हिवाळ्यात राजकीय तापमान वाढणार! पहिल्या टप्प्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर

News Political News

राज्य निवडणूक आयोगाने अखेर महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारी 2025 पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिल्याने राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुका वेळेत पार पाडण्यासाठी सविस्तर कार्यक्रम जाहीर केला आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन याबाबत घोषणा केली.

या निवडणुकांमध्ये एकूण 246 नगरपरिषद आणि 42 नगरपंचायतींचा समावेश असून, 288 नगराध्यक्ष आणि 6,859 सदस्य निवडून येणार आहेत. कोकण विभागात 27, नाशिक विभागात 59, पुणे विभागात 60 आणि नागपूर विभागात 55 नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुका पार पडतील. या निवडणुकीसाठी राज्यभरात एकूण 13,355 मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत. मतदान 2 डिसेंबर 2025 रोजी होईल आणि मतमोजणी 3 डिसेंबर 2025 रोजी पार पडेल. या निवडणुकांसाठी 66 हजारांहून अधिक निवडणूक अधिकारी व कर्मचारी कामकाज पाहतील.

राज्यातील या निवडणुकांमध्ये अंदाजे 1 कोटी 7 लाख 3 हजार 576 मतदार मतदानाचा हक्क बजावतील. मतदान ईव्हीएम मशीनद्वारे घेण्यात येणार असून काही ठिकाणी बॅलेट युनिटचा वापर करण्यात येईल. मतदान केंद्राच्या परिसरात मोबाईल नेण्यास परवानगी असेल, मात्र मुख्य मतदान कक्षात मोबाईल नेण्यास बंदी असेल. मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या 7 नोव्हेंबरला प्रकाशित केल्या जातील. उमेदवारी अर्ज 10 नोव्हेंबरपासून स्वीकारले जातील आणि 17 नोव्हेंबरपर्यंत दाखल करता येतील. अर्जांची छाननी 18 नोव्हेंबर रोजी होईल, तर अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 25 नोव्हेंबर निश्चित करण्यात आली आहे. 26 नोव्हेंबर रोजी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल.

उमेदवारी अर्ज ऑनलाईन स्वीकारले जातील. एका उमेदवाराला जास्तीत जास्त चार प्रभागांमध्ये अर्ज दाखल करण्याची परवानगी असेल. अर्जासोबत जातीवैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे, आणि जर ते उपलब्ध नसेल तर अर्ज केलेली पावती सादर करावी लागेल. आयोगाने या निवडणुकांसाठी खर्च मर्यादेत वाढ केली आहे. अ वर्गातील नगरपरिषद अध्यक्ष पदासाठी 15 लाख आणि सदस्य पदासाठी 5 लाख रुपयांची मर्यादा आहे. ब वर्गात अध्यक्ष पदासाठी 11 लाख 25 हजार आणि सदस्य पदासाठी 3 लाख 50 हजार, तर क वर्गात अध्यक्ष पदासाठी 7 लाख 50 हजार आणि सदस्य पदासाठी 2 लाख 50 हजार खर्च मर्यादा आहे. नगरपंचायत अध्यक्षासाठी 6 लाख आणि सदस्य पदासाठी 2 लाख 25 हजार रुपये इतकी मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

दुबार मतदारांची समस्या दूर करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने विशेष मोहीम सुरू केली आहे. दुबार मतदारांच्या नावासमोर डबल स्टार (**) चिन्ह लावण्यात येईल. असा मतदार मतदान केंद्रावर आल्यानंतर त्याच्याकडून प्रतिज्ञापत्र घेतले जाईल की तो केवळ एका केंद्रावरच मतदान करेल. तसेच मतदारांना त्यांचे मतदान केंद्र आणि नाव शोधण्यासाठी विशेष मोबाईल अ‍ॅप विकसित करण्यात आले आहे.

राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सांगितले की, या निवडणुकांमधून 6,859 सदस्य आणि 288 नगराध्यक्ष निवडून येतील. मतदान पारदर्शक आणि सुरळीत पार पडावे यासाठी सर्व आवश्यक तयारी पूर्ण केली जात आहे. हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर आता राज्यात निवडणुकीचे बिगुल वाजले असून, पुढील काही आठवड्यांत राजकारणात महत्वाच्या घडामोडी घडणार आहेत.

Leave a Reply