IMD Red, Yellow, orange rain alert difference : पावसाला सुरुवात झाली की, हवामान विभागाकडून (IMD) अंदाज व्यक्त केले जातात. हे अंदाज व्यक्त करताना ते कलर्सचा उल्लेख करतात. पण हे कलर्सच का सांगितले जातात आणि त्यांचा नेमका अर्थ काय ते जाणून घेऊयात.
राज्यात गेल्या २-३ दिवसांपासून अनेक भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच काही मार्ग पाण्याखाली गेल्याने संपर्कदेखील तुटला आहे.हवामान विभागाने पुढील पाच दिवसांचा पावसाचा अंदाज व्यक्त केला असून त्यानुसार कोकण, गोव्यात आणि विदर्भात पुढील पाचही दिवस पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हा अंदाज वर्तवताना महाराष्ट्रातील काही भागांना आणि गोव्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. ठाणे, मुंबई या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर रायगड ला रेड अलर्ट देण्यात आला आहे. एखाद्या भागात किती पाऊस पडणार आहे, त्यानुसार हवामान विभाग त्या ठिकाणी संबंधित कालावधीसाठी अलर्ट देत असते. यासाठी चार रंगांचा वापर केला जातो. यामध्ये ऑरेंज, ग्रीन, यलो आणि रेड अशा रंगाचा कोड म्हणून वापर होतो. या रंगांचा नेमका अर्थ काय असतो, ते जाणून घेऊयात..
रेड अलर्ट (Red Alert)
जेव्हा एखाद्या भागात अतिमुसळधार किंवा अतिवृष्टीचा अंदाज असतो, अशा वेळी रेड अलर्ट जारी करण्यात येतो. रेड अलर्ट म्हणजे मोठ्या संकटाची शक्यता. त्यामुळे नागरिकांनी शक्यतो घरी राहण्याच्या सूचना दिल्या जातात.
ऑरेंज अलर्ट (Orange Alert)
हवामान खात्याकडून मुसळधार पाऊस असेल अशा ठिकाणी ऑरेंज अलर्ट दिला जातो. याचा अर्थ असा की, अशा भागांमध्ये कोणत्याही क्षणी नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता असते. इतकंच नाहीतर ऑरेंज अलर्ट असेल तेव्हा नागरिकांनाही अवश्यक कामांसाठीच घराबाहेर पडण्याच्या सूचना दिल्या जातात. कारण, यावेळी अनेक समस्या येऊ शकतात.
यलो अलर्ट (Yellow Alert)
हवामान खात्याकडून अनेक शहरांना यलो अलर्ट दिला जातो. याचा अर्थ असा होतो की, संबंधित शहरांमध्ये नैसर्गिक संकटाची शक्यता आहे. यामुळे नागरिकांच्या जनजीवनावरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सगळ्यांना सावधगिरी बाळगण्याच्या सूचना दिल्या जातात.
ग्रीन अलर्ट (Green Alert)
पावसाळ्यात अनेक भागांमध्ये ग्रीन अलर्ट असतो. याचा अर्थ की, संबंधित शहरांमध्ये पावसाची परीस्थिती सामान्य असेल. यावेळी कुठलेही निर्बंध घालण्याची गरज नसते.
हेच कलर कोविड काळात झोन्स सांगण्यासाठी वापरलेले होते. ग्रीन झोन, रेड झोन अशा प्रकारे नागरिकांना दक्षतेचा इशारा देण्यात येतो.
