Finance गुरू अवधूत साठे शेअर मार्केट बॅन! सेबीची मोठी कारवाई

Finance गुरू अवधूत साठे शेअर मार्केट बॅन!

शेअर मार्केटमध्ये झटपट कमाई आणि ट्रेडिंग स्ट्रॅटेजींमुळे नावारूपाला आलेले ‘मार्केट गुरु’ अवधूत साठे मोठ्या अडचणीत आले आहेत. भांडवली बाजार नियंत्रक संस्था सेबीने (SEBI) त्यांच्यावर मोठी कारवाई करत त्यांना शेअर मार्केटमधील सगळ्या प्रकारच्या व्यवहारातून थेट बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

फक्त व्यवहारांवर बंदीच नव्हे तर, साठे यांनी त्यांच्या ट्रेडिंग कार्यक्रमांच्या माध्यमातून गुंतवणुकदारांकडून घेतलेले तब्बल 601 कोटी रुपये तातडीने परत करण्याचे आदेशही सेबीने दिले आहेत. ही कारवाई साठे आणि त्यांच्या हजारो शिष्यांसाठी मोठा धक्का देणारी ठरली आहे.

सेबीने का केली कारवाई ?
गेल्या काही वर्षांत सोशल मीडियावर आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर Avadhut Sathe Trading Academy खूपच लोकप्रिय झाली होती. लाखो लोक त्यांच्या ट्रेडिंग टिप्स, तंत्र आणि ‘हमखास कमाई’च्या दाव्यांकडे आकर्षित होत होते. त्यांच्या कोर्सेससाठी मोठमोठी फी घेतली जात होती.

सेबीच्या तपासात मोठे धक्कादायक निष्कर्ष आले समोर
अवधूत साठे आणि त्यांची अकॅडमी गुंतवणूक सल्लागार म्हणून काम करत होती, पण यासाठी आवश्यक असलेली कोणतीही कायदेशीर नोंदणी नव्हती. शेअर मार्केट ट्रेनिंगच्या नावाखाली विद्यार्थ्यांना विशिष्ट समभाग खरेदी-विक्रीचे संकेत किंवा सल्ले दिले जात होते. साठे यांच्या म्हणण्यानुसारच अनेक विद्यार्थी स्टॉक व्यवहार करत होते. त्यांच्या संस्थेने देशभरातून जवळपास 3 लाख गुंतवणूकदारांकडून तब्बल 601 कोटी रुपये गोळा केले होते. तसेच त्यांनी गुंतवणूकदारांकडून घेतलेले पैसे शेअर बाजारात टाकण्यासाठी वापरण्यात आल्यानंतरही यासाठी कायदेशीर परवानगी घेतली नव्हती. या सर्व बाबींवर आधारित सेबीने 125 पानी मोठा अहवाल तयार केला आणि त्यानंतर ही कडक कारवाई करण्यात आली.

सेबीच्या आदेशानुसार साठेंवर कोणत्या मर्यादा लादल्या?
अवधूत साठे यांना सिक्युरिटीज मार्केटमध्ये कोणताही व्यवहार करण्यास मनाई आहे. त्यांच्या किंवा त्यांच्या विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे जाहिरात किंवा प्रमोशन करण्यास बंदी घातली आहे. मुंबई, दिल्ली, चंदीगढ, कोलकाता, भुवनेश्वर, बंगळुरू, चेन्नई आणि हैदराबाद येथे चालणारे त्यांच्या ट्रेडिंग क्लासेसवर मोठे परिणाम होणार आहेत. ही कारवाई संपूर्ण ट्रेडिंग समुदायात चर्चेचा विषय बनली आहे. अनेकांना धक्का बसला असून, गुंतवणूकदारही अस्वस्थ आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *