“तुम्ही सौदी अरेबियात उमरा किंवा हज यात्रेसाठी जाण्याची तयारी करताय? मग थांबा – ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे!” सौदी अरेबियाने एक मोठा आणि धक्कादायक निर्णय घेत, भारत, पाकिस्तान, बांग्लादेशसह तब्बल १४ देशांवर तात्पुरता व्हिसा बंदी आदेश लागू केला आहे. या निर्णयामुळे हजारो नागरिकांचा प्रवास थांबणार आहे. पण नेमकं असं काय घडलं की सौदी प्रशासनाला असा कठोर निर्णय घ्यावा लागला?
काय आहे निर्णयाचं नेमकं स्वरूप?
सौदी अरेबियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने अधिकृतपणे जाहीर केलेल्या आदेशानुसार, उमरा, व्यवसायिक आणि कौटुंबिक व्हिसावर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे.ही बंदी केवळ नवीन व्हिसा अर्जांवर लागू असून, ज्यांच्याकडे आधीच वैध व्हिसा आहे, ते १३ एप्रिल २०२५ पर्यंत सौदी अरेबियात प्रवेश करू शकतात. या निर्णयाची अंमलबजावणी तात्काळ करण्यात आली असून, ही बंदी जून २०२५ पर्यंत लागू राहणार आहे.
कोणत्या देशांवर आहे ही बंदी?
सौदी अरेबियाच्या या निर्णयाचा परिणाम खालील १४ देशांतील नागरिकांवर होणार आहे:
- भारत
- पाकिस्तान
- बांग्लादेश
- इजिप्त
- इंडोनेशिया
- इराक
- नायजेरिया
- जॉर्डन
- अल्जेरिया
- सुदान
- इथिओपिया
- ट्युनिशिया
- येमेन
- लेबनॉन
या निर्णयामागील पार्श्वभूमी काय आहे?
हज यात्रा ही इस्लाम धर्मातील पाच स्तंभांपैकी एक आहे. दरवर्षी लाखो मुस्लीम भाविक सौदी अरेबियातील मक्का-मदिना येथे हज आणि उमरा यात्रेसाठी जातात. मात्र, २०२४ मध्ये हज यात्रेदरम्यान सौदी अरेबियामध्ये भीषण उष्णतेचा कहर झाला होता. त्यात शेकडो भाविकांचा मृत्यू झाला आणि हजारोंना रुग्णालयात दाखल करावे लागले होते.
त्याशिवाय, अनेक यात्रेकरूंनी अधिकृत नोंदणी न करता देशात प्रवेश केल्याचे समोर आले. यामुळे प्रशासनावर ताण आला आणि सुरक्षेचा गंभीर प्रश्न उभा राहिला.
सौदी प्रशासनाची भूमिका काय?
या घटनांमुळे सावध झालेल्या सौदी अरेबियाने या वर्षी हजपूर्वीच अधिक काटेकोर नियोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. सौदीचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी संबंधित मंत्रालयांना स्पष्ट आदेश दिले आहेत की, हज यात्रेकरूंची अचूक नोंदणी, संख्या आणि वैधतेची खातरजमा केल्याशिवाय देशात प्रवेश दिला जाऊ नये.
भारतीय भाविकांसाठी काय परिणाम?
भारतातील हजारो मुस्लिम भाविक उमरा व हज यात्रेसाठी सौदी अरेबियात जाण्याच्या तयारीत होते. काहींनी आधीच उमरा व्हिसा मिळवलेला आहे, तर अनेकजण अर्ज प्रक्रियेत होते. या बंदीमुळे ज्यांनी अजून व्हिसा मिळवलेला नाही, त्यांचा प्रवास थांबणार आहे.अशा नागरिकांनी सौदी अरेबियाच्या दूतावासाशी संपर्क ठेवावा, अधिकृत अपडेट्स तपासाव्यात आणि नोंदणी प्रक्रियेसंबंधी सावध राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
आगामी उपाययोजना काय असतील?
सौदी प्रशासन हज यात्रेसाठी डिजिटल नोंदणी प्रणाली, आरोग्य तपासणी, आणि पूर्व-अनुमती यंत्रणा अधिक मजबूत करत आहे. प्रत्येक देशातील अधिकृत एजंट्समार्फत यात्रेकरूंना अर्ज करणे बंधनकारक होणार असून, अनधिकृत किंवा दलालांमार्फत जाण्याच्या प्रयत्नांना पूर्णतः आळा बसणार आहे.
यात्रेपेक्षा महत्त्वाची सुरक्षा!
ही बंदी तात्पुरती असली तरी तिचा उद्देश सुरक्षित, व्यवस्थित आणि जीवितहानी टाळणारी हज यात्रा घडवणे आहे.भाविकांचा प्रवास काही काळासाठी थांबवावा लागला, तरी मुलभूत संरचना आणि सुरक्षा धोरणे मजबूत झाल्यानंतरच प्रवेश खुला केला जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. “हज ही श्रद्धेची यात्रा आहे; पण ती नियोजनशून्य झाली, तर ती शोकांतिका ठरू शकते. सौदी अरेबियाने घेतलेला हा निर्णय कडक असला, तरी भाविकांच्या रक्षणासाठी आवश्यक आहे.