जगात स्वर्ग मानल्या जाणारं काश्मीरच्या पहलगाममधील बैसरन हे ठिकाण, डोंगरांनी वेढलेलं, हिरवाईने नटलेलं. येथे पर्यटक फोटो काढण्यात, घोडेस्वारी करत डोंगर पाहण्यात, निसर्गाच्या कुशीत रमलेले होते. पण दुपारी साधारण २:३० वाजता, आनंदाच्या त्या वातावरणावर काळरात्र उतरली…
चार दहशतवाद्यांनी पोलिसांच्या वर्दीत बैसरनमध्ये प्रवेश केला. त्यांच्या हातात रायफल्स होत्या, डोळ्यांत निर्दयता.काही क्षणांतच हवेत गोळ्यांचे आवाज घुमू लागले. लोकांनी सुरुवातीला फटाक्यांचा आवाज समजून दुर्लक्ष केलं, पण नंतर “पळा! वाचवा!” अशा किंकाळ्या आसमंतात घुमल्या. दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. पण यावेळी फक्त गोळ्यांनी नव्हे, तर प्रश्नांनीही लोकं हादरली “तुझं नाव काय?” “धर्म काय?” आणि त्यानंतर… मृत्यू. दहशतवाद्यांनी खास करून हिंदू पर्यटकांना लक्ष्य केलं. पाहता पाहता, निसर्गाच्या सान्निध्यात रमलेलं ते ठिकाण रक्तानं माखलं आणि या घटनेने संपूर्ण देश हादरला.
या हल्ल्यात २६ हून अधिक निष्पाप लोकांचा मृत्यू झाला. यामध्ये महाराष्ट्र, हरियाणा, उत्तर प्रदेश, ओडिशा, कर्नाटकातील पर्यटकांचा समावेश आहे. दोन परदेशी नागरिक – एक UAE आणि एक नेपाळी नागरिक या हल्ल्याचे बळी ठरले. भारतीय नौदलाचा २६ वर्षीय अधिकारी लेफ्टनंट विनय नरवाल, ज्यांचं अवघ्या सहा दिवसांपूर्वी लग्न झालं होतं, त्यांचाही मृत्यू झाला. कर्नाटकच्या मंजुनाथचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये तो डल लेकमध्ये शिकाऱ्यावर बसून ‘थँक यू काश्मीर’ म्हणत होता. कोणाला ठाऊक होतं, की तो त्याचा शेवटचा क्षण ठरेल? त्याच्या पत्नीने, “मलाही मारा” असं दहशतवाद्यांना म्हणत केलेली याचना, त्यातील दहशतवादी म्हणाला – “तुला सोडतोय, जा मोदीला सांग” हे शब्द अजूनही थरकाप उडवणारे आहेत.
घटनास्थळी झालेल्या वेळीच बचावकार्य सुरू करण्यात आलं. भारतीय सैन्य, जम्मू-काश्मीर पोलीस, CRPF च्या विशेष पथकांनी बैसरन परिसर सील करून शोधमोहीम सुरू केली. जखमींना हेलिकॉप्टरने तातडीनं रुग्णालयात हलवलं गेलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून देशात परतण्याचा निर्णय घेतला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी श्रीनगरमध्ये सुरक्षा बैठक घेतली.
TRF – ‘द रेझिस्टन्स फ्रंट‘ या दहशतवादी संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. TRF ही पाकिस्तानातील लष्कर-ए-तय्यबाची उपशाखा मानली जाते. हा हल्ला डोमिसाइल प्रमाणपत्रांविरोधात आणि अमरनाथ यात्रेला बाधा आणण्याच्या उद्देशाने केल्याचं सांगितलं जातं. काश्मीरच्या भूमीत बाहेरून आलेल्या लोकांनी मालमत्ता खरेदी करू नये, हाच त्यांचा हेतू.
जगभरातून या हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त झाला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, रशियाचे व्लादिमीर पुतिन, आणि इस्रायलचे नेतान्याहू यांच्यासह अनेक देशांनी भारताच्या पाठीशी उभं राहण्याचा संदेश दिला.
ही केवळ घटना नव्हे, तर एक काळजाला घायाळ करणारी एक आठवण आहे. कोणाचं काय चुकलं होतं? फक्त धर्म विचारून, नाव विचारून कोणी हक्कानं हिंडत असलेल्या पर्यटकांवर गोळ्या झाडणं, ही मानवीतेविरुद्धची क्रूरता आहे. काश्मीरच्या हिरवाईवर लालबुंद रक्ताचे डाग उठले आहेत.
या भ्याड हल्ल्यात मृत्युमुखी पावलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली !