकणात फिरायला गेलेल्या तरुणांचा ताम्हिणीत अंत, नेमकं काय घडलं?

कोकणात फिरायला गेलेल्या तरुणांचा ताम्हिणीत अंत, नेमकं काय घडलं? Tamhini Crime Story

सहलीचा आनंद, व्यवसायात मिळालेल्या यशाचे सेलिब्रेशन आणि मित्रांचा सहवास… पुण्यातून निघालेल्या त्या सहा तरुण मित्रांच्या आयुष्यात हा प्रवास शेवटचा ठरेल, याची पुसटशी कल्पनाही कोणाला नसेल. दिवेआगरच्या दिशेने निघालेली त्यांची ‘थार’ गाडी आणि त्यातील सहा तरुण अचानक बेपत्ता झाले, आणि त्यानंतर जे सत्य समोर आले, त्याने सर्वांच्याच काळजाचा थरकाप उडवला. ताम्हिणी घाटात घडलेल्या या दुर्दैवी अपघाताने केवळ एक कुटुंब नाही, तर संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे.

साहिल हा गरिबीशी झुंज देऊन स्वतःची ‘थार’ घेणारा आणि पुण्यात 3-4 ठिकाणी ‘मोमोज’चा व्यवसाय उभा करणारा मेहनती तरुण म्हणून परिसरात ओळखला जायचा. आपल्या जिवलग मित्रांना घेऊन तो पहिल्यांदाच कोकण फिरायला निघाला होता. अवघ्या 20 दिवसांपूर्वी साहिलने नवीन कोरी थार कार घेतली. साहिल आवडीने आपली कार घेऊन आपल्या मित्रांसमवेत कोकण दाखवण्यासाठी निघाला आणि वाहनावरील नियंत्रण सुटून अपघात घडला. या अपघातामध्ये सहाही तरुणांचा मृत्यू झाला. साहिल गोठे, वय- 24 ,शिवा माने, वय- 20,प्रथम चव्हाण, वय- 23 श्री कोळी, वय- 19,ओमकार कोळी, वय- 20 पुनीत शेट्टी, वय- 21अशी त्यांची नावं.

५०० फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढणे हे एक मोठे अग्निदिव्य होते. थोडीशी चूक आणि बचाव पथकाचा जीवही धोक्यात येऊ शकत होता. यासाठी पुण्याची ‘रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट’, माणगावची ‘शेलार मामा रेस्क्यू टीम’, कोलाडची ‘एसव्हीआरएसएस’ आणि महाडची ‘साळुंखे रेस्क्यू टीम’ यांना पाचारण करण्यात आले.सकाळी ९ वाजता सुरू झालेली ही मोहीम सायंकाळी ४ वाजेपर्यंत चालली. क्रेन, दोरखंड आणि हार्नेसच्या साहाय्याने बचाव पथकाचे जवान जीव धोक्यात घालून दरीत उतरले. अतिशय काळजीपूर्वक, स्ट्रेचर्सच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आले. निसर्गाच्या रौद्र रूपापुढे आणि त्या भयावह खोलीपुढे मानवी प्रयत्न थिटे वाटत होते, तरीही या जवानांनी आपले कर्तव्य चोख बजावले.

हा अपघात आपल्याला पुन्हा एकदा घाटातील प्रवासाच्या सुरक्षिततेबाबत गंभीरपणे विचार करायला लावतो. क्षणभराचा हलगर्जीपणा किंवा वेगाचा मोह किती महागात पडू शकतो, याची ही प्रचिती आहे. या सहाही तरुणांना भावपूर्ण श्रद्धांजली!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *